पठ्ठे बापूराव आणि बालगंधर्व महाराष्ट्राला पडलेले सुंदर स्वप्न : श्रीनिवास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 07:09 PM2018-04-13T19:09:05+5:302018-04-13T19:09:05+5:30
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा आणि लोकरंग सांस्कृतिक मंच आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय तिसऱ्या मराठी लोककला संमेलनात नागरिकांना ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडविले.
विश्वास मोरे
पठ्ठे बापूराव कलानगरी (पिंपरी-चिंचवड) : क्षणभरात रुंजी घालून ताल धरायला लावते ती कला. मनातलं गाणं जनात आणि जनातले गाणं राहण्यात अवतरतो त्यातून लोकरंग खुलतो. लोककलांच्या समृध्द परंपरेची पालखी आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहणाऱ्या लोककलावंतांच्या पाठीवर थाप देऊन लढ म्हणण्याची गरज आहे़. लोकशाहीर पठ्ठे बापूराव, बालगंधर्व हे महाराष्ट्राला पडलेले सुंदर स्वप्न आहे़, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
अविस्मरणीय प्रसंगाचे निमित्त होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा आणि लोकरंग सांस्कृतिक मंच आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पठ्ठे बापूराव कलानगरीतील अखिल भारतीय तिसऱ्या मराठी लोककला संमेलनाचे. याप्रसंगी अवघ्या महाराष्ट्राची कलासंस्कृती येथे अवतरली होती. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी स्वागत समितीचे अध्यक्ष महापौर नितीन काळजे, संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, शालिनीदेवी पाटील, स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मुख्य निमंत्रक आमदार लक्ष्मण जगताप, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर,उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, डॉ. प्रकाश खांडगे, प्रवीण भोळे, राही भिडे, मुख्य संयोजक प्रवीण तुपे आदी उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाले, संतांची आणि क्रांतिकारकांची आणि साध्या माणसांची ही भूमी आहे. मराठी मातीतील कला म्हणजेच लोककला. या लोककलांच्या उत्सवाचा मी साक्षीदार झालो. खऱ्या अर्थाने आयुष्य सार्थकी लागल्याची भावना मनात आहे.
संमेलनाच्या पूर्वरंगाचा नयनरम्य सोेहळा
रामचंद्र देखणेंनी लोककलांच्या विविध ग्रंथांचे पूजन केल्यावर उपस्थित मान्यवरांसह लोककलांवतांची पालखी रामकृष्ण मोरे सभागृहाकडे मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत नऊवारी साडी लेऊन फेटा परिधान केलेल्या महिलांच्या फुगड्या, दांडपट्टयाचे मर्दानी खेळ, ढोलकीच्या तालावर सुुरु असलेली लावणी, आधी नमन माय मराठीला..असे शाहिरी पोवाडे, बये दार उघड म्हणत अंगावर आसूड ओढणारे कडकलक्ष्मी, रामाच्या पारी...दान पावलं सांगत वासुदेव, वाघ्या-मुरळी, एकतारी, वारकरी दिंडी, लमाण तांडा नृत्य, धनगरी नृत्य आदी लोककला आणि लोक भूमिकांनी महाराष्ट्राची संमेलनात एक वेगळाच रंग भरला. लोककला संमेलनात नागरिकांना ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडविले. हलगी ठेका, ढोल-ताशांचा गजर, ढोलकीने ताल, शाहिरी गरजली, बये दार उघड म्हणत कडकलक्ष्मी आली, दान पावलं...सांगणारा वासुदेव या सर्वांच्या विलोभनीय दर्शनाने लोकरंग गहिरा झाला.
या कार्यक्रमात अभिनेत्री लीलाताई गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार,तर प्रभाकर मांडे यांना कलागौरव,वसंत अवसरीकर (सोंगाड्या), प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी संजीवनी मुळे-नगरकर (लोकनाट्य), बापूराव भोसले (गोंधळी), अभ्यासक सोपान खुडे (साहित्य गौरव), युवा कीर्तनकार पुरुषोत्तममहाराज पाटील (कीर्तन), कलगी शाहीर मुरलीधर सुपेकर (शाहीर), प्रतीक लोखंडे (युवा शाहीर) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संमेलनाच्या व्यासपीठावरुन अध्यक्षीय भाषणात देखणे म्हणाले, लोककला संस्कृतीचा मी वारकरी आहे. लोककला हा पाचवा वेद आहे. लावणी ही शास्त्रीय संगीतासारखी ठुमरी आहे. तर गण हा ख्यालासारखा आहे. अभिजात कला, साहित्य टिकावे, लोककला आणि लोककलावंतांच्या संवर्धनासाठी प्रयत्न व्हायला हवे. तसेच राज्यात लोककला विद्यापीठे सुरू व्हायला हवीत, कलावंतांच्या पाठीवर थाप दिल्यास कला आणि कलावंतांचा विकास होईल. पठ्ठे बापूरावांच्या संग्रहाचे महापालिकेने जतन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भाऊसाहेब भोईर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. प्रकाश खांडगे यांनी आभार मानले.
.........................
हशा आणि टाळ्या
श्रीनिवास पाटील यांनी आपल्या ओघवत्या अस्सल मराठमोळ्या शैलीत पठ्ठे बापूरावांपासून जगदीश खेबुडकर, लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, मंगला बनसोडे, लीला गांधी, वसंत अवसरीकरपर्यंत सर्वांचे सांगितलेले किस्से रंगमंदिरातील उपस्थितांचे हशा व टाळ्या वसूल केल्या.