भारतात असूनही भारताचं नाही 'हे' मंदिर; नेपाळ सरकारचा आहे अधिकार, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 02:34 PM2024-01-11T14:34:05+5:302024-01-11T14:38:49+5:30

भारतात असणाऱ्या सर्व सार्वजनिक मालमत्तेवर सरकारचं नियंत्रण असते. मग ती कुठली जागा असो वा कुठलं मंदिर..भारतीय संविधानानुसार इथलं नियम बनवले जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? भारतातील वाराणसी इथं एक असं मंदिर आहे ज्यावर नेपाळ सरकारचा अधिकार आहे. याठिकाणचे नियम, देखभाल करण्याचे सर्व अधिकार भारत सरकारचे नाहीत तर नेपाळ सरकारच्या अख्यारित्य आहेत. चला जाणून घेऊया...

उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं ललिता घाटावर स्थित असलेले हे नेपाळी मंदिर आहे. वाराणसीत तुम्हाला एकापेक्षा एक सुंदर मंदिरे पाहायला मिळतात. गंगा नदी किनारी देवस्मरणात लीन झालेली अनेक भक्तमंडळी तुम्ही पाहिली असाल. परंतु याच मंदिरांच्या रांगेत एक असं मंदिर आहे ज्यावर भारत सरकारचं नियंत्रण नाही. हे मंदिर भारतातील जमिनीवर असले तरी ती नेपाळ सरकारची प्रॉपर्टी आहे.

शिवनगरी काशीच्या ललिता घाटावर नेपाळी मंदिर आहे. भगवान पशुपती नाथाचे हे मंदिर नेपाळी लोकांसाठी प्रमुख आस्थेचे ठिकाण आहे. हे मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराची आठवण होईल. अगदी हुबेहुब नेपाळमधील मंदिराची कॉपी म्हणजे हे वाराणसीतील नेपाळी मंदिर आहे.

भारतात बनलेलं हे पशुपतीनाथ मंदिर गंगा नदीच्या किनारी आहे. या सुंदर मंदिराचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारकडे नाही. तर सुरक्षा असेल वा मंदिराची देखभाल सर्वकाही नेपाळ सरकारच्या अधिकारात आहे. आता भारतात असूनही भारत सरकारचा अधिकार का नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल परंतु त्यामागे शेकडो वर्षापूर्वीची एक कहाणी आहे.

या मंदिराचे बांधकाम नेपाळचा राजा राणा बहादुर साहाने केले होते. असं म्हणतात की, १८०० ते १८०४ या काळात हा राजा काशीत राहत होता. तेव्हा हे मंदिर बांधण्याचा निर्णय राजाने घेतला होता. मंदिर बांधकाम सुरू केले परंतु १८०६ राजाचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे मंदिराचे बांधकाम अर्धवट राहिले.

त्यानंतर राजाचा मुलगा राजेंद्र वीर यांनी या मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरू केले. वडिलांप्रमाणे राजेंद्र वीर यांनी मंदिरासाठी लागणारं सर्व साहित्य नेपाळहून आणले. या मंदिराचे शिल्प, वास्तूकला नेपाळच्या मंदिरासारखी आहे. निश्चित कालावधीच्या ४० वर्षानंतर मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. नेपाळच्या राजाने या मंदिराचे बांधकाम केले त्यामुळे आजही याच्या देखभालीची जबाबदारी नेपाळ सरकार उचलतं.

या मंदिराचे बांधकाम नेपाळच्या कारागिरांनी केले. त्यात वापरण्यात आलेली लाकडेही नेपाळची आहेत. मंदिरात सुबक अशी लाकडी नक्षीकामे आहेत. मंदिरातील प्रत्येक भागात तुम्हाला लाकडी शिल्पे दिसतात. ज्याप्रकारे नेपाळमधील मंदिरात मोठी घंटा लावलेली असते तसेच या मंदिरातही तुम्हाला घंटा पाहायला मिळेल.

या नेपाळी मंदिराची कहानी अत्यंत रंजक आहे. हे मंदिर तुम्हाला १९ व्या शतकात घेऊन जाते. जसं नावावरून हे नेपाळी मंदिर आणि तिथल्या कलेनुसार बनल्याचे तुम्ही वाचलं असेल. परंतु हे वाराणसीच्या सर्वात जुन्या शिव मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात भगवान शंकराची पूजा केली जाते.

या मंदिराचे बांधकाम सुरू असताना राजा राणा बहादुर शाह नेपाळला गेले होते. तेव्हा त्यांचा सावत्र भाऊ शेर बहादुर शाहने त्यांची चाकू भोसकून हत्या केली. त्यामुळे राजाच्या मृत्यूमुळे काही काळ मंदिराचे बांधकाम थांबले. परंतु त्यानंतर राजाचा मुलगा राजेंद्र वीरने या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

या मंदिरात नेपाळी लाकडांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने त्याला काठवाला मंदिरही म्हणतात. या मंदिरात ज्या लाकडांचा वापर केला त्याला आजतागायत वाळवी लागली नाही. नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती असलेल्या या मंदिरात प्रवेश केल्यानंतर काशीत नेपाळ अवतरल्याचा भास तुम्हाला होईल.