‘आम्हाला IMF कडून कर्ज मिळवून द्या…’ पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी अमेरिकेसमोर पसरले हात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 11:06 AM2022-07-30T11:06:05+5:302022-07-30T11:17:35+5:30

१.२ बिलियन डॉलर्सचं कर्ज जलदगतीनं मिळवून देण्यासाठी बाजवा यांनी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे.

भारताचा आणखी एक शेजारी देश म्हणजेच पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परकीय गंगाजळी कमी होत असल्याचे पाहून, लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी IMF कडून सुमारे १.२ बिलियन डॉलर्सचे कर्ज लवकरात लवकर वितरित करण्याच्या मागणीसाठी अमेरिकेसमोर हात पसरले आहेत.

बाजवा यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट्स वेंडी शेरमेन यांच्याशी फोनवर संवाद साधला. तसंच हाईट हाऊस आणि यूएस ट्रेजरी डिपार्टमेंटला IMF ला जवळपास १.२ बिलियन डॉलर्सचं कर्ज त्वरित देण्याचं आवाहनही केलं. असोसिएटेड प्रेस (एपीपी) या वृत्तसंस्थेने पाकिस्तानी लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखास अहमद यांनीदेखील यासंदर्भात वक्तव्य केलं. त्यांच्यात चर्चा झाली आहे. परंतु सद्यस्थितीत त्यांच्यात काय चर्चा झाली याची आपल्याला कल्पना नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

आयएमएफनं यापूर्वी १३ जुलैला पाकिस्तानला १.१७ बिलियन डॉलर्सच्या कर्जासाठी कर्मचारी स्तरावर मंजुरी दिली आहे. परंतु कर्जाच्या मंजुरीची घोषणा करण्यासाठी कोणती तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, असं आयएमएफच्या एका अधिकाऱ्यानं एपीपीशी बोलताना सांगितलं. कर्मचारी स्तरावरील मंजुरी आणि बोर्डाची मंजुरी यात मोठा फरक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

‘आयएमएफ कार्यकारी मंडळाच्या निर्णयांच्या वेळेबद्दल, पूर्व कारवाईबद्दल चिंता नोंदवण्यासाठी अनेक वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात आयएमएफ आणि जागतिक बँकेतील अमेरिका आणि इतर प्रमुख भागधारक देशांची भेट घेतली. तेजीन यावरील कार्यवाही करण्यासाठी दबाव आणला जावा यासाठी ही भेट होती,’ असंही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

सध्या पाकिस्तानमध्येही मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. परकीय कर्ज आणि इतर देयकांमुळे पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात झपाट्याने घट होत आहे. सेंट्रल बँक, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अंदाजानुसार, २२ जुलै रोजी पाकिस्तानचे परकीय चलन ९ अब्ज डॉलर्सच्या खाली गेले.

जून महिन्यात देशाची तूट वाढून २.३ अब्ज डॉलर्स झाली आहे."जर हे वृत्त खरं असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण देश म्हणून कमकुवत होत आहोत. ते लष्करप्रमुखांचे काम नव्हते,” अशी प्रतिक्रिया बाजवा आणि शेरमेन यांच्यातील कथित संभाषणावर प्रतिक्रिया देताना माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी एआरवाय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दिली.

अमेरिकेच्या अटींमुळे आपली राष्ट्रीय सुरक्षा कमकुवत होईल आणि त्याचं पाकिस्तानला नुकसान सोसावं लागेल, असेही ते म्हणाले. ऑगस्ट महिना हा पाकिस्तानसाठी कठीण ठरणार असल्याचंही एपीपीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.