Ganesh Visarjan 2018: गणेश विसर्जनादरम्यान पाच मुले बुडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 18:54 IST2018-09-24T18:53:15+5:302018-09-24T18:54:06+5:30
Ganesh Visarjan 2018: गणेश विसर्जनादरम्यान तळ्यातील नारळ काढण्यासाठी गेलेली पाच शाळकरी मुले पाण्यामध्ये बुडाली. यापैकी तीन मुलांचा मृत्यू झाला तर दोन मुले अत्यवस्थ आहेत.

Ganesh Visarjan 2018: गणेश विसर्जनादरम्यान पाच मुले बुडाली
नारायणगाव / निमगाव सावा : गणेश विसर्जनादरम्यान तळ्यातील नारळ काढण्यासाठी गेलेली पाच शाळकरी मुले पाण्यामध्ये बुडाली. यापैकी तीन मुलांचा मृत्यू झाला तर दोन मुले अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही पिंपरी कावळ (ता. जुन्नर) येथे रविवारी संध्याकाळी घडली.
वैभव विलास पाबळे (वय ११), गणेश नारायण चक्कर (वय ९) , सुमित सावकार पाबळे (वय ११) अशी मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. ओंकार एकनाथ चक्कर, तन्मय शांताराम पाबळे अशी जखमींची नावे आहेत. पिंपरी कावळ या गावातील तळ्यावर गणेश विसर्जन सुरु होते. संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास अंबिकामाता मंडळाचा गणपती विसर्जनासाठी तळ्यावर आणण्यात आला. तेव्हा काही लहान मुले या पदाधिकाऱ्यांकडे धावत आली. त्यांनी तळ्यामध्ये काही मुले बुडाल्याची माहिती दिली. कार्यकर्त्यांनी तात्काळ तलावाकडे धाव घेतली. त्यावेळी पाण्यावर दोन मुले तरंगताना दिसली. यामध्ये ओंकार व तन्मयचा समावेश होता. या दोघांना तातडीने बाहेर काढण्यात आले. तर अन्य मुलांचा पाण्याच्या तळाशी शोध घेण्यात आला. तेव्हा वैभव, गणेश आणि सुमित खोल पाण्यात आढळून आले.
या पाचही जणांना तातडीने उपचारांसाठी जांबूत (ता. शिरुर) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्याकडे आॅक्सिजनची व्यवस्था नसल्याने त्यांना आळेफाटा येथील डॉ. आकाश आवारी, राहुल फावडे व संतोष कसबे यांच्या रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान, डॉक्टरांनी तीन मुलांना मृत घोषित केले. तर दोन मुलांवर उपचार सुरु आहेत. घटनास्थळाला सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलिसांसह भेट दिली.