PM मोदींचा मेगा प्लान! रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक; दिले ‘हे’ निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:44 AM2022-03-14T11:44:01+5:302022-03-14T11:49:03+5:30

PM मोदींनी युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सुरु केलेल्या ऑपरेशन गंगासंदर्भात सविस्तर माहिती घेतली.

रशिया आणि युक्रेन युद्धाचा १९ वा दिवस आहे. अद्याप रशिया माघार घ्यायला तयार नाही. युक्रेनच्या विविध ठिकाणांवर भीषण हल्ले सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतल्याची माहिती मिळाली आहे.

देशाच्या संरक्षण सज्जतेचा आणि जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षाविषयक मंत्री समितीची बैठक घेतली. यामध्ये पंतप्रधान मोदींनी शस्त्रसज्जतेचा आढावा घेण्याबरोबरच युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सुरु केलेल्या ऑपरेशन गंगासंदर्भात सविस्तर माहिती घेतली.

पंतप्रधान मोदींनी संरक्षण यंत्रणेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर भर दिला. तसेच देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असंही मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. आपण शस्त्रांच्या बाबतीत स्वावलंबी झाल्यास केवळ संरक्षणदृष्ट्याच मजबूत होणार नाही, तर आपल्या अर्थव्यवस्थेतही भर पडेल, असे मोदींनी म्हटले.

युक्रेनमधील घडामोडींबरोबरच ऑपरेशन गंगाअंतर्गत सुरु असणाऱ्या कामाचा तपशीलही मोदींना देण्यात आला. त्याचप्रमाणे ऑपरेशन गंगा अंतर्गत शेजारच्या देशांमधील नागरिकांनाही परत आणण्यात आल्याबद्दलची माहितीही पंतप्रधांना दिली गेल्याचे सांगितले जात आहे.

जगभरातील देशांमध्ये संरक्षण क्षेत्रात सध्या कोणतं तंत्रज्ञान वापरले जाते, याची माहितीही पंतप्रधानांना देण्यात आल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. लष्कराबरोबरच हवाई आणि नौदलासंदर्भातील भारताच्या शस्त्र सज्जतेबद्दल पंतप्रधानांना सविस्तर माहिती या बैठकीत देण्यात आली.

युक्रेनमधील खर्किव्ह शहरात मरण पावलेल्या नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्यांचे पार्थिव मायदेशी आणण्यासंदर्भातील सर्व प्रयत्न करुन त्याचा पाठपुरावा करावा असे निर्देश मोदींनी दिले. युक्रेनच्या पश्चिम भागात रशियाच्या आक्रमणामुळे युद्धग्रस्त युक्रेनमधील वेगाने ढासळणारी सुरक्षाविषयक परिस्थिती लक्षात घेऊन युक्रेनमधील आपला दूतावास तात्पुरता पोलंडला हलवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.

रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीव्हसह त्या देशातील महत्त्वाच्या शहरांनजीक पोहचत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले. पुढील घडामोडी लक्षात घेऊन परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल, असे मंत्रालयाने एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बैठकीला हजेरी लावली. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर सुरक्षा अधिकारीही या बैठकीला हजर होते.

कीव्हमधील भारतीय दूतावासातील अनेक कर्मचारी याआधीच गेल्या काही दिवसांपासून ल्यिव्ह शहरातील त्यांच्या शिबिर कार्यालयातून (कॅम्प ऑफिस) काम करत आहेत. पश्चिम युक्रेनमधील ल्यिव्ह हे शहर पोलंडलगतच्या सीमेपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे.