Israel-