वेळेत काम न केल्यास शिस्तभंगाची कारवाई
By Admin | Updated: May 30, 2017 02:47 IST2017-05-30T02:47:54+5:302017-05-30T02:47:54+5:30
महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे वेळेत पूर्ण न केल्यास त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार

वेळेत काम न केल्यास शिस्तभंगाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे वेळेत पूर्ण न केल्यास त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टेबलावर कोणत्याही फाईल्स सात दिवसांपर्यंत प्रलंबित राहू नयेत. तातडीच्या फाईल चार दिवसांत निकाली काढाव्यात, असे फर्मान महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे दप्तरदिरंगाईला चाप लागणार आहे.
लाल फितीचा कारभाराचा अनुभव नागरिकांना येत असल्याने त्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी दिलेली कामे वेळेत पूर्ण करत नाहीत. हेतुपुरस्परपणे कामे अडवितात. कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देऊनही अधिकारी, कर्मचाऱ्यांना फरक पडत नाही. महापालिका अधिनियमातील कलमानुसार, जनतेच्या तक्रारी
आणि समस्यांची दखल घेऊन त्या वेळेत सोडविणे आवश्यक आहे. आवश्यकता नसलेल्या प्रकरणासंबंधात विभागप्रमुखांनी ४५ दिवसांत निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही करणे बंधनकारक आहे. नागरिकांची कामे त्वरित केली जात नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांच्या निर्दशनास आले आहे. त्यामुळे पत्रक काढले.