CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! 92 टक्के कोरोनाबाधित ओमायक्रॉन पॉझिटिव्ह; 'या' राज्याने वाढवलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 05:43 PM2022-01-11T17:43:54+5:302022-01-11T18:20:34+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेच्या पीक टाइमप्रमाणेच नवीन रुग्णांची आकडेवारी समोर येऊ लागली आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 30 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,68,063 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 277 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल साडे चार लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. ओमायक्रॉनचा धोका देखील वाढला असून दिवसागणिक रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्णांचा आकडा 4,461 वर पोहोचला आहे.

राजस्थानमध्ये आता ओमायक्रॉन व्हेरियंटचा कहर पाहायला मिळत आहे. राजस्थानच्या मंत्री परसादी लाल मीणा यांनी राजस्थानमध्ये 92 टक्के कोरोनाबाधित ओमायक्रॉन पॉझिटिव्ह येत आहेत असं म्हटलं आहे.

राजस्थान सरकार 1 फेब्रुवारीपासून कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचे दोन डोस न घेणाऱ्यांना परवानगी देणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयांत बेडची व्यवस्था असल्याची माहितीही मीणा यांनी दिली.

सरकार यावेळीही दुसऱ्या लाटेप्रमाणे कोरोना रुग्णांवर रुग्णालयात मोफत उपचार करेल. राजस्थानमध्ये बूस्टर डोस सुरू झाला आहे. राज्यात मुलांचे लसीकरणही वेगाने सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राजस्थानमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेच्या पीक टाइमप्रमाणेच नवीन रुग्णांची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. सोमवारी राजस्थानमध्ये 6095 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या राजस्थानमध्ये कोरोना संसर्गाचा सर्वाधिक प्रभाव राजधानी जयपूर आणि जोधपूरमध्ये आहे. जयपूरमध्ये सोमवारी 2749 नवीन रुग्ण आढळले. जयपूरमध्ये कोरोना संसर्गाचा दर 15.16 टक्क्यांवर पोहोचला आहे.

जयपूरमध्येही कोरोनामुळे मृत्यूची साखळी सुरू झाली आहे. सोमवारी जयपूरमध्ये दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. तर सोमवारी जोधपूरमध्ये 601 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.

जयपूर आणि जोधपूर व्यतिरिक्त राज्यातील इतर आठ जिल्ह्यांमध्ये दररोज 100 ते साडेतीनशे नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत. राजस्थानमधील दोन्ही प्रमुख शहरांसह अलवर, कोटा, उदयपूर, बाडमेर, बिकानेर, सीकर, चित्तोडगड आणि अजमेर या शहरांचा या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी अलवरमध्ये 375, कोटामध्ये 325 आणि उदयपूरमध्ये 324 रुग्ण आढळले आहेत. तर बारमेरमध्ये 234, बिकानेरमध्ये 201, चित्तोडगडमध्ये 180, सीकरमध्ये 173 आणि अजमेरमध्ये 128 रुग्ण आहेत.

राजस्थानमधील कोरोनाची स्फोटक परिस्थिती पाहता राज्य सरकारने एका आठवड्यात तीन वेळा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असताना गेहलोत सरकार सातत्याने निर्बंध वाढवत आहे.

वीकेंड कर्फ्यूही जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने 9 जानेवारी रोजी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे मंगळवारपासून लागू झाली आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्दी झाली तरी आता घाबरण्याचं अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण सर्दीमुळे कोरोनापासून सुरक्षित राहता येतं अशी माहिती आता समोर आली आहे. कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळू शकतं असा मोठा दावा रिसर्चमधून करण्यात आला आहे.

सर्दीला प्रतिकार करण्यासाठी शरीरामध्ये निर्माण होणारे टी सेल्स हे कोरोना संसर्गचा धोका कमी करतात. सामान्यपणे सर्दीचा त्रास असणाऱ्यांना सार्क-सीओव्ही 2 चा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते, असं ब्रिटनमधील एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे.

नेचर कम्युनिकेशन्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, टी सेल्समुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्तीचा पुरावा पहिल्यांदाच मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.