पुस्तक विक्री झाली नाही, भाड्याचे पैसे परत द्या; अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची मागणी

By श्रीकिशन काळे | Published: February 5, 2024 06:28 PM2024-02-05T18:28:35+5:302024-02-05T18:28:45+5:30

संमेलनाच्या स्थळापासून पुस्तकाचे गाळे खूप लांब होते. श्रोते तिथपर्यंत यायला कंटाळत असल्याने पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला नाही.

Book not sold, return rent; Demand of All India Marathi Publishers Association | पुस्तक विक्री झाली नाही, भाड्याचे पैसे परत द्या; अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची मागणी

पुस्तक विक्री झाली नाही, भाड्याचे पैसे परत द्या; अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची मागणी

पुणे : अमळनेर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वाचकांचा खूप कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुस्तक प्रदर्शनात विक्री देखील झाली नाही. परिणामी प्रदर्शनाच्या भरलेल्या भाड्याची पूर्ण रक्कम परत देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने स्वागताध्यक्ष गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. जर रक्कम परत दिली नाही तर पुढच्या वर्षी संमेलनावर बहिष्कार घालण्याची धमकी प्रकाशकांनी दिली आहे.

अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. त्याला वाचकांची अजिबात गर्दी नव्हती. त्यामुळे संमेलनातील सभामंडप आणि पुस्तक प्रदर्शनातील स्टॉल्स ओस पडलेले होते. कोणत्याही प्रकाशनाच्या पुस्तकांची विक्री झाली नाही. म्हणून प्रकाशक संघाची बैठक सोमवारी (दि.५) पुण्यात झाली. त्यामध्ये प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे आदी उपस्थित होते.

संमेलनाच्या स्थळापासून पुस्तकाचे गाळे खूप लांब होते. श्रोते तिथपर्यंत यायला कंटाळत असल्याने पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला नाही. अमळनेर हे खूप छोटे शहर आहे. तेथे जवळजवळ २७५ गाळे दिले होते, हे खरं तर असंयुक्तिक होते. संमेलनाला म्हणावी तशी गर्दी झाली नाही. त्यात जी मंडळी आली ती लांबवरच्या स्टॉलवर फार कमी वेळ होती. पुस्तक विक्रीला जो माहोल निर्माण व्हावा लागतो तो निर्माण झाला नाही. गावोगावच्या अनेक गरीब प्रकाशकांनी साहित्य संमेलनात स्टॉल लावले होते. त्यांचे नुकसान झाले आहे. प्रत्येकाला दहा ते पंधरा हजार रूपयांच्या पुस्तकांची विक्री होईल, असे वाटत होते. परंतु, केवळ पाचशे ते हजार रूपयांची देखील विक्री झाली नाही. त्यामुळे सर्व प्रकाशकांचे नुकसान झाले, असे निवेदनात नमूद आहे.

कोणी दु:खाने, कोणी संतापाने, आज प्रत्येक स्टॉलधारक, प्रकाशक हा संघाकडे आपले गाऱ्हाणे मांडत आहे. त्यामुळे आम्ही बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. अशी परिस्थिती अपवादात्मक आहे. यापूर्वी परळी वैजनाथ येथील संमेलनात खूप पाऊस झाला होता. तेव्हा नुकसानभरपाई पोटी तत्कालीन स्वागताध्यक्ष स्व. गोपीनाथ मुंडे यांनी स्टॉलधारकांना ५ हजार रूपयांचा चेक दिला होता. म्हणून यंदा प्रकाशकांनी भाड्यापोटी भरलेली रक्कम परत द्यावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी केली आहे.
 

Web Title: Book not sold, return rent; Demand of All India Marathi Publishers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.