अजबच आहे! कॉपी रोखण्यासाठी कर्नाटकात विद्यार्थ्यांसोबत घडला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 01:31 PM2019-10-19T13:31:34+5:302019-10-19T13:33:24+5:30

कर्नाटकात एक अजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी असणाऱ्या पूर्वविद्यापीठ परीक्षेदरम्यान जवळपास ५० विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कार्डबॉक्स ठेऊन परीक्षा द्यावी लागली. हावेरी जिल्ह्यातील ही घटना आहे.

हावेरी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांनी डीडीपीआयला या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितलं आहे. कॉपी रोखण्यासाठी हा प्रकार केल्याचं बोललं जात आहे.

शुक्रवारी कॉलेजमध्ये परीक्षा देणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली. हे विद्यार्थी अर्थशास्त्र आणि रसायन विज्ञानाचा पेपर देत होते.

तसेच या कार्डबॉक्सला मुलांना लिहिण्यासाठी दिसावं आणि श्वास घेता यावं एवढं कापण्यात आलं होतं. या कार्डबॉक्समुळे विद्यार्थ्यांना आजूबाजूला बघता येणं शक्य नव्हतं.

मात्र अशाप्रकारे विद्यार्थ्यांसोबत प्रकार घडल्याने राज्यात विरोधकांनी आवाज उठविला. मुलांसोबत केलं जाणारं कृत्य अयोग्य आहे याबाबत योग्य ती कारवाई करु असं आश्वासन शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी केलं आहे.