राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे निश्चित; विरोधक उमेदवारीत गोंधळलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 02:45 AM2019-01-24T02:45:24+5:302019-01-24T02:54:06+5:30

पुढील काही महिन्यांच्या कालावधीमध्ये लोकसभेचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Supriya Sule fixed by NCP; Confused by opponent candidate | राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे निश्चित; विरोधक उमेदवारीत गोंधळलेले

राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे निश्चित; विरोधक उमेदवारीत गोंधळलेले

Next

बारामती : पुढील काही महिन्यांच्या कालावधीमध्ये लोकसभेचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कथीत मोदी लाट, धनगर आरक्षण आदींमुळे हक्काच्या बारामती लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना विजयासाठी झगडावे लागले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुळे यांना जोरदार लढत दिली होती. या निवडणुकीतून धडा घेत, खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील साडेचार वर्षांमध्ये मतदार संघामध्ये चांगला संपर्क ठेवला आहे. मात्र पराभवानंतर जानकर यांचे बारामती लोकसभा मतदार संघाकडे दुर्लक्ष झाले. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांचे नाव निश्चित आहे. त्यामुळे त्यादृष्टीने सुळे यांनी मतदार संघात आघाडी घेतली आहे. मात्र विरोधक अद्याप उमेदवारीत गोंधळलेले आहेत. महादेव जानकर व भाजप पदाधिकाऱ्यांकडून परस्पर विरोधी दावे उमेदवारीच्या बाबतीत करण्यात येत आहेत.
२०१४ मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या आघाडीकडून महादेव जानकर यांनी आव्हान निर्माण केले होते. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामती, इंदापूर व भोर विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले. त्यांनी जानकर यांचा ६९ हजार ७१९ मतांनी पराभव केला. जानकर यांना दौंड, पुरंदर आणि खडकवासला विधानसभा मतदार संघातून मताधिक्य मिळाले होते. मागील निवडणुकीच्या अनुभवावरून ‘दुध पोळल्याने आता राष्ट्रवादी ताक सुद्धा फुंकून पिणार’ अशी चर्चा आहे. ज्या विधानसभा मतदार संघातून सुळे यांना मताधिक्य मिळाले, त्यामध्ये इंदापूर तालुक्याचा महत्त्वाचा वाटा होता. तत्कालिन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. याचे शल्य आजही पाटील यांना आहे. याचा वचपा पाटील आगामी निवडणुकांमध्ये काढण्याच्या तयारीत आहेत.
मात्र पाटील यांना आपलेसे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खास करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून कोणती मात्रा लागू करण्यात येईल हे निवडणुकीच्या आधी स्पष्ट होईल. तीच परिस्थिती पुरंदर तालुक्यात असणार आहे. याठिकाणी शिवसेनेचे विद्यामान आमदार विजय शिवतारे आणि काँग्रेसचे संजय जगताप यांच्यात कडवा संघर्ष आहे. भोर-वेल्हा तालुक्यात आमदार संग्रम थोपटे यांच्या मदतीची गरज सुळे यांना असणार आहे. तर बारामती तालुक्यात सुद्धा स्थानिक राजकारणात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष घालावे लागणार आहे. जानकर यांना अनपेक्षितपणे दौंड, खडकवासला आणि पुरंदरमधून आघाडी मिळाली होती. याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये विरोधी उमेदवाराकडून उठवला जाणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच या तिनही विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला कात टाकून, गटबाजी टाळून काम करावे लागणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील निवडणुकीतील परिस्थिती टाळण्यासाठी मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये संपर्क ठेवला आहे. संसदेतील उपस्थिती, विविध विषयांवर मांडलेले प्रश्न आणि सलगपणे मिळालेला उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार यामुळे सुप्रिया सुळे यांचे पारडे सध्यातरी जड आहे. यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या सोबतच भाजपकडून राहूल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदाची लोकसभा निश्चितच महादेव जानकर यांच्यासाठी सोपी असणार नाही. ज्या धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जानकर यांनी रान उठवले होते. तो मुद्दा खुद्द त्यांच्याकडूनच अडगळीत टाकला गेला. मागील निवडणुकीत धनगर आरक्षणावरच लोकसभा निवडणूक गाजली. याही निवडणुकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजू शकतो. बारामतीमध्ये धनगर समाजाने केलेल्या आंदोलनावेळी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र चार वर्षांनतरही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. बारामती हा धनगर आरक्षणाचा केंद्रबिंदू होता. विरोधकांकडून कोणताही उमेदवार आला तरी त्याला धनगर आरक्षण प्रश्नावरून जनतेला उत्तारे द्यावी लागणार आहेत. आरक्षण न मिळाल्यामुळे या समाजाची भाजप सरकारवर नाराजी आहे. या सर्व बाबींचा फटका महादेव जानकर यांना बसू शकतो. त्याचवेळी मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ दौरे रासपकडून केले जात आहेत. म्हणावी तशी कार्यकर्त्यांची फळी उभी नाही, सामान्य मतदाराशी संपर्क नाही, या गोष्टींचा फटका जानकर यांना बसू शकतो. तर सध्याची दुष्काळी परिस्थिती व बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील पाणी प्रश्न यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधी उमेदवाराकडून होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊन धनगर समाजाला मात्र ताटकळत ठेवणेही भाजप उमेदवाराला न परवडणारे आहे. याबरोबरच शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, दुधदर, जिएसटी, या मुद्द्यांचा देखील प्रभाव मतदार संघावर पडणार आहे.
।बारामती लोकसभा मतदार संघात
येणारे विधानसभा मतदार संघ
१) बारामती : अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
२) इंदापूर : दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
३) दौंड : राहुल कुल (राष्ट्रीय समाज पक्ष)
४) पुरंदर : विजय शिवतारे (शिवसेना)
५) भोर : संग्राम थोपटे (काँग्रेस)
६) खडकवासला : भिमराव तापकीर (भाजप)
।झालेले मतदान
सुप्रिया सुळे : ५ लाख २१ हजार ५६२ महादेव जानकर : ४ लाख ५१ हजार ८४३ सुरेश खोपडे :
२६ हजार ३९६, काळुराम चौधरी : २४ हजार ९०८

Web Title: Supriya Sule fixed by NCP; Confused by opponent candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.