संवादाचा अभाव : ‘स्क्रीन अ‍ॅडिक्शन’मुळे मानसिक अनारोग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 02:58 AM2018-12-24T02:58:33+5:302018-12-24T02:59:24+5:30

तुमची मुलं सतत मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर असतात काय, कोणी अचानक आलेच तर दचकणे, घाबरणे, मोबाइल लपविण्याचा प्रयत्न करणे, चिडचिड करणे, अंगावर धावणे असे प्रकार त्याच्यासोबत घडत आहेत काय, असे प्रकार घडत असतील तर मग सावधान...

Lack of communication: mental ailments due to 'screen adjectives' | संवादाचा अभाव : ‘स्क्रीन अ‍ॅडिक्शन’मुळे मानसिक अनारोग्य

संवादाचा अभाव : ‘स्क्रीन अ‍ॅडिक्शन’मुळे मानसिक अनारोग्य

googlenewsNext

- लक्ष्मण मोरे
पुणे - तुमची मुलं सतत मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर असतात काय, कोणी अचानक आलेच तर दचकणे, घाबरणे, मोबाइल लपविण्याचा प्रयत्न करणे, चिडचिड करणे, अंगावर धावणे असे प्रकार त्याच्यासोबत घडत आहेत काय, असे प्रकार घडत असतील तर मग सावधान... हे एक व्यसन जडू पाहत आहे. मानसोपचारतज्ज्ञांनी त्याला ‘स्क्रीन अ‍ॅडिक्शन’ असे नाव दिले आहे. या अ‍ॅडिक्शनमुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर विपरीत परिणाम होऊ लागला असून यासंदर्भातील तक्रारी घेऊन पालक व्यसनमुक्ती केंद्राचे उंबरठे झिजवू लागले आहेत.
माझा मुलगा मोबाइलवर सतत काय पाहत असतो काय माहीत, पण त्याच्यामध्ये खूप विचित्र बदल झाल्याचे जाणवत राहते. हल्ली ना त्याची भीतीच वाटते. आम्हाला पाहिलं की गडबडतो, मोबाइल लपविण्याचा प्रयत्न करतो, प्रसंगी अंगावर धावून येतो, अशा अनेक मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप, संगणक याचे अतिप्रमाणात वेड मुलांमध्ये नव्या मानसिक आजारांची पेरणी करू लागले आहे. तसेच हे वेड पारिवारीक स्वास्थ्यावरही दुष्परिणाम करू लागले आहे.
त्यामुळे पालकांना मुलांच्या या ‘अ‍ॅडिक्शन’ला कसा लगाम घालावा, हेच समजेनासे झाले आहे. अनेक पालकांनी याबाबत समोरासमोर चर्चा केल्यानंतर मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये ही समस्या अधिक तीव्र असल्याचे समोर आले आहे. यामध्ये शहरी आणि ग्रामीण असा फरक राहिलेला नाही. या स्क्रीन अ‍ॅडिक्शनच्या विळख्यात शाळकरी मुले आणि तरुणाई दिवसेंदिवस जखडली जाऊ लागली आहे. अन्य व्यसनांप्रमाणेच ‘स्क्रीन’चे व्यसनही घातक ठरू लागले आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन तरुणांसह विवाहित नागरिकांमध्ये हे प्रमाण वाढू लागले आहे. पालकांची बेजबाबदार वृत्ती याला कारणीभूत
आहे. वेळीच उपाययोजना आणि काही पथ्य घरामध्ये पाळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

काय आहे ‘स्क्रीन अ‍ॅडिक्शन’?

स्क्रीन अ‍ॅडिक्शन म्हणजे टीव्ही, मोबाइल, कॉम्प्युटरचे व्यसन. सतत स्क्रीनसमोर बसून राहणे. त्यामध्ये उद्वेग वाढविणारे, नैराश्य आणणाऱ्या गोष्टी सातत्याने पाहणे हे एक प्रकारचे व्यसन आहे.

सतत गेम खेळणे, मोबाइलवर अतिप्रमाणात पॉर्न पाहण्यामुळे मुलांच्या वागण्यात विचित्रपणा येऊ लागला आहे. सोशल मीडियावरील अतिसक्रियतेमुळेही चिडचिड वाढत आहे.

का होते आकर्षण निर्माण?

