राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही चिंतन शिबिर, संघ विचारांचा हा पगडा मानावा काय?, उद्धव ठाकरेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 08:52 AM2017-11-08T08:52:47+5:302017-11-08T08:56:12+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

saamana editorial on ncp and sharad pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही चिंतन शिबिर, संघ विचारांचा हा पगडा मानावा काय?, उद्धव ठाकरेंचा निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही चिंतन शिबिर, संघ विचारांचा हा पगडा मानावा काय?, उद्धव ठाकरेंचा निशाणा

Next

मुंबई -  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरावर उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.  राष्ट्रवादीसारख्या पक्षानंही चिंतन शिबिर करावं आणि त्याचे बौद्धिक प्रफुल्ल पटेल यांनी घ्यावं म्हणजेच हा संघ विचारांचा हा पगडा आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.  विचारांचा हा पगडा की राजकीय सूतजुळवणी आहे? असेही टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.  

काय आहे आजचे सामना संपादकीय?
आतापर्यंत भारतीय जनता पक्षाची किंवा संघ परिवाराची चिंतन शिबिरे होत असत, पण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही चिंतन शिबीर कर्जत मुक्कामी झाले आहे. त्यामुळे विचारांचा हा पगडा की राजकीय सूतजुळवणी असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. भाजपच्या चिंतन शिबिरात संघ परिवारातील ज्येष्ठ मंडळी खास बौद्धिक वगैरे घेण्यासाठी आमंत्रित केली जातात. आता राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात कार्यकर्त्यांना कोणते बौद्धिक मिळाले ते प्रसिद्ध झाले आहे. सध्या श्री. शरद पवारांचे चिंतन सुरू आहे. त्या चिंतनाची दिशा स्पष्ट झाली नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘बौद्धिक प्रमुख’ प्रफुल्ल पटेल यांनी चिंतनाचे तुषार उडवले आहेत. २०१९ मध्ये शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात असे राष्ट्रवादीच्या बौद्धिक प्रमुखांनी जाहीर केले आहे. यावर राष्ट्रवादीचे ‘सरकार्यवाह’ शरद पवार यांनी अद्यापि कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून व त्याआधीही शरद पवार हे पंतप्रधानपदाच्या चर्चेत राहिले आहेत. काँग्रेस पक्षात असताना नरसिंह राव, सोनिया गांधी, अर्जुन सिंग वगैरे मंडळींनी पवारांना पंतप्रधान होऊ दिले नाही व सोनिया गांधींच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावर काँगेस त्यागाचे चिंतन करूनही राष्ट्रवादीचा खासदारकीचा आकडा आठ-दहाच्या वर गेला नाही. मोदी लाटेमुळे तर तो चारवर गटांगळ्या खात आहे. २०१९ साली तो वाढून किती वाढणार? स्वतः शरद पवार हे वास्तवाचे भान ठेवून पंतप्रधानपदाबाबत बोलत असतात.

पंतप्रधान होण्यासाठी लोकसभेत ‘आकडा’ असावा लागतो. तो आकडा नसल्याने पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहण्यात अर्थ नाही, असे ते अनेकदा सांगत असतात. हे जरी खरे असले तरी २०१४ची हवा २०१९ सालात राहणार नाही हे सत्य कोणीही नाकारणार नाही. ३५० जागांचे भाजपचे लक्ष्य असले तरी सध्याचा २८०चा ‘आकडा’ तरी लागेल काय यावर त्यांच्याच पक्षात चिंतन व मंथन सुरू आहे. त्यामुळे पुन्हा पैसा व ईव्हीएमचाच वापर होईल काय ही चिंता आहेच. मध्य प्रदेशातील एका निवडणुकीत काँग्रेस चिन्हावर अंगठा दाबूनही पुन्हा कमळावरच मत पडले व तशी छापील चिठ्ठी त्या मशीनमधून बाहेर पडल्याने २०१९ साली भाजपला ‘सात-आठशे’ जागा मिळाल्या तरी कुणाला धक्का बसणार नाही. ही लोकभावना आहे व आम्ही ती मांडत आहोत. नितीश कुमार यांना पंतप्रधान व्हायचेच होते, पण त्यांचे स्वप्न गुलामीच्या बेड्यांत कायमचे जखडून पडले. शरद पवार हे देशातील राजकारणात व अनुभवात ‘सर्वार्था’ने ज्येष्ठ असले तरी ‘आकडा’ कसा लागणार यावर चिंतन करायला कोणी तयार नाही. कोणत्याही एका पक्षास वा आघाडीस बहुमत मिळाले नाही, तर सर्वमान्य उमेदवार म्हणून पवारांचे नाव पुढे केले जाईल व ते पंतप्रधान होतील हा विचार बरा असला तरी तो खरा ठरेल काय? पवारांचे सर्वच राजकीय पक्षांत मित्र आहेत, पण राजकीय शर्यतीत हेच मित्र पाठ दाखवतात किंवा पाठीत वार करतात याचा अनुभव शिवसेना घेत आहे. काँग्रेसची ताकद किती वाढतेय व भाजपची किती घटतेय यावरही पुढची गणिते ठरणार आहेत.

शरद पवार यांची करंगळी पकडून आपण राजकारणात आल्याचे पंतप्रधान मोदी सांगत असतात. कृषी, सहकार वगैरे क्षेत्राबाबत मोदी कदाचित पवार यांच्याशी बोलत असावेत आणि असा सल्ला त्यांच्याकडून घ्यावा एवढे ते नक्कीच मोठे नेते आहेत. आम्हीसुद्धा अधूनमधून याच विषयांवर त्यांच्याशी सल्लामसलत करीत असतो. मोदी तर ‘पवार हे आपले राजकीय गुरू आहेत’ असे अहमदाबादी पतंग बारामतीत जाऊन उडवत असतात, पण गुरुवर्यास पंतप्रधानपदाची संधी मिळत असेल तर मोदी त्यांना पाठिंबा देतील काय? आणखी २५ वर्षे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसावे अशी मोदी यांची इच्छा आहे. मोदी यांची इच्छा सरस की पटेलांचे बौद्धिक प्रबळ हे येणारा काळच ठरवील. प्रफुल्ल पटेल यांनी एक चांगले सांगितले. मोदी हेच शरद पवारांची स्तुती करीत असतात, शरद पवारांनी कधी मोदींचे गुणगान केले आहे काय? अर्थात या प्रश्नाचे उत्तरदेखील २०१९लाच मिळेल. जनता शहाणी आहे, पण ईव्हीएम मशीनचे डोके बिघडवून काही लोक शहाणपण विकत घेतात तेव्हा देशाच्या भविष्याची चिंता वाटते. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातील ‘बौद्धिक’ विचार करायला लावणारे आहे. यानिमित्ताने एक झाले, पवारांच्या पक्षातही चिंतनास जागा आहे व पटेल हे पक्षाचे ‘बौद्धिक प्रमुख’ आहेत याचा साक्षात्कार झाला. संघ विचारांचा हा पगडा मानावा काय?

Web Title: saamana editorial on ncp and sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.