Purushottam Karandak: ‘अरे आव्वाज कुणाचा“च्या आरोळ्यांनी भरत नाट्यमंदिर दुमदुमणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 09:26 AM2022-07-07T09:26:14+5:302022-07-07T09:29:16+5:30

‘पुरुषोत्तम करंडक’ एकांकिका स्पर्धा ऑगस्टमध्ये होणार; एका वर्षात दोनदा स्पर्धा रंगणार

purushottam karandak competition start in august | Purushottam Karandak: ‘अरे आव्वाज कुणाचा“च्या आरोळ्यांनी भरत नाट्यमंदिर दुमदुमणार

Purushottam Karandak: ‘अरे आव्वाज कुणाचा“च्या आरोळ्यांनी भरत नाट्यमंदिर दुमदुमणार

Next

पुणे : ‘अरे आव्वाज कुणाचा’च्या आरोळ्यांनी लवकरच भरत नाट्यमंदिर दुमदुमणार आहे. महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य भाग असलेली ‘पुरुषोत्तम करंडक’ एकांकिका स्पर्धा ऑगस्टमध्ये रंगणार आहे. एका महिन्यावर आलेल्या स्पर्धेमुळे संघांची जय्यत तयारी सुरू आहे. यंदाची स्पर्धा दोन वर्षांच्या कालखंडानंतर पुण्यासह नेहमीप्रमाणे पाचही केंद्रांवर होणार आहे. एका वर्षात दोनदा स्पर्धा रंगत असल्याने तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी दरवर्षी ऑगस्टमध्ये आणि अंतिम फेरी सप्टेंबरमध्ये रंगते. मात्र, कोरोनामुळे २०२० मध्ये स्पर्धा होऊ शकली नाही; परंतु कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर आणि नाट्यगृहे उघडल्यानंतर गतवर्षीची (२०२१) स्पर्धा जानेवारी २०२२ मध्ये झाली. मात्र, पुणे आणि कोल्हापूर, अशा दोन केंद्रांवर ही स्पर्धा झाली होती. आता सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा तरुणाईच्या हक्काची ही स्पर्धा पाचही केंद्रांवर रंगणार आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यामुळे आणि महाविद्यालये सुरू असल्याने यंदा ५७ वी स्पर्धा म्हणजेच २०२२ या वर्षासाठीची स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेचे आयोजन कधी?

यंदा स्पर्धेची प्राथमिक फेरी १४ ते २९ ऑगस्टदरम्यान भरत नाट्यमंदिरात पार पडणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशपत्रिका १४ व १५ जुलै रोजी शुक्रवार पेठेतील महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेच्या कार्यालयात सायंकाळी सहा ते आठ या वेळेत उपलब्ध असणार आहेत. प्रवेशपत्रिका मिळवण्यासाठी महाविद्यालयाच्या लेटरहेडवर प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का आणि महाविद्यालयाचा शिक्का यासह ‘चिटणीस, महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे’ या नावाने अर्ज करणे आवश्यक आहे.

''१४ ते २९ ऑगस्टदरम्यान पाचही केंद्रांवर प्राथमिक फेरी होईल. अंतिम फेरी साधारपणे १७ आणि १८ सप्टेंबर महिन्यात होणार आहे. पुण्यासह कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, नागपूर, अमरावती या केंद्रांवर प्राथमिक फेरी होईल. जानेवारी २०२२ मध्ये ५६ वी स्पर्धा पार पडली. ऑगस्टमध्ये ५७ वी स्पर्धा होणार आहे. - मंगेश शिंदे (महाराष्ट्रीय कलोपासक)''  

Web Title: purushottam karandak competition start in august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.