महालक्ष्मी एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; महिलेचं हिसकावलं मंगळसूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:41 IST2017-10-26T14:24:50+5:302017-10-26T14:41:33+5:30
महालक्ष्मी एक्सप्रेस मध्यरात्री दीडच्या सुमारास राजेवाडी-जेजुरी दरम्यान सिग्नलला थांबली असताना तिच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला़. चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले़.

महालक्ष्मी एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; महिलेचं हिसकावलं मंगळसूत्र
पुणे : पुण्यातून कोल्हापूरला जात असलेली महालक्ष्मी एक्सप्रेस मध्यरात्री दीडच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. राजेवाडी-जेजुरी दरम्यान सिग्नलला थांबली असताना तिच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेलं.
याबाबत रेल्वे पोलिसांनी सांगितले की, महालक्ष्मी एक्सप्रेस जेजुरीजवळ कॉसिंगला थांबली असताना एक महिला कोणते स्टेशन आले हे पाहण्यासाठी बाहेर डोकावून पहात होती. त्यावेळी चोरट्यांनी तिच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसका मारुन चोरुन नेलं. त्यानंतर या महिलेने सातारा रेल्वे स्टेशनवर जाऊन या घटनेची माहिती दिली. त्यांना मिरज रेल्वे पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगण्यात आलं आहे.
तसंच इतरही डब्यांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली आहे. त्यांच्या तक्रारी घेण्याचं काम मिरज येथे सुरु आहे. पुणे रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपास करीत आहे.