पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तीन वसाहती कधीही कोसळू शकतात..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 12:22 PM2019-05-17T12:22:07+5:302019-05-17T12:25:44+5:30

पालिकेच्यावतीने पावसाळ्यापुर्वी करावयाच्या आपत्कालीन कामांचे सर्वेक्षण सुरु आहे.

Pune Municipal Corporation employees colonies building can collapse Anytime | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तीन वसाहती कधीही कोसळू शकतात..

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तीन वसाहती कधीही कोसळू शकतात..

googlenewsNext
ठळक मुद्देपालिकेचा अहवाल : पावसाळ्यापुर्वी रहिवाशांचे स्थलांतर करणे अत्यावश्यक

पुणे : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची दुरावस्था झालेली असून याविषयी अनेकदा तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत. परंतू, पावसाळापूर्व करावयाच्या कामांमध्ये या चाळींचे सर्वेक्षण करण्यात आले. पालिकेच्या तीन वसाहतींच्या इमारतींमधील सदनिका राहण्यायोग्य नसून या इमारती पावसाळ्यामध्ये कोसळू शकतात असा अहवाल अतिरिक्त आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या ३५० कुटुंबांचे स्थलांतर करणे आवश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
पालिकेच्यावतीने पावसाळ्यापुर्वी करावयाच्या आपत्कालीन कामांचे सर्वेक्षण सुरु आहे. धोकादायक वसाहतींचेही चाळ विभागाकडून सर्वेक्षण करुन घेण्यात आले. वाकडेवाडी येथील संभाजीनगर, घोरपडे पेठ कॉलनी क्रमांक ८ व ९, साने गुरुजी नगर येथील अंबिल ओढा वसाहतीमधील इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. वाकडेवाडी येथील वसाहतीमध्ये एकूण नऊ इमारती आहेत. या इमारती तीन मजली असून याठिकाणी 288 सदनिकाधारक आहेत. या सर्व सदनिका राहण्यायोग्य नसल्याचे तसेच अत्यंत धोकादायक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
यासोबतच घोरपडे पेठेतील कॉलनी क्रमांक ८ मध्ये पाच आणि कॉलनी क्रमांक ९ मध्ये बारा अशा एकूण १७ इमारती आहेत. या सर्व इमारतींचे पालिकेच्या मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर साने गुरुजी नगर अंबिल ओढा वसाहतीमध्ये ११ इमारती असून दहा इमारती दोन मजली आहेत. तर एक इमारत तीन मजली आहे. याठिकाणी एकूण ४५५ सदनिकाधारक आहेत. यापैकी इमारत क्रमांक दहाही अत्यंत धोकादायक असून येथील २४ सदनिकाधारकांचे पावसाळ्यापुर्वी त्वरीत अन्यत्र स्थलांतर करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
=====
पाहणी अहवालातील ठळक निरीक्षणे
बºयाचशा सदनिकांच्या टॉयलेट्स व बाथरुममध्ये गळती होत असून भिंतींमधून उगवलेल्या वड, पिंपळाच्या झाडांमुळे भेगा पडल्या आहेत. तसेच स्लॅब धोकादायक बनले आहेत. अनेकांच्या घरांमधील सिलिंगच्या प्लास्टरला तडे गेले असून स्लॅबचे स्टील उघड्यावर आले आहे. स्टीलला गंज चढल्याने ते कमकुवत बनले आहेत. काही इमारतींमधील पॅसेजमधील पॅरापेटाच्या भिंती पडायला आल्या आहेत. काही इमारतींमधील बीम व कॉलम जीर्ण झाल्याने इमारतींचा सांगाडा (आरसीसी स्ट्रक्चर) धोकादायक बनले आहे. काही ठिकाणी पॅसेजला बाक आला असून त्याला आधार देण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी सज्जे तुटलेले आहेत. तर काही इमारती पुढील बाजूस झुकल्या आहेत. यासोबतच पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामधून दुषित पाणीपुरवठा होत आहे. मैलापाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज लाईन्स व ड्रेनेज चेंबर्स घूस लागल्याने तुंबत आहेत. 

Web Title: Pune Municipal Corporation employees colonies building can collapse Anytime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.