डीएसकेंची कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 06:20 AM2018-02-28T06:20:07+5:302018-02-28T06:20:07+5:30
बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या पोलीस कोठडीतील चौकशीतून पुढे आलेल्या माहितीनुसार...
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या पोलीस कोठडीतील चौकशीतून पुढे आलेल्या माहितीनुसार आता पोलिसांनी त्यांच्याकडील महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी मंगळवारी दिवसभर या कामात व्यस्त होते.
आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी डी़ एस़ कुलकर्णी यांच्या ६ आलिशान गाड्या जप्त केल्या. डीएसके यांच्या मालमत्तेची माहिती पोलिसांनी जिल्हाधिका-यांकडे दिली असून त्यांनी मावळ प्रांत यांना सक्षम अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनी डीएसके यांच्या २४६ मालमत्तांचा प्रस्ताव गृह विभागाला सादर केला असून येत्या काही दिवसांत त्याची आधीसूचना निघण्याची शक्यता आहे. डीएसके यांच्या या ६ आलिशान मोटारी जप्त केल्याची माहिती पोलिसांनी मावळ प्रांत कार्यालयाला दिली आहे. यापुढील कारवाई त्यांच्यामार्फत होणार आहे.
डी़ एस़ कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांची मंगळवारी दिवसभर पोलिसांनी प्रामुख्याने ठेवीदारांनी दिलेले पैसे हे नेमके कोठे गेले, याविषयी विचारणा केली. त्यांच्याकडून मिळालेल्या काही माहितीच्या आधारे यासंबंधीची कागदपत्रे ताब्यात घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.