माफ करा पण मला आत्महत्या करावीशी वाटतेय; विवाहितेच्या फेसबुक पोस्टनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 09:33 PM2018-11-24T21:33:29+5:302018-11-24T21:35:40+5:30

पोलिसांनी महिलेच्या घरी धाव घेऊन तिला मानसिक बळ दिलं

i want to suicide women post on on facebook police reaches for help | माफ करा पण मला आत्महत्या करावीशी वाटतेय; विवाहितेच्या फेसबुक पोस्टनं खळबळ

माफ करा पण मला आत्महत्या करावीशी वाटतेय; विवाहितेच्या फेसबुक पोस्टनं खळबळ

बारामती: माहेरच्यांसह सासरच्यांनी दुर्लक्षित केल्याचा आरोप करुन बारामती शहरातील विवाहितेने आजारपणाला कंटाळून आत्महत्या करावीशी वाटत असल्याची फेसबुकवर पोस्ट केली. ‘माफ करा पण मला आत्महत्या करावीशी वाटत आहे’ अशी भावना त्यांनी या पोस्ट मध्ये व्यक्त केली. त्यानंतर बारामती शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी तिचा शोध घेऊन त्या महिलेला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. संबंधितांविरोधात तक्रार करा, कडक कारवाई करुन कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे आश्वासन देत पोलिसांनी या महिलेला मानसिक बळ दिले. तर सोशल मिडीयावर २०० हून अधिक जणांनी ‘कमेंट‘ करत त्यांना त्यापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

फेसबुकवरील ही पोस्ट नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली. आजारपणामुळे खचल्याने आत्महत्या करावीशी वाटत असल्याचे हर्षदा राहुल झगडे यांनी या पोस्टमध्ये नमूद केल्याने खळबळ उडाली. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी ही पोस्ट केलेल्या हर्षदा यांचे भाडोत्री घर शोधून वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी वेगळेच सत्य पुढे आले. आजारपणाबरोबरच एका सावकाराच्या जाचाने निराश झाल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यातूनच त्यांनी ही पोस्ट केल्याचे वास्तव पुढे आले. 

हर्षदा यांचे माहेर पांडे (करमाळा) येथील आहे. त्यांचा २००९ साली विवाह झाला. मात्र, लग्नानंतर ६ महिन्यांतच त्यांचा वाद सुरु झाला. त्यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरु आहे. पती, दिर मनाने चांगले असून इतरांचा त्रास असल्याची त्यांची तक्रार आहे. २००६ मध्ये हर्षदा यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च झाला. त्यांनी चरितार्थासाठी भाडोत्री जागेत खानावळीचा व्यवसाय सुरु केला. मात्र, डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर घेतलेल्या औषधी गोळ्यांमुळे ‘साईड इफेक्ट’ झाला. हाडांवर विपरीत परिणाम होऊन शारीरिक व्याधी मागे लागल्याचे हर्षदा यांचे म्हणणे आहे.

या दरम्यान औषधोपचारासाठी हर्षदा यांनी ४ सप्टेंबर २०१७ रोजी नाईलाजस्तव बारामतीच्या  एका तरुणाकडून दरमहा २० टक्के व्याजदराने १ लाख रुपयांची रक्कम घेतली. त्याच्या व्याजापोटी जुलै २०१८ अखेर १० महिन्यांसाठी एकूण २ लाख रुपये दिल्याचा दावा केला आहे. त्यानंतर २१ एप्रिल २०१८ रोजी परत ५० हजार रुपये व्याजाने घेतले. त्यापोटी देखील जुलै २०१८ अखेर ३० हजार रुपये व्याज दिल्याचा हर्षदा यांचा दावा आहे. त्या तरुणाने बाहेरुन पैसे आणून दिले आहेत. व्याज थकल्याने त्या तरुणाने चक्रवाढ व्याज वसुली पद्धतीने पैसे देण्याची मागणी आहे. त्याची पत्नी, आई त्यासाठी दमदाटी करीत असल्याचा आरोप हर्षदा यांनी यावेळी केला. सावकारी व्याजाचे चक्रवाढ व्याज, दवाखान्याचा खर्च, व्यावसायिक जागेचे, रहत्या घराचे भाडे यांचा खर्च मोठा झाला आहे. तो माझ्या आवाक्याबाहेर गेल्याने जगणे नकोसे झाल्याचे हर्षदा यांची भावना आहे.

दरम्यान, हर्षदा यांची पोस्ट वाचल्यानंतर  बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी डी जी मेमाणे, रचना काळे यांनी त्यांचा शोध घेतला.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या फेसबुक पोस्टविषयी संवाद साधला. त्यामागची कारणे जाणून घेतली. यावेळी हर्षदा यांनी सावकाराकडून होणाऱ्या चक्रवाढ व्याजाच्या वसुलीची माहिती दिली. यावेळी हर्षदा हताश झालेल्या दिसून आल्या. त्यांना कोणाचाच आधार नाही, त्यात सावकारी वसुलीचा जाच सहन होत नाही. सावकाराने पैसे देण्यापूर्वी कोरे धनादेश घेतल्याने दडपण येते. आजारपणामुळे व्यवसाय बंद आहे. उत्पन्नाचे साधन नसल्याने पैसे आणणार कुठून, माझ्याकडे एक रुपयादेखील नाही, अशी व्यथा रडवेल्या स्वरात मांडली. यावर पोलीस कर्मचारी मेमाणे, काळे यांनी त्यांना धीर देत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, तुम्ही तक्रार करा, यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा झाली आहे, असे सांगत हर्षदा यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. हर्षदा या शहरातील बड्या हॉटेल व्यावसायिकाच्या पत्नी आहेत. त्यामुळे ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
 

Web Title: i want to suicide women post on on facebook police reaches for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.