बसमध्ये नाही अग्निशमन यंत्र, आगीच्या घटना घडूनही अजूनही जाग नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 03:14 AM2018-11-06T03:14:24+5:302018-11-06T03:14:35+5:30

प्रत्येक दीड महिन्याला सरासरी एक बस आगीत जळून खाक होत असली तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) जागे झालेले नाही. अजूनही शेकडो बसेसमध्ये अग्निशमन यंत्रे बसविली गेली नाहीत.

The bus does not have any fire fighting equipment | बसमध्ये नाही अग्निशमन यंत्र, आगीच्या घटना घडूनही अजूनही जाग नाही

बसमध्ये नाही अग्निशमन यंत्र, आगीच्या घटना घडूनही अजूनही जाग नाही

Next

पुणे  - प्रत्येक दीड महिन्याला सरासरी एक बस आगीत जळून खाक होत असली तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) जागे झालेले नाही. अजूनही शेकडो बसेसमध्ये अग्निशमन यंत्रे बसविली गेली नाहीत. तसेच बसेसला आगी लागण्याची ठोस कारणेही प्रशासनाला शोधता आलेली नाहीत. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासन बसला आग लागून जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल प्रवासी व चालक-वाहकांनी उपस्थित केला आहे.
मागील आठवड्यात संचेती रुग्णालयाजवळील उड्डाणपुलावर अचानक बसने पेट घेतला. या आगीमध्ये बस जळून खाक झाल्यानंतर पुन्हा बस पेटण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. दोन महिन्यांपूर्वीच कोथरूड बस आगारासमोर रस्त्यावरच बसने अचानक पेट घेतला होता. मागील अडीच वर्षांत १७ बस पेटल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी झालेली नाही. या घटना घडल्यानंतर पीएमपी प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी सर्व बसमध्ये अग्निशमन यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला. पण अद्यापही शेकडो बसमध्ये ही यंत्रे अस्तित्वात नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’ने बसची पाहणी केली. या पाहणीमध्ये अग्निशमन यंत्रांसह प्रवाशांची गैरसोय होणाऱ्या इतर बाबींचीही पाहणी करण्यात आली.

प्रशासनाची यंत्रे बसविण्याची सूचना : ‘पीएमपी’तील अधिकारी अनभिज्ञ

‘पीएमपी’च्या मालकीच्या नेमक्या किती बसमध्ये अग्निशमन यंत्रे आहेत, याबाबत अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, मालकीच्या सर्व सीएनजी बसमध्ये ही यंत्रे बसविण्यात आली आहेत.

डिझेल बसमध्ये ही यंत्रे नाहीत, तर बहुतेक सर्व बसमध्ये ही यंत्रे बसविण्यात आल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. भाडेतत्त्वावरील बसमध्ये ही यंत्रे बसविण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. पण आतापर्यंत किती बसमध्ये ही यंत्रे बसविण्यात आली, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही.

‘लोकमत टीम’ने एकूण १५ बसची पाहणी केली. यापैकी केवळ दोन
नवीन मिडी बसमध्ये अग्निशमन यंत्र आढळून आले.
अन्य बसमध्ये हे यंत्र अस्तित्वात नव्हते. त्यामध्ये पीएमपीच्या मालकीसह भाडेतत्त्वावरील बसचाही समावेश आहे.
याबाबत एका चालकाने सांगितले, की बसमध्ये यंत्र बसविण्यात आले होते. पण त्याचा आतापर्यंत कधीच वापर झाला नाही.
त्यामुळे ते एकदा काढल्यानंतर परत बसविले नाही. काही वेळा देखभाल-दुरुस्तीवेळी आगारामध्येच हे यंत्र काढून ठेवले जाते.

‘सीआयआरटी’ करणार तपासणी
बसला सातत्याने लागत असलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) या संस्थेला बसेसची तपासणी करण्याची विनंती केली आहे.
संस्थेकडून पुढील काही दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर विविध कंपन्यांच्या मॉडेलनुसार प्रत्येकी एका बसचे आॅडिट केले जाणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात विविध कंपन्यांच्या मॉडेलच्या बस आहेत. या प्रत्येक मॉडेलची एक बस तपासली जाणार आहे. त्यानुसार सीआयआरटीकडून अहवाल दिला जाईल.
त्यामध्ये आग लागण्याची कारणे व त्यावर उपाययोजना सुचविल्या जातील. त्यानुसार बसमध्ये आवश्यक बदल केले जातील, अशी माहिती ‘पीएमपी’चे मुख्य अभियंता-१ सुनील बुरसे यांनी दिली.

मागील आठ वर्षांपासून बसने प्रवास करत आहे. पण क्वचित एखाद्या बसमध्ये अग्निशमन यंत्र दिसते. स्वयंचलित दरवाजे असलेल्या बसला आग लागल्यास यंत्रणेत बिघाड होऊन दरवाजे बंदच राहू शकतात. अशावेळी हे यंत्र बसमध्ये असणे आवश्यक आहे. इतर बसमध्येही ही यंत्रे गरजेची आहेतच.
- विजय रणसुरे, प्रवासी

पीएमपीकडून प्रवाशांची सुरक्षा वाºयावर सोडली जात आहे. सातत्याने आगीच्या घटना घडूनही दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे खिळखिळ््या बसने प्रवास करताना भीती वाटते. प्रशासन आगीमध्ये प्रवासी होरपळण्याची वाट पाहत आहे का?
- शार्दुली कदम, प्रवासी

चालकांना प्रशिक्षण पीएमपीकडून बहुतेक चालकांना अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पण बसमध्ये यंत्रच उपलब्ध नसल्याने या प्रशिक्षणाचा उपयोगच होत नाही. संचेती पुलावर पेटलेल्या बसमध्ये हे यंत्र अस्तित्वात नसल्याने चालकाला त्याचा वापर करता आला नाही.

Web Title: The bus does not have any fire fighting equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे