गाेरक्षणासारखे पवित्र काम करणारा हिंसा कशी काय करु शकताे ? अमाेल पालेकरांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 06:06 PM2018-08-20T18:06:23+5:302018-08-20T18:07:41+5:30

डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या पाचव्या स्मतिदिनानिमित्त अायाेजित चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक अमाेल पालेकर यांनी अनेक सवाल उपस्थित केले.

how can gaurakshak can do violance ? asks amol palekar | गाेरक्षणासारखे पवित्र काम करणारा हिंसा कशी काय करु शकताे ? अमाेल पालेकरांचा संतप्त सवाल

गाेरक्षणासारखे पवित्र काम करणारा हिंसा कशी काय करु शकताे ? अमाेल पालेकरांचा संतप्त सवाल

पुणे : गोरक्षणासारखे पवित्र काम करणारा व्यक्ती एका माणसाची हिंसा कसा काय करू शकतो? आणि त्याच्या समर्थनासाठी 5 ते 6 हजार लोक कसे उभे राहू शकतात? असा संतप्त सवाल ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी उपस्थित केला. कुठलाही प्रश्न समोरच्या माणसाला विचारला तर तुम्ही गप्प बसा किंवा तुम्ही हा प्रश्न विचारताय म्हणजे तुम्ही सरकार विरोधी आणि देशद्रोही आहात असे एक चित्र उभे केले जात आहे. जोपर्यंत प्रश्न उपस्थित करीत नाही आणि  हे बरोबर नाही किंवा मग ते का बरोबर नाही असे पटवून द्या असा सरकारी व्यवस्थेला जाब विचारत नाही तोपर्यंत त्याला लोकशाही मानता येणार नाही, अशा शब्दातं त्यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले. 
    ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सानेगुरूजी स्मारक येथे ’जबाब दो’ हा आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 


    ते म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तपासात  काय प्रगती झाली? खूनी शोधण्यापासून कोण लोक यामागे आहेत? त्यांचे काय विचार आहेत?  हे सर्व कळायला पाच वर्षे उलटली, असा  विचार सर्वसामान्यांच्या मनात येतो. डॉ. दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणातील दुस-या आरोपीला अटक झाल्यानंतर देशात असे वातावरण निर्माण झाले आहे की सगळे आता  छान झालय आणि संपल्यात जमा आहे.  पण माझ्या मते आता ख-या अर्थाने तपासाला सुरूवात झाली आहे. पाच वर्षामध्ये जर फक्त दोन जणांना अटक होऊ शकते. मग अशाच गतीने हा तपास चालणार आहे का?अजून  किती वर्ष चालणार? न्यायसंस्थेने तपासावर आणलेल्या प्रश्नचिन्हांमुळे आपण इथवर आलो आहोत. यामागे असलेली राजकीय प्रणाली, इच्छाशक्ती आणि दडपण याचा सामान्य माणूस म्हणून दुरस्थ विचार करायला पाहिजे. राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन विचारप्रणालीवर होणारे हल्ले आपल्याला कसे थांबवता येतील याचा विचार केला पाहिजे. 


    विचारस्वातंत्र्याबददल जर प्रश्न विचारले तर त्याची मुस्कटदाबी होणार आहे का? विचारस्वातंत्र्य मागण्यासाठी जर चळवळी उभ्या राहिल्या, प्रश्न विचारले  तर त्याकडे देशद्रोह म्हणून पाहिले जाणार आहे का? असे काही प्रश्नही यावेळी पालेकर यांनी उपस्थित केले.  हे सर्व मुददे एका माणसाचे, कलावंताचे किंवा गटाचे असू शकत नाहीत तर ते सर्वांचे आहेत. फक्त ही कलावंत म्हणून माझी नव्हे तर सामान्य माणसाची मागणी आहे. प्रत्येक विचार त्याच्यापर्यंत जाताना दडपला न जाणे किंवा त्याच्यावर हल्ले न होणे यासाठी सामान्य माणसालाही विचारस्वातंत्र्य महत्वाचे आहे असे वाटत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहायला हवा. ही दडपशाही गांधींच्या खूनानंतर दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. तरीही आता गप्प बसायचे का? ही लढाई आता युवापिढीला पुढे न्यायची आहे.  लोकशाहीमध्ये प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. एक सामान्य नागरिक,  विचार करणारा माणूस म्हणून हे करत राहायला हवे. ज्या आक्रमक पद्धतीने हे करू नका असे सांगितले जाते तितक्याच ठामपणे तरूणांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि ख-या उत्तरांची अपेक्षा केली पाहिजे . देशात  भीतीचे वातावरण का आहे? प्रश्न विचारण्यावर रोख का लावली जात आहे या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: how can gaurakshak can do violance ? asks amol palekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.