बिहार काँग्रेसमध्ये फूट पडणार? एनडीएची ताकद वाढणार; मांझींच्या ऑफरनंतर चर्चेला उधाण
By बाळकृष्ण परब | Published: November 13, 2020 09:45 AM2020-11-13T09:45:02+5:302020-11-13T09:49:26+5:30
Bihar Assembly Election News : बिहारमध्ये सत्तेत आलेली एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीमध्ये अगदी काही जागांचेच अंतर असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे.
पाटणा - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत विजय मिळवला आहे. सत्तेत आलेली एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीमध्ये अगदी काही जागांचेच अंतर असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे. एकीकडे तेजस्वी यादव यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा केला असतानाच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांनी काँग्रेसच्या आमदारांना दिलेल्या ऑफऱमुळे नव्या चर्चेचाल तोंड फुटले आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाचे नेते जीननराम मांझी यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता बिहारमध्येही काँग्रेसमध्ये फूट पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसचे निवडून आलेले आमदार गोवा, गुजरात, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये पक्ष सोडून भाजपामध्ये गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मांझी यांच्या ऑफरमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडणे स्वाभाविक आहे.
बिहार काँग्रेसमध्येही यापूर्वी फूट पडली होती. २०१७ मध्ये जेव्हा नितीश कुमार यांनी महाआघाडीपासून फारकत घेत पुन्हा एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासह काही नेते काँग्रेस सोडून जेडीयूमध्ये आले होते. सध्या अशोक चौधरी हे जेडीयूचे कार्याध्यक्ष आहेत. तसेच नितीश कुमार यांचे खास व्यक्ती बनलेले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा जिंकल्या आहेत. त्यामध्ये भाजपाने ७४, जेडीयूने ४३, हम पक्षाने ४ आणि व्हीआयपी पक्षाने ४ जागा जिंकल्या आहेत. तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. त्यामध्ये आरजेडीला ७५, काँग्रेसला १९ आणि डाव्या पक्षांना १६ जागा मिळाल्या आहेत.