मोल जपण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची ‘फिल्मगिरी’
By Admin | Updated: January 24, 2017 02:19 IST2017-01-24T02:19:22+5:302017-01-24T02:19:22+5:30
सध्या राज्यामध्ये पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वाहतुकीचे नियम आणि त्याचे पालन

मोल जपण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची ‘फिल्मगिरी’
पुणे : सध्या राज्यामध्ये पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वाहतुकीचे नियम आणि त्याचे पालन यासोबतच अपघातग्रस्तांना मदत अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे. परंतु, एक पोलीस अधिकारी अनेक वर्षांपासून मानवतेच्या दृष्टिकोनातून ‘जीवन अमूल्य आहे आणि त्याचं रक्षण करायला पाहिजे,’ हा ध्यास घेऊन चक्क ‘फिल्मगिरी’ करीत आहे. आजवर तयार केलेल्या विविध डॉक्युमेंटरींच्या माध्यमातून अपघातांमागील गांभीर्य प्रकर्षाने मांडणारे सहायक पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांची नव्यानेच आलेली हेल्मेट वापरासंबंधीची शॉर्टफिल्म सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
महेश सरतापे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील म्हसवडचे राहणारे आहेत. १९९५मध्ये पोलीस दलात भरती झालेले सरतापे सध्या पुण्यामध्ये वाहतूक शाखेत नेमणुकीस आहेत. त्यांना मुळातच कलेची आवड असल्यामुळे विविध विषयांवर शॉर्टफिल्म बनवण्याचा त्यांना छंद आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहतूक शाखेमध्ये काम करीत असल्यामुळे महामार्गांवरील तसेच शहरातील भयानक आणि हृदयद्रावक अपघात, मानवी जीविताबाबतची उदासीनता, यंत्रणांनी करून ठेवलेल्या चुका यांमुळे अस्वस्थ झालेल्या सरतापेंनी याच विषयावर फिल्म तयार करायचे ठरविले.
रस्त्यावर वाहतूककोंडी झालेली असताना किंवा अनेकदा जाणीवपूर्वक रुग्णवाहिकेला रस्ता दिला जात नाही. सायरन वाजवत जात असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये रुग्णाची मृत्यूशी झुंज सुरू असते. लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचल्यास त्याचा जीव वाचण्याच्या शक्यता वाढतात. परंतु, रुग्णवाहिकेला रस्ता दिला जात नसल्यामुळे किंवा रस्ता उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकदा रुग्णांच्या प्राणावर बेतते. हाच विषय घेऊन त्यांनी ‘रुग्णवाहिकेला रस्ता द्या’ ही शॉर्टफिल्म तयार केली. या शॉर्टफिल्मला ३० लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी सोशल मीडियावरून पसंती दिली. तर, नुकतीच त्यांनी ‘हेल्पिंग हँड्स’ ही अपघातग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात फिल्म तयार केली होती. अपघात घडल्यानंतर गोल्डन अवरमध्ये जर रुग्णाला मदत मिळाली, तर त्याचे प्राण वाचतात. या विषयावरच्या फिल्मला १० पुरस्कार मिळाले आहेत. यासोबतच राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्येही नामांकने मिळाली आहेत. यासोबतच महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांवरही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली होती. गणेशोत्सवामध्ये पोलीस बंदोबस्तात पोलिसांना होणारा त्रास, आरोग्याच्या समस्या, ताणतणाव, नागरिकांकडून न मिळणारा प्रतिसाद, मनस्ताप यावर प्रकाश टाकणारी फिल्मही त्यांनी तयार केली होती.
‘राजू द सेव्हियर’ ही राजू काची या तरुणाच्या वास्तव जीवनावर आधारित फिल्मही पसंतीस उतरली. झोपडपट्टीमध्ये राहणारा हा तरुण अपघातग्रस्त, कुजलेल्या, खून झालेल्या, नदी वा नाल्यात वाहत आलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम करतो. पोलिसांना त्याची मोलाची मदत मिळते. या फिल्मलाही ४ पुरस्कार मिळाले आहेत. सरतापेंचा फिल्म तयार करण्यामागील हेतू अव्यावसायिक असल्याने कलाकारही मानधन न घेता काम करतात. समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखून कलाकार वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत, याकरिता या शॉर्टफिल्ममध्ये आनंदाने काम करतात. (प्रतिनिधी)