आई आणि वडील दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे मुलांसाठी द्यायला नसलेला वेळ ही मोठी समस्या अनेक घरांमध्ये आहे. मुलांचा सांभाळ करण्यासाठी, त्यांना संस्कारक्षम गोष्टी सांगण्यासाठी घरामध्ये आजी-आजोबा नाहीत.

विभक्त कुटुंब पद्धतीचा हा फटका जवळपास सर्वच कुटुंबांना बसत आहे. अशा वेळी पालक पाच-सहा वर्षांच्या मुलांच्या हातामध्ये मोबाइल देऊन स्वत:ची सुटका करून घेत आहेत.

मुलांना मोबाइलवर गेम, गाणी अथवा कार्टून लावून दिले की, पालक निर्धास्त होतात. सुरुवातीला मुलांसाठी हा विरंगुळा असतो. मात्र, नंतर ही त्यांची सवयच बनून जाते.

काही अवधीनंतर मुलांच्या हातून मोबाइल सुटत नाही. त्यांचे अभ्यासात, जेवणात आणि मैदानी खेळ खेळण्यात लक्ष लागत नाही. एकाग्रता, सर्जनशीलता, कल्पकता कमी होते.

५ ते १२ वयोगट सर्वांत संवेदनशील

शाळकरी मुले घरातील कोणालाही न सांगता दप्तरामध्ये किंवा जेवणाच्या डब्यात लपवून मोबाइल नेतात. तसेच पालकच मुलांच्या दप्तरात मोबाइल ठेवतात. याची काहीही आवश्यकता नाही.
ही मुले यूट्यूूबसारखे अ‍ॅपही स्वत:च आॅपरेट करीत असल्याने ती नेमकी काय पाहतात, याकडे पालकांचे लक्ष असणे आवश्यक आहे. ५ ते १२ हा वयोगट सर्वाधिक संवेदनशील असून मानसिक व शारीरिक जडणघडणीच्याच काळात या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या विकासाची दिशा भरकटण्याची शक्यता असते.
या उलट मुले ही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स कशी हाताळतात, याचेच खरेतर कौतुक असते.

1अनेकदा पालक घरामध्ये मुलांशी किंवा एकमेकांशी संवाद साधत नाहीत. सतत मोबाइल, सोशल मीडिया, लॅपटॉप, संगणकावर काम करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे मुलांनाही आपसुकच या वस्तूंचे आकर्षण वाटू लागते. मुलांनाही ही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स खेळण्यांप्रमाणे वाटू लागली आहेत.

2सध्या विविध गेम्सचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांत ‘पब जी’ ही गेम सर्वाधिक लोकप्रिय आहे. यासोबतच ब्ल्यू व्हेलसारख्या गेम्समुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत. यासोबतच स्ट्रायकिंगसारख्या गेम खेळून मुलांमधील आक्रमकता वाढू लागली आहे.

3पालक मुलांना मोबाइलवरच छान छान गोष्टी, बडबड गीते, कार्टून मुव्ही लावून देतात. अलिकडच्या काळात लहान मुलांना रिझवण्यासाठी तसेच झोपवण्यासाठी मोबाइलवर अंगाई गीते लावण्याची पद्धत रुढ होऊ लागली आहे. त्यामुळे नवजात बालकांच्याही हातामध्ये मोबाइल दिसू लागले आहेत. त्यामुळे मुलांच्या सर्जनशीलतेवर परिणाम होत आहे. कल्पनाशक्ती लढवणे, मैदानी खेळ खेळणे, यामध्ये त्यांना रस राहिलेला नाही.

आजारपणाची लक्षणे

मुलांची भूक कमी होत जाते किंवा खूप भूक लागते.
निद्रानाश, मानसिक आजार, चिंतातूर राहणे.
अस्वस्थतेची भावना निर्माण होणे.
मुलांचे अंगावर धावून जाणे.
सतत भांडणाच्या मानसिकतेमध्ये असणे.
घरातील वस्तूंची फेकाफेक करणे.
डोळे मिचकावणे, चष्मा लागणे.
पाठीला बाक येणे, कणा वाकणे.
मान आणि पाठदुखीचा सतत त्रास होणे.
शाळेत आणि अभ्यासात लक्ष न लागणे.
सतत हट्ट करणे.
अटी घालून अभ्यास किंवा घरातील कामे करणे.
खोटे बोलण्याची सवय जडणे. एकाग्रता कमी.
 

Web Title: Lack of communication: mental ailments due to 'screen adjectives'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.