हातातील लोखंडी पाईप विजेच्या ट्रान्सफॉर्मरला लागून पिंपरीत मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 17:19 IST2017-11-14T17:15:09+5:302017-11-14T17:19:05+5:30
हातातील लोखंडी पाईप विजेच्या ट्रान्सफॉर्मरला लागल्याने मजुराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास पिंपरी येथे सुखवाणी पॅराडाईज या सोसायटीमध्ये घडली.

हातातील लोखंडी पाईप विजेच्या ट्रान्सफॉर्मरला लागून पिंपरीत मजुराचा मृत्यू
पिंपरी : कार्यक्रमानंतर मंडप उतरवत असताना हातातील लोखंडी पाईप विजेच्या ट्रान्सफॉर्मरला लागल्याने मजुराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास पिंपरी येथे सुखवाणी पॅराडाईज या सोसायटीमध्ये घडली. सचिन अशोक गायकवाड (वय ३५, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे या मजुराचे नाव आहे. तो मंडप व्यवसायिकाकडे मजूर म्हणून काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील सुखवाणी पॅराडाईज या सोसायटीमध्ये एक घरगुती कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर मंडप उतरवत असताना सचिन यांच्या हातातील लोखंडी पाईप सोसायटीमधील विजेच्या ट्रान्सफार्मरला लागला. लोखंडी पाईपमामुळे विद्युत प्रवाह आल्याने सचिनला विजेचा जोरदार धक्का बसला. सचिनला त्याला तातडीने पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
या परिसरात अनेकदा अशा दुर्घटना घडल्या आहेत. बांधकाम साईटवर काम करणारे मजूर,औद्योगिक परिसरात काम करणारे कामगार यांना सुरक्षा साधने पुरविली जातात. मात्र मंडप, डेकारेशनवाल्यांकडे काम करणार्या मजुरांची सुरक्षिततेची दक्षता घेतली जात नाही. त्यांना कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध होत नाहित. धोका पत्करून काम करणे त्यांना भाग पडते. विद्युत विषयक कामे करताना, त्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती दक्षता घेतली गेली पाहिजे. त्यांना सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली पाहिजेत. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.