दावा पाच तासांचा; पण दोन तासच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 03:55 AM2018-10-30T03:55:07+5:302018-10-30T03:55:26+5:30

वेळापत्रक बदलण्याची वेळ; सोमवारीही अनेक ठिकाणी पाणी नाही, नागरिकांचे हाल सुरूच

Claim five hours; But water for two hours | दावा पाच तासांचा; पण दोन तासच पाणी

दावा पाच तासांचा; पण दोन तासच पाणी

googlenewsNext

पुणे : शहराला सलग पाच तास पाणी असे महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले असले तरीही ते शक्य नसल्याचेच दिसून आले आहे. जलवाहिन्यांची रचना, चढउतारासारखी भौगौलिक समस्या व एखाद्या टाकीमधील पाण्याच्या वितरणावर त्या टाकीच्या क्षमतेपेक्षा जास्त नळजोड असणे ही कारणे त्यामागे आहे. त्यातूनच पाच तास सांगण्यात आले तरीही फार तर दोन तास पाणी मिळण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकातही पाण्याची वेळ बहुसंख्य ठिकाणी तीन, चार, साडेचार व काही भागांत तर फक्त दोन तास अशीच वेळ दिलेली दिसते आहे. प्रत्यक्षात फारच कमी ठिकाणी पाच तास पाणी आले. पहिल्या दिवशी सोमवारी ज्या परिसराला पाणी मिळाले, तिथेही ते दोन ते तीन तासच आले. पेठांमध्ये मात्र पाणी बराच वेळ होते. मात्र तिथे ते सायंकाळी सोडले गेले नाही. या वेळापत्रकात गुरुवार पेठ ८ ते दुपारी १ अशी वेळ असेल तर त्यातही प्रशासनाने बरीच गडबड केली आहे. त्यात गुरुवार पेठेचे भाग केले असून त्या भागांमध्ये पाच तासांचे विभाजन केले आहे. म्हणजे डावीकडे अडीच तास व उजवीकडे अडीच तास असे मिळून पाच तास या प्रकारचे नियोजन या वेळापत्रकात केले आहे.

पाणीपुरवठा विभागातील काही जुन्या अधिकाºयांकडे चौकशी केली असता त्यांनी शहराची भौगोलिक रचना व अनधिकृत नळजोड याला कारणीभूत असल्याचे सांगितले. एखाद्या टाकीच्या पाणीसाठवण क्षमतेवर त्या टाकीवर किती मोठा विभाग ठेवायचा हे अवलंबून असते. टाकीतील पाणी किती आहे व ते कितीवेळ सोडले म्हणजे टाकीच्या कक्षेतील सर्व नळजोडांना पुरेल या पद्धतीने गणित केले जाते. शहरातील बहुसंख्य टाक्यांची क्षमता व त्यावर अवलंबून असलेले नळजोड यात फार मोठी तफावत आहे. त्यामुळेच पाणी कमी वेळ सोडले जाते, असे या अधिकाºयांचे म्हणणे आहे.

त्याचबरोबर जलवाहिन्या जिथून गेल्या आहेत तेथील चढउतारावरही पाण्याचा प्रवाह अवलंबून असतो. पाणी सोडले व जलवाहिनी उतारावर असेल तर तिथपर्यंत ते वेगात जाते. मात्र ज्या ठिकाणी जलवाहिनी वरच्या बाजूला म्हणजे चढावर गेली आहे तिथे ते थांबते. वर जात नाही. त्याच वाहिनीच्या दुसºया टोकाला पाणी नसते. हवा असते. त्याचा दाब तयार होतो व तो पाण्याला पुढे येऊ देत नाही. अशा वेळी त्या वाहिनीला चढाच्या ठिकाणी एअर व्हॉल्व लावून हवा काढली जाते. त्यानंतर पाणी एकदम जोरात सुटते. त्याचा जोर अनेकदा इतका मोठा असतो की वाहिनी फुटते. शहरातील पाणी वितरणाच्या बहुसंख्य वाहिन्या जुन्या असल्यामुळे असे वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा होत असते. अशा वेळी ती दुरुस्ती करावी लागते. एअर व्हॉल्व बसवणे तासाभरात होते. फुटलेली वाहिनी दुरुस्त करायला मात्र कितीही वेळ लागू शकतो. त्यामुळे त्या पाणी पुरवठा विस्कळीत होतो.

