मुलगी असावी तर अशी! वडिलांनी स्वप्न पाहिलं, लेकीने ते जिद्दीने पूर्ण केलं; 22 व्या वर्षी झाली IPS

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 12:53 PM2022-12-03T12:53:31+5:302022-12-03T13:03:58+5:30

IPS Pooja Awana : पूजा अवाना यांचे वडील विजय अवाना यांना आपल्या मुलीला खाकी वर्दीत पाहायचं होतं. पूजा यांनी आता मोठी अधिकारी होऊन वडिलांचं ते सुंदर स्वप्न पूर्ण केलं आहे.

UPSC परीक्षा उत्तीर्ण होणं हे सोपं काम नाही, पण प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर हे शक्य करता येतं. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. पूजा अवाना या IPS अधिकारी झाल्या आहेत. UPSC परीक्षेत 316 वा क्रमांक मिळवून पूजा यांनी वयाच्या 22 व्या वर्षी घवघवीत यश मिळवलं. त्याची यशोगाथा जाणून घेऊया...

पूजा अवाना यांचे वडील विजय अवाना यांना आपल्या मुलीला खाकी वर्दीत पाहायचं होतं. पूजा यांनी आता मोठी अधिकारी होऊन वडिलांचं ते सुंदर स्वप्न पूर्ण केलं आहे. जिद्दीने त्यांनी यश मिळवलं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

नोएडातील अट्टा गावात राहणाऱ्या पूजा अवाना सुरुवातीपासूनच अभ्यासात पहिल्या क्रमांकावर असायचा आणि पदवीनंतर त्या यूपीएससीची तयारी करू लागल्या. 2010 मध्ये त्या पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसल्या होत्या, पण क्लिअर करू शकल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी तरीही तयारी सुरू ठेवली.

पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा अधिक तयारी करून परीक्षा दिली आणि यावेळी त्या यशस्वी ठरल्या. पूजा यांना यावेळी ऑल इंडियामध्ये 316 वा क्रमांक मिळाला आणि वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्य़ा आयपीएस अधिकारी होण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना त्या अपयशाने किंवा चांगले गुण न मिळाल्याने निराश होऊ नका, खचून जाऊ नका असा सल्ला देतात. तसेच तुम्ही तुमच्या ध्येयावर टिकून राहून तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहिले पाहिजेत असंही म्हणतात.

पूजा अवाना यांची पहिली पोस्टिंग पुष्करमध्ये झाली. यानंतर विविध पदे भूषवत त्या जयपूर वाहतूक उपायुक्त पदापर्यंत पोहोचल्या आहेत. पूजा यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.