१ कोटी ७० लाखांच्या लाच प्रकरणी उपसंचालक वानखेडे यांची चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 08:54 PM2018-12-27T20:54:06+5:302018-12-27T20:56:44+5:30

तब्बल १०० कोटी रुपये किंमत असलेल्या जमिनीच्या दाव्याच्या निकालासाठी १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अ‍ॅड रोहित शेंडे याला पकडले. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भूमी अभिलेखाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांची चौकशी सुरु केली आहे.

In connection with a bribe of 1 crore 70 lakh, the inquiry was started of Deputy Director Wankhede | १ कोटी ७० लाखांच्या लाच प्रकरणी उपसंचालक वानखेडे यांची चौकशी सुरु

१ कोटी ७० लाखांच्या लाच प्रकरणी उपसंचालक वानखेडे यांची चौकशी सुरु

Next

पुणे : तब्बल १०० कोटी रुपये किंमत असलेल्या जमिनीच्या दाव्याच्या निकालासाठी १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अ‍ॅड रोहित शेंडे याला पकडले. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भूमी अभिलेखाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांची चौकशी सुरु केली आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी व इतर अधिकाऱ्यांचे जबाब गुरुवारी नोंदविण्यात आले. दरम्यान, अ‍ॅड रोहित शेंडे यांना न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
 
    लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ही सर्वात मोठी कारवाई केली असली तरी या सापळ्याची तयारी तब्बल एक महिन्यांपासून सुरु होती. रोहित शेंडे आणि तक्रारदार त्यांच्यात या दरम्यान १० वेळा पंचांसमक्ष बोलणी झाली असून त्यात सर्व रेकार्ड झाले आहे. भूमी अभिलेखांच्या उपसंचालकांनी निकाल दिल्यानंतर एका तासाभरात लाच स्वीकारल्याने व रोहित शेंडे याने त्यांच्यासाठी पैसे मागितल्याचे यापूर्वीच्या संभाषणात अनेकदा स्पष्ट केले होते.  या प्रकरणात तक्रारदार हा एक वकिल असून त्यानेच दुसऱ्या वकिलाविरोधात तक्रार केली आहे. या संपूर्ण प्रकरणात अ‍ॅड रोहित शेंडे हा वादी अथवा प्रतिवादी अशा कोणाचाही वकिल नसून त्याने आपण भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्यासाठी काम करत असल्याचा दावा केला आहे. 
याबाबतची माहिती अशी, पर्वती टेकडीच्या जवळ एक ८० गुंठे जमीन असून त्यातील काही भागावर अतिक्रमण झाले आहे. याशिवाय या जागेवर इतरांची नावे लागली आहेत. ही नावे काढून टाकणे व त्याचे टायटल क्लिअर करुन दिल्यावर ही जमीन विकण्याबाबत जमीन मालक आणि एका बांधकाम व्यावसायिकाचा करार झाला आहे. जमीन मालकाने या जागेची पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी या बांधकाम व्यावसायिकाला दिली आहे. भूमी अभिलेख विभागाकडून या जागेवर लागलेल्या इतरांची नावे काढून टाकण्याचे काम करण्यासाठी या बांधकाम व्यावसायिकाने या जागेची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी एका वकिलाच्या पत्नीच्या नावे केली. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये या वकिलाने भूूमी अभिलेख विभागाकडे अपिल दाखल केले होते. त्याची सुनावणी उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्याकडे सुरु होती. 
    सुमारे एक महिन्यांपूर्वी रोहित शेंडे याने या तक्रारदार वकिलांशी संपर्क साधून या जमिनीच्या उताऱ्यावरील नावे कमी करुन देतो. मी वानखेडे यांच्यासाठी काम करीत असल्याचे सांगितले. त्याची तक्रार या वकिलांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हापासून या प्रकरणाचा मागोवा घेत होते. शेंडे आणि या तक्रारदाराची यापूर्वी १० ते १२ वेळा संभाषण झाले आहे. ते सर्व रेकॉर्ड करण्यात आले आहे. या मोठा पुरावा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आहे. शेंडे याने निकाल तुमच्या बाजूने लावल्यानंतर पैसे द्या असे सांगितले होते. त्यानुसार वानखेडे यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निकाल दिला. त्यानंतर शेंडे याने तक्रारदाराला फोन करुन निकाल तुमच्या बाजूने लागला आहे. ठरल्याप्रमाणे १ कोटी ७० लाख रुपये घेऊन या, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार हे पैसे घेऊन गेले. शेंडे याने त्यांना आपल्या गाडीत घेतले व ते जाऊ लागले. यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे सापळा लावला होता. त्यामुळे तेही मोटार व मोटारसायकलींवरुन शेंडे यांच्या मोटारीला पाठलाग करु लागले. अल्पबचत भवनाजवळ पोलिसांना पैसे घेतल्याचा संदेश मिळाल्यावर त्यांनी शेंडे यांची गाडी अडविली व त्याला ताब्यात घेतले. तेथेच अल्पबचत भवनात त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

    या प्रकरणाशी कोणताही संंबंध नसताना एखादा वकिल इतकी मोठी रक्कम मागतो. निकाल दिल्यानंतर काही मिनिटात त्याच्याकडे या निकालाची प्रत मिळते. तो तक्रारदाराला ती प्रत देऊन पैसे स्वीकारतो. याशिवाय मागील १० ते १२ वेळा झालेल्या भेटीतील संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. त्यामुळे आता शेंडे या एजंटला अटक केली असली तरी लवकरच उपसंचालकही जाळ्यात येई. इतका पुरावा असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्याचे मत आहे. रोहित शेंडे याच्याकडे सध्या चौकशी सुरु असून आज त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भूमि अभिलेख कार्यालयातील काही क्लार्क व अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. बाळासाहेब वानखेडे यांच्याकडे सध्या चौकशी करण्यात येत आहे. त्यातून पुढे येणाऱ्या पुराव्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. 

ठाण्यातही शेंडे होता एजंट
बाळासाहेब वानखेडे हे यापूर्वी ठाणे येथील कार्यालयात नियुक्तीवर होते. त्यांची काही महिन्यांपूर्वीच पुण्यातील भूमी अभिलेखा कार्यालयात बदली झाली आहे. वानखेडे हे ठाण्यात कार्यरत असताना अ‍ॅड रोहित शेंडे याचे ही त्या कार्यालयात जाणे येणे होते, अशी माहिती पुढे आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या सर्व बाबींची माहिती घेतली जात आहे.
 

Web Title: In connection with a bribe of 1 crore 70 lakh, the inquiry was started of Deputy Director Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.