महापौर निवासस्थानी रविवारी सकाळी आंदोलन केलेल्या रेव्हेन्यू कॉलनी परिसराला रविवारीच सायंकाळी वेळेत पाणी मिळाले. एवढेच नाही तर रात्री ८ वाजता कॉॅलनीला महापौर मुक्ता टिळक यांनी भेट दिली. सोमवारी सायंकाळीही या कॉलनीत पाणी आले. त्याला प्रेशर कमी होते. त्याबाबत नागरिकांनी कळवताच स्वत: अधीक्षक अभियंता प्रवीण गेडामच तिथे उपस्थित झाले. त्यांनी पाहणी केली व कर्मचाºयांनी पाईपमधील हवा काढण्याबाबत सांगितले.

सगळीकडे सोईने पाणी अशक्यच
या तक्रारींबाबत विचारले असता पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम म्हणाले, ‘‘उंचावर असणाºया भागांमध्ये पाणी देताना काही अडचणी आल्या आहेत. मात्र त्या तांत्रिक आहेत. पाणी वर चढताना पाइपमधील वरच्या भागात हवा भरली जाते. ती पाण्याला पुढे जाऊ देत नाही. एअर व्हॉल्व लावून ती हवा काढावी लागते. त्यानंतर पाणी पुढे जाते. वर तक्रार असलेल्या बहुसंख्य भागांमध्ये प्रामुख्याने हीच अडचण आली आहे. तिथे काम सुरू करण्यात आले आहे. एअर व्हॉल्व बसले त्या ठिकाणी पाण्याची समस्या सुटली आहे.’’

शहराचे विभाग करून पाणीपुरवठा केला जातो, असे स्पष्ट करून गेडाम म्हणाले, ‘‘संपूर्ण शहराला एकाच सोयीच्या वेळी पाणीपुरवठा करणे शक्यच नाही. त्याच्या वेळा वेगवेगळ्याच ठेवाव्या लागतात. जाहीर केलेल्या वेळेला पाणी मिळाले पाहिजे; पण त्यात काही तांत्रिक अडचणी येतात. टाकीतील पाण्याची लेव्हल व त्यावरची ग्राहकसंख्या असे हे गणित आहे. सर्वांत शेवटच्या भागाला पाणी मिळण्यास अडचण होते. त्यासाठी टाकी पुन्हा भरावी लागते. या तांत्रिक अडचणी आहेत. त्या लक्षात घेऊन आता काही ठिकाणी वेळापत्रकात बदल करण्यात येत आहे. १० टक्के वेळापत्रक बदलावे लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्या भागाला पाणी मिळू शकेल.’’

पाणी मिळण्याच्या वेळा बदलल्यामुळे शहराच्या विविध भागांमधील कुटुंबांमध्ये आता त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. नेमके पाणी सुटण्याच्या वेळेसच घरात कोणीच नसेल अशा कुटुंबाची अडचण होत आहे. शेजाºयांना सांगून ते व्यवस्था करत आहेत. काही भागांमध्ये पाणी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आले. शहराच्या मध्यभागातील पेठांमध्ये त्याचे प्रमाण मोठे आहे. एक वेळ पाणी येणार असल्यामुळे आता त्यांना सकाळी आले तर संध्याकाळी नाही व संध्याकाळी मिळाले तर सकाळी नाही याची सवय करावी लागणार आहे.

सत्ताधारी भाजपा व प्रशासनाने पुण्यातील पाण्याचा खेळ चालवला आहे. आमच्या हडपसर परिसरात गेले १० दिवस पाणी नाही. रेव्हेन्यू कॉलनीतील नागरिकांनी महापौर निवासस्थानावर मोर्चा काढला. आता आम्ही आणखी दोन दिवस देतो आहे. या कालावधीत पाणी मिळाले नाही तर सर्व हडपसरवासीयांना घेऊन महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानावर मोर्चा काढू
- चेतन तुपे, विरोधी पक्षनेते महापालिका

Web Title: Claim five hours; But water for two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.