बारामतीत निर्भया पथकातील महिला पोलिसाला मारहाण, मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेले पथकच असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 01:35 AM2018-09-23T01:35:22+5:302018-09-23T01:35:41+5:30

बारामती एमआयडीसी परिसरात निर्भया पथकातील महिला पोलिसालाच एकाने मारहाण करून दमदाटी केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला.

baramati crime news | बारामतीत निर्भया पथकातील महिला पोलिसाला मारहाण, मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेले पथकच असुरक्षित

बारामतीत निर्भया पथकातील महिला पोलिसाला मारहाण, मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेले पथकच असुरक्षित

googlenewsNext

बारामती/सांगवी : बारामती एमआयडीसी परिसरात निर्भया पथकातील महिला पोलिसालाच एकाने मारहाण करून दमदाटी केल्याचा प्रकार शनिवारी (दि. २२) सकाळी घडला. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेले पथकच असुरक्षित असल्याचे वास्तव आहे. मुलींची सुरक्षा करणाऱ्या पथकावरच ही वेळ आल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात पेट्रोलिंगसाठी गेलेल्या निर्भया पथकाच्या महिला पोलीस व पोलीस जमादार चव्हाण यांना मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत आरोपी विजय गोफणे (रा. वंजारवाडी, ता. बारामती) याच्यावर विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणून, दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचा रस्ताच आरोपी विजय गोफणे याने रस्त्यातच मुले सोबत घेऊन दुचाकीवर बसून अडविला होता. यामुळे निर्भया पथकाच्या महिला पोलिसांनी ‘रस्त्यात असे थांबू नका’ म्हणून ‘परवाना आहे का?’ अशी विचारपूस केली. यावर त्याने महिला पोलिसांनाच उलटसुलट भाषा वापरून, शिवीगाळ, दमदाटी केली. महिला पोलिसाचा हात पिरगळला व कानाखाली मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलीस जमादार सोडविण्यासाठी मध्ये आल्या. या वेळी आरोपीने त्यांच्याही डोक्यात दोन फाईट मारल्याने डोक्यात जबर मार बसला. या वेळी पोलीस पाठलाग करीत असताना आरोपी गोफणे तेथून फरार झाला. एवढा गंभीर प्रकार घडत असतानादेखील इतरांनी बघ्याची भूमिका घेतली. गंभीर स्वरूपाचा गुन्हा करूनही आरोपीच्या नातेवाइकांची प्रकरण मिटविण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्यात धावपळ उडाली होती. विद्या प्रतिष्ठान येथे शेजारील गावातील मोकाट मुलांचा वावर वाढला आहे. बारामतीत गुंड प्रवृत्तीला आजही जरब बसेनासे झाले आहे. महिला पोलिसांवरही हात उचलण्यापर्यंत आता या गुंडांची
मजल गेली आहे.

...निर्भया पथकात महिला
पोलिसांचे बळ वाढविण्याची गरज
निर्भया पथकात महिला पोलिसांचे संख्याबळ वाढवून पुरुषांची संख्याही वाढविणे गरजेचे आहे. सध्या बारामती व इंदापूर या तालुक्यांत एक महिला अधिकारी, एक पुरुष अधिकारी तर तीन महिला पोलीस कार्यरत आहेत. तरीही दोन्ही तालुके, त्यातील सहा पोलीस ठाण्यांच्या शाळा, महाविद्यालय परिसर मोठ्या मुश्किलीने सांभाळत आहेत. यामुळे घडलेल्या प्रकरणाची जिल्हा अधीक्षक संदीप पाटील यांनी दखल घेऊन निर्भया पथकात संख्याबळ वाढवून विशेष पथक नेमण्याची गरज आहे.

विशेष पथक कधी नेमणार..?
निर्भया पथकाबरोबरच विशेष पथक
नेमणार असल्याचे झारगडवाडीच्या प्रकरणानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र, अद्यापही या विशेष पथकाची अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही.
तसेच, दामिनी पथक नक्की अस्तित्वात आहे का? याची माहिती मिळणे आवश्यक आहे. बीट मार्शलच्या दिलेल्या दुचाकीचा कुठेही वापर होताना दिसत नाही.

संबंधित आरोपींवर लगेच महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. दहा दिवसांत ही कारवाई केली जाणार असल्याचे या वेळी पाटील यांनी स्पष्ट केले.
- संदीप पाटील,
ग्रामीण पोलीस अधीक्षक

गेल्या दोन वर्षांत बारामती विभागाच्या निर्भया पथकाने बारामती व इंदापूर या तालुक्यांत १,४०० हून अधिक रोडरोमिओंवर धडक कारवाई केली आहे. निर्भया पथकाच्या कारवाईच्या धडाक्यामुळे रोडरोमिंओंवर चांगली जरब बसली आहे. त्याची दखल घेऊन निर्भया पथकाला पुणे जिल्ह्यात सर्वोतम कामगिरीबाबत प्रथम क्रमांक देण्यात आला होता. मात्र आज घडलेल्या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: baramati crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.