अंतर्गत गटबाजी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 01:39 AM2019-03-08T01:39:40+5:302019-03-08T01:39:51+5:30

राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्याने व ‘ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला जागा’ या सूत्रानुसार तालुक्यातील जागा पक्षाला राहणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे.

Internal grouping will be a headache for the NCP | अंतर्गत गटबाजी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी

अंतर्गत गटबाजी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी

Next

- सतीश सांगळे
राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्याने व ‘ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला जागा’ या सूत्रानुसार तालुक्यातील जागा पक्षाला राहणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने व बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनीही आमदारकी लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी काही दिवसांपासून तालुक्यात विविध विकासकामे व उद्घाटन करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, त्यांनी अंतर्गत गटबाजीत न डोकावता विकासकामांवर जोर दिला आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनीही जिल्हा परिषदेचे माध्यमातून मोठा निधी आणला आहे.
युवकांसाठी बेरोजगार मेळावा तसेच सोनाई परिवाराच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या माध्यमातून तयारी चालू केली आहे. बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी सहा महिन्यांपासून आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बाजार समितीचे माध्यमातून पक्षाचे नेते शरद पवार व अजित पवार यांना कृषी प्रदर्शन कार्यक्रमाला बोलावून शक्तिप्रदर्शन केले आहे.
सोशल मीडियावर नेत्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. तालुक्यात पहिल्या फळीतील नेत्यांनी पक्षापेक्षा स्वत:चा गट मजबूत करण्यावर भर दिला आहे. तालुक्यात पक्षाने महत्त्वाची पदे देऊन संघटन वाढविण्यासाठी भर दिला. मात्र, तालुक्यात गटबाजी वाढली असल्याने पक्षासाठी डोकेदुखी ठरली आह.े पक्षाचे तालुकाप्रमुख व जिल्हा सभापती यांच्यातील निमंत्रण पत्रिकेतील वादावरून अजित पवार यांनी मागील इंदापूर दौऱ्यात जाहीर फटकारले होते.
तसेच, मागील आठवड्यातही शेळगाव येथील जाहीर सभेत त्यांनी गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा संदर्भ देऊन छत्रपतीचे संचालक अ‍ॅड. लक्ष्मणराव शिंगाडे व बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने यांना समज दिली व तालुक्यात गटबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.पक्षापेक्षा कोणी मोठा नसून, पक्षामुळेच मलाही किंमत असल्याचे सांगत गटबाजांना चांगलाच दम भरला आहे. जिथं तुम्ही एक नेता मानता, पक्ष मानता तेथे तुम्हाला एकाजिवाने राहावे लागणार आहे. हा सल्ला केवळ इंदापूर, बारामतीतील नेत्यांसाठी नसून जिल्ह्यातील नेत्यांसाठी असल्याचेही त्यांनी भाषणात स्पष्ट केले.
पक्षाला अंतर्गत गटबाजीतूनच तालुका पंचायत समितीच्या सत्तेला मुकावे लागले होते. त्यामुळे यंदा ही गटबाजी अशीच राहिली तर त्याचा मोठा फटका हा लोकसभा आणि पुढे विधानसभा निवडणूकीत बसणार आहे. त्यामुळे ही गटबाजी मिटविण्याचा नेत्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत असलेली गटबाजी पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांनी तालुक्यातील जाहीर सभेत नेत्यांना याबाबत फटकारले व गटबाजी खपवून घेणार नाही, असे ठणकावून सांगितले. मात्र, तालुक्यातीलच वरिष्ठ नेत्यांनी अभय दिल्याने गावपातळीवर गटबाजी जोर धरत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, तालुक्यात पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाला गटबाजीने ग्रासले आहे. पत्रिकेवर नाव टाकण्यापासून जाहीर सभेत एकमेकांचे नाव न घेण्यापर्यंत हा वाद विकोपाला गेला आहे.
>घोलप गटाची भूमिका महत्त्वाची
तालुक्यात छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप व बाळासाहेब घोलप यांच्या गटाची भूमिका निर्णायक ठरली आहे २००९ व २०१४ ला या गटाने निर्णायक भूमिका घेतल्याने सत्ता राखण्यात व सत्तांतर करण्यात यश आले होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे अविनाश घोलप यांचे चिरंजीव करणसिंह घोलप यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पंचायत समिती निवडणूक लढवून सभापतिपद मिळवले आहे. मात्र, अविनाश घोलप यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहणे पसंद केले आहे त्यांचे बंधू बाळासाहेब घोलप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून छत्रपती कारखान्याची अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे. मागील काही महिन्यांत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी पक्षात राहणे पसंत केले; त्यामुळे या गटाची भूमिका महत्त्वाची निर्णायक ठरणार आहे.

Web Title: Internal grouping will be a headache for the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.