‘औरंगजेबी’ राजकारण्यांचे कलाकारांपुढे आव्हान; शुभा मुदगल यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 04:16 AM2019-03-15T04:16:24+5:302019-03-15T04:16:44+5:30

कलाकारांची कदर न बाळगणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवावी?

'Aurangzebi' challenge to politicians of politics; Shubha Mudgal | ‘औरंगजेबी’ राजकारण्यांचे कलाकारांपुढे आव्हान; शुभा मुदगल यांची खंत

‘औरंगजेबी’ राजकारण्यांचे कलाकारांपुढे आव्हान; शुभा मुदगल यांची खंत

Next

- प्रज्ञा केळकर-सिंग

राजकारणी लोकांना कलेप्रति आदर वाटत नाही. ते कलाकारांना आजही ‘गाणारे, वाजवणारे’ असेच संबोधतात. राजकारणी देश चालवतात, कायदे तयार करतात. मात्र, राजकारण्यांनाच कलेची कदर नसेल, तर समाजाकडून काय अपेक्षा करणार? कलाकारांना डोक्यावर बसवून त्यांची पूजा करा, असे कोणाचेही म्हणणे नाही. मात्र, किमान कलेप्रति आदर असायलाच हवा. एवढी साधी गोष्ट त्यांच्या लक्षात येणार नाही, तोवर ते कलेसाठी काय पुढाकार घेणार? कलाकारांचा सन्मान करणारे, कलेला प्रतिष्ठा मिळवून देणारे धोरण ते कधी तयार करणार, असा सवाल ज्येष्ठ शास्त्रीय गायिका शुभा मुदगल यांनी केला. लवळे येथील फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये संगीत कार्यशाळेसाठी आल्या असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

कार्यशाळेचा उद्देश काय?
- ठुमरीची प्रथा लोप पावू लागली आहे. ठुमरी जिवंत ठेवायची असेल तर तो वारसा पुढील पिढीपर्यंत पोचायला हवा. गाणे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून, संवादातून, आदानप्रदानातून, गायन, वादनातूनच ठुमरीचा लहेजा जाणून देता येऊ शकेल.

करमणुकीच्या अनेक साधनांमुळे श्रोत्यांचा शास्त्रीय संगीताकडील ओढा कमी होतो आहे का?
- शास्त्रीय संगीत भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. संगीताच्या संवर्धनासाठी दिग्गजांनी पूर्वीपासून कष्ट घेतले. काही कलाकारांनी प्रत्यक्ष स्वरमंचाची सेवा केली, काहींनी ज्ञानदानाचे काम केले तर काहींनी सांगीतिक लिखाण केले. पुण्यामध्ये पं. भीमसेन जोशी यांनी अनेक दशकांपूर्वी सवाई गंधर्व महोत्सव सुरू केला. अनेक श्रोते केवळ सवाईची अनुभूती घेण्यासाठी इतर राज्यांमधून, परदेशातून पुण्यात येतात, संगीताचा आनंद लुटतात. चेन्नईतील म्युझिक सीझन, खजुराहो नृत्य महोत्सव अशा महोत्सवांबद्दलही रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. दुसरीकडे, काही लोक संगीतासाठी परिश्रम घेत असूनही त्यांना अजूनही संघर्ष करावा लागत आहे. कोणत्याही क्षेत्रात असे चढ-उतार पाहायला मिळतातच. त्यामुळे श्रोत्यांची संख्या कमी होत आहे किंवा वाढत आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. संगीतामध्ये कमालीची जादू आहे. ते प्रत्येक श्रोत्याशी वेगवेगळया भाषेत संवाद साधते. संगीत साक्षरता ही पूर्णपणे वेगळी बाब आहे. तिथपर्यंत पोचायला अजून थोडा वेळ लागेल. कोणत्याही परिस्थितीमुळे कलाकाराने निराश न होता संगीताशी एकरूप झाले पाहिजे.

तुमचा सांगीतिक प्रवास कसा झाला?
- माझे आई-वडील कलेचे चाहते होते. आईने मला कथक नृत्याच्या शिकवणीला घातले होते. ठुमरी गायन कथक नृत्याशी जोडलेले आहे, त्यामुळे मी गायन शिकले पाहिजे, असे आईचे म्हणणे होते. गाणे शिकण्यासाठी मी पं. रामाश्रय झा यांच्याकडे पोहोचले. तिथूनच माझा सांगीतिक प्रवास सुरू झाला. या प्रवासात माझ्या आई-वडिलांचा मोलाचा सहभाग आहे. कलेप्रति त्यांना कमालीची आस्था होती.

