डीजे बंदीमुळे लग्नसराईमध्ये बँजो पार्टीला वाढली मागणी; जुन्या वाद्यांना आले सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 13:41 IST2017-12-26T13:34:09+5:302017-12-26T13:41:24+5:30
डीजेच्या युगातही बँजोला सर्वत्र मागणी आहे. सनईसारख्या पारंपरिक वादनकलाही टिकून आहे. डीजेवरील बंदीची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे या वाद्यांना आता सुगीचे दिवस येत असल्याचे दिसत आहेत.

डीजे बंदीमुळे लग्नसराईमध्ये बँजो पार्टीला वाढली मागणी; जुन्या वाद्यांना आले सुगीचे दिवस
थेरगाव : हल्लीच्या डीजेच्या युगातही बँजोला सर्वत्र मागणी आहे. सनईसारख्या पारंपरिक वादनकलाही टिकून आहे. डीजेवरील बंदीची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे या वाद्यांना आता सुगीचे दिवस येत असल्याचे दिसत आहेत.
कोणतेही मंगलकार्य असेल, तर त्यात तरुणाईचा आवडता विषय म्हणजे वरात आणि परण्या. लग्नाची वरात आणि मिरवणुकीत तर बेंजो पार्टीचा आणि सनई वाद्यांचा ताफा हवाच असतो. त्यात ढोल, ताशा, पिपाणी, हलगी आणि त्यासोबत असणारे लाइव्ह गायन यांच्या गाण्यावर वऱ्हाडी मंडळी नाचण्यात गुंग झाल्याचे सध्या सर्वत्र दिसत आहे.
लग्न कार्यात सनई ताफा हवाच. परंतु कधी काळी कानाला मंजुळ सुरांची साद घालत, ऐकणाऱ्याला देहभान विसरून लावणारी मंगल ‘सनई लुप्त होते की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. २१ व्या शतकात माहिती आणि तंत्रज्ञानाचा स्फोट झाल्याने अनेक माहितीची आणि ज्ञानाची दालने खुली झाली. नव्या बदलांचा वेग प्रचंड वाढला.
जीवनशैली प्रचंड बदलली आणि त्याचे सर्वच घटकांवर चांगले-वाईट परिणाम जाणवू लागले. लग्नासारखी मंगल कार्ये घर सोडून हॉलमध्ये आली. लग्नसोहळा काही तासांचा धनी झाला. हळद, आहेर, मानपान, रुखवत, वर ओवाळणी या बाबी जशा विवाह समारंभातून हद्दपार झाल्या, त्याचप्रमाणे बँजो पार्टी आणि सनई ताफ्याच्या जागेवर मात्र डीजेने सर्वांवर मात केली. कानठळ्या बसवत हृदयाची धडधड वाढवणाऱ्या प्रचंड आवाजाच्या मोठमोठ्या भिंतींनी प्रचंड प्रमाणात धुमाकूळ घातला.
लग्नाच्या वरातीत लाइव्ह वाजवण्याबरोबरच बँजोच्या मदतीने गाणी वाजवण्याचीही हौस भागवली जाते. गाण्याच्या फर्माईशी आणि त्यावर तासन्तास न थकता बेहोष होऊन थिरकणारी पावले हीच या समारंभाची केंद्रबिंदू ठरतात.
डीजेवर काहीसे निर्बंध आले. मात्र या न्यायालयाच्या आदेशाची पूर्ण अंमलबजावणीच होत नसल्याने डीजेचा आवाज काही ठिकाणी कायम आहे. ही बंदी पूर्णपणे अमलात आल्यास या पारंपरिक वाद्यांना आणि बँजो पार्टीला आलेले सुगीचे दिवस कायम राहतील, यात काही वावगे नाही, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.