पुणे महापालिकेच्या हिरकणी कक्षात ‘बिलां’चे ढीग 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 02:03 PM2019-01-29T14:03:10+5:302019-01-29T14:13:15+5:30

महिलांची कुचंबणा आणि बाळाचे हाल होऊ नयेत यासाठी  ‘ब्रेस्ट फिडींग प्रमोशन नेटवर्क कौन्सिल’च्या सूचनेवरून शासनाच्या विविध विभागांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

files of 'Bill' in Pune municipal corporations women Room | पुणे महापालिकेच्या हिरकणी कक्षात ‘बिलां’चे ढीग 

पुणे महापालिकेच्या हिरकणी कक्षात ‘बिलां’चे ढीग 

Next
ठळक मुद्देफाईलींच्या कामांसाठी वापर : महिलांबाबतचा प्रशासकीय दृष्टीकोन उदासिन पुण्याच्या महिला महापौर यासोबतच महिला नगरसेविकांची संख्या लक्षणीय

पुणे : महिला कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी महापालिकेमध्ये सुरु करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचा वापर वेगळ्याच कामांसाठी होत असून सध्या या कक्षामध्ये बसून महिला कर्मचारी बिलांची आणि दैनंदिन प्रशासकीय कामे करत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आले आहे. त्यामुळे या कक्षाचा नेमका उपयोग होतोय का याकडे मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेमध्ये अनेक कक्ष रिकामे असताना हिरकणी कक्षात बसून काम करण्यामागचे प्रयोजन काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
सार्वजनिक ठिकाणी अनेक महिलांना मुलांना स्तनपान करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. महिलांची कुचंबणा आणि बाळाचे हाल होऊ नयेत यासाठी  ‘ब्रेस्ट फिडींग प्रमोशन नेटवर्क कौन्सिल’च्या सूचनेवरून शासनाच्या विविध विभागांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेमध्येही हा कक्ष सुरु करण्याची मागणी होत होती. सरतेशेवटी महापालिकेमध्ये हा कक्ष सुरु करण्यात आला. हा कक्ष सर्वांसाठी खुला करण्यात यावा याकरिता काही राजकीय पक्षांनी आंदोलनही केले होते. 
हिरकणी कक्ष सुरू करण्यात आल्यानंतर येथे रंगरंगोटी करुन बेड, खेळणी, रंगीत मॅट बसविण्यात आले. हा कक्ष जेव्हा सुरु झाला तेव्हा दोन महिला  ‘अटेंडन्ट’ ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, याठिकाणी सध्या वेगळेच चित्र पाहायला मिळते आहे. महिलांच्या कक्षामध्ये महिलाच फाईलींचे ढीग घेऊन काम करीत असल्याचे पाहून या कक्षामागील उद्देशाची पूर्ती झाली का असाच प्रश्न निर्माण होत आहे. महिलांच्या प्रश्नांबाबत महिलाच उदासिन असल्याचे पाहायला मिळते आहे. 
स्तनदा मातांसाठी सुरू केलेल्या या कक्षाचा वापर जागृती अभावी होत नसल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. पालिकेकडूनही यासंदर्भात काहीच केले जात नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेमध्ये हा कक्ष असला तरी त्याचा उपयोग अन्य कामांसाठीच केला जात आहे. पालिकेचे संबंधित अधिकारीही याकडे कानाडोळा करीत आहेत. एकीकडे महापालिकेचे कक्ष मिळवण्यासाठी अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरु असताना हिरकणी कक्षाचाही बळी घेतला जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. 
====
पुण्याच्या महापौर महिला आहेत. यासोबतच महिला नगरसेविकांची संख्या लक्षणीय आहे. यासोबतच महिला अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने महापालिकेमध्ये काम करतात. असे असतानाही महिलांच्या सुविधेसाठी सुरु केलेल्या या कक्षाच्या मुळ उद्देशाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामधून पालिकेच्या प्रशासनाची महिलांबाबतची उदासिनताच अधोरेखित होत आहे. 

Web Title: files of 'Bill' in Pune municipal corporations women Room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.