संगीतातील गुरू-शिष्य परंपरेबद्दल काय सांगाल?
- गुरू प्रत्येक विद्यार्थ्याला संगीताकडे पाहण्याची दृष्टी आणि दिशा देतात. मी पं. रामाश्रय झा यांच्याकडे तीन दशके संगीताचे धडे गिरवले. पं. जितेंद्र अभिषेकी, नैैनादेवीजी या गुरूंनीही माझ्यावर संगीताचे संस्कार केले. दुसºया कोणाचे ऐकू नये अथवा जे आवडेल त्याची नक्कल करा, असे गुरूंनी कधीच सांगितले नाही. सगळे ऐका, सर्वांकडून शिका; मात्र, आज या घराण्याचे गायन शिकले, उद्या दुसºया घराण्याचे गायन आत्मसात केले, असेही होऊ शकत नाही. मी पं. विनयचंद्रजी यांच्याकडे शिकत असतानाच त्यांच्या परवानगीशिवाय इतर कोणत्याही गुरूंनी मला स्वीकारले नसते. नैैनादेवी यांच्याकडे पहिली तालीम घेण्यासाठी पं. विनयचंद्रजी स्वत: मला घेऊन गेले. गुरूंच्या परवानगीनेच मी पं. जितेंद्र अभिषेकी, पं. कुमार गंधर्व यांच्याकडे शिकले. प्रत्येक गुरूने मला तेवढ्याच औैदार्याने ज्ञानदान केले.

ठुमरीवर तुमचे विशेष प्रेम आहे. ठुमरी गाताना सुरांशी कसे नाते जुळते?
- मी मुळात ख्याल, दादरा आणि ठुमरीची विद्यार्थिनी आहे. ख्याल शिकल्याशिवाय ठुमरी, दादरा समजूनच घेता येत नाही. ही शब्दप्रधान, साहित्यप्रधान गायकी आहे. मात्र, तरीही यामध्ये रागाचा किंवा तालाचा त्याग करता येत नाही. त्यामुळेच ख्यालबरोबरच इतर वैविध्यपूर्ण गायकीचे शिक्षण घेत राहिले पाहिजे. माझा जन्म अलाहाबादचा. त्यामुळे तेथील रितीरिवाज, परंपरेची झलक ठुमरी आणि दादºयामध्ये पाहायला मिळते. हळूहळू मी बंदिशीही शिकत गेले. गुरूंनी माझ्यावर संगीताचे सखोल संस्कार केले आणि मला संगीत खजिना बहाल केला. तोच जपून मी अभ्यास करण्याचा, गाण्याचा प्रयत्न करत आहे.

फ्युजन संगीताला कोणत्या दिशेने घेऊन जाईल?
- आज आपल्या मोबाईलमध्ये अनेक गोष्टींचा खजिना खुला झाला आहे. त्यामुळे काय ऐकायचे, काय नाही हे ठरवणे अवघड आहे. रसिक अभिरुची जपण्यासाठी स्वतंत्र आहेत आणि कलाकारही. कोणत्याही संगीतावर टीकाटिप्पणी करण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. मला एखादे गाणे आवडले नाही तर ते का आवडले नाही, हे सांगण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. यामध्ये कोणालाही तुच्छ लेखण्याचा हेतू नसतो. त्यामुळे कलाकारांना एकमेकांवर टीका करण्याचा अधिकार असला तरी एखादा संगीतप्रकार वाईटच आहे, असा शिक्का मारता येणार नाही.

कलाकाराच्या यशाचा आलेख कसा मोजता येईल?
- कलाकार आत्मानंदासाठी गात असतो, कोणत्याही अपेक्षेशिवाय कलेची अविरत सेवा करत असतो. मैैफलीला गर्दी झाली तरच कलाकाराचे गाणे खुलते, असा समज चुकीचा आहे. दोन-चार श्रोत्यांसमोरही कलाकाराची मैैफल रंगू शकते. कलाकार स्वर-सुरांची सेवा करत असतो. त्यामुळे यशाच्या कोणत्याही मोजपट्ट्या त्याला लावता येणार नाहीत.
 

Web Title: 'Aurangzebi' challenge to politicians of politics; Shubha Mudgal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.