साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे प्रभावी माध्यम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 02:57 PM2018-01-07T14:57:51+5:302018-01-07T14:58:54+5:30

साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे एक प्रभावी माध्यम असून डॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या समाजातील दानशूरांनी सहित्यिक उपक्रमांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी केले.

Literature is an effective medium to enhance human life | साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे प्रभावी माध्यम

साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे प्रभावी माध्यम

googlenewsNext

पुणे : बदलत्या काळातील विविध आव्हानांचा सामना सगळ्याच भाषांमधील साहित्याला करावा लागत आहे. साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे एक प्रभावी माध्यम असून डॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या समाजातील दानशूरांनी सहित्यिक उपक्रमांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी केले.

आचार्य अत्रे सभागृहात अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे संयोजित आणि डॉ.डी.वाय.पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित  'उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा' या विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी. डी.पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरून मिरासदार बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले उपस्थित होते. यावेळी द. मा. मिरासदार यांनी सांगितलेल्या  ‘भानाचे भूत’ या कथेचा आस्वाद रसिकांनी घेतला. 

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, आज साहित्य क्षेत्रात प्रचंड चढ-उतार सुरु असून मोठ्या प्रमाणावर गाजलेल्या कसदार पुस्तकांच्या आवृत्या निघणे बंद झाले आहे. मराठी प्रकाशन व्यवसायाला नवसंजीवनी आणि चैतन्य प्राप्त करून देण्यासाठी सरस्वतीचा ईश्वरी संकेत लक्षात घेऊन त्या दिशेने डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाने अक्षरधाराबरोबर टाकलेले हे पहिले पाऊल आहे. पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशकांनी लावलेल्या स्टॉल्सद्वारे मोठी आर्थिक उलाढाल झाली होती. सध्याची पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आॅनलाईन सुविधेचा लाभ घेत आहे. मात्र, त्यामुळे पुस्तकांच्या दुकानात सहकुटुंब जाऊन खरेदी करण्याचा आणि नव्या कोºया पुस्तकांचा दरवळ अनुभवण्याचा आनंद ही पिढी गमावते आहे, असे खेदाने म्हणावे लागते. वाचन संस्कृती टिकवायची आणि वाढवायची असेल तर कसदार लेखक आणि कवींची फळी निर्माण करावी लागेल.

अच्युत गोडबोले म्हणाले की, ललित आणि विज्ञान असे साहित्याचे दोन प्रकार करून त्यामध्ये डावे-उजवे करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. साहित्याचे हे दोन्ही प्रकार आपापल्या ठिकाणी तितकेच महत्त्वाचे असून या दोहोंची आपापली बलस्थाने आणि उणीवा आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. पाश्चात्य ललित साहित्यामुळे मी लेखन करण्यास प्रवृत्त झालो. माणसातील माणूसपण जपण्यासाठी कसदार ललित साहित्याच्या निर्मितीची गरज आहे. अलिकडे प्रकाशक देखील ललित साहित्य प्रकाशित करण्यास फारसे उत्सुक असल्याचे दिसून येत नाही. अस्सल ललित लेखनाची निर्मिती आणि त्याचे प्रकाशन या दोन्ही बाबतीत आग्रही राहणे गरजेचे आहे. साडेतील टक्क्यांचे साहित्यिक आणि साहित्य ही चौकट मोडून समाजाच्या तळागाळातील जीवन जगून, अनुभवून मनाला भिडणाºया साहित्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. तसेच बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार साहित्य क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी केला पाहिजे. भविष्यात वाढणारे तंत्रज्ञानाचे महत्त्व वेळीच ओळखले पाहिजे. कारण आपल्यापर्यंत पोहोणारे साहित्य कसदार आहे की नाही हे महत्त्वाचे असून विशिष्ट घटक लिहितो आणि विशिष्ट घटक वाचतो, हे चित्र बदलले पाहिजे. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षरधाराच्या संचालक रसिका राठीवडेकर यांनी केले. सिद्धार्थ बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले, तर अक्षरधाराचे संचालक रमेश राठीवडेकर यांनी आभार मानले. 

Web Title: Literature is an effective medium to enhance human life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.