पीएमपीच्या नवनियुक्त अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यासमोर अनेक आव्हाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 13:15 IST2018-02-10T13:12:37+5:302018-02-10T13:15:10+5:30
पीएमपीएमएलमधील मनमानी कारभाला चाप लावण्यासाठी तत्कालीन सीएमडी तुकाराम मुंढे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पीएमपीची बसलेली घडी आता विस्कटू न देण्याचे आव्हान नवनियुक्त सीएमडी नयना गुंडे यांच्यासमोर असणार आहे.

पीएमपीच्या नवनियुक्त अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यासमोर अनेक आव्हाने
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपीएमएल) मनमानी कारभाला चाप लावण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) तुकाराम मुंढे यांनी १० महिन्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे महामंडळाचे चाक काहीसे रुळावर आले होते. पीएमपीची बसलेली घडी आता विस्कटू न देण्याचे आव्हान नवनियुक्त सीएमडी नयना गुंडे यांच्यासमोर असणार आहे.
कंपनी कायदा अस्तित्वात असताना एकाधिकारशाही पद्धतीने येथील कामकाज सुरू होते. त्यास मुंढे यांनी चाप लावला असून प्रत्येक कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून राजकीय हस्तक्षेपदेखील बंद केला आहे. दरम्यान, मुंढे यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली झाल्याने महामंडळातील कामचुकार अधिकारी व कर्मचारी पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. या सर्वांना त्यांच्या जागेवरच ठेवून प्रवासीहिताचे निर्णय घेण्याचे आव्हान गुंडे यांच्यासमोर राहील. तसेच दैनंदिन प्रवासीसंख्या, उत्पन्न व मार्गावरील बसची संख्या वाढविणे त्याचबरोबर ब्रेक डाऊन, प्रवाशांच्या तक्रारी, डेड किलोमीटर, प्रतिबस अनावश्यक खर्च कमी करण्याचे कामदेखील गुंडे यांना प्रामुख्याने करावे लागणार आहे़
गित्ते यांच्याकडे पदभार
तुकाराम मुंढे यांची बदली केल्यानंतर पीएमपीचे सीएमडी पद रिक्त झाल्याने त्या पदावर नवनियुक्त अध्यक्ष नयना गुंडे यांची नियुक्ती केली आहे. त्या १४ फेब्रुवारीदरम्यान पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात पीएमपीच्या प्रशासकीय कामकाजात अडथळ येऊ नये, म्हणून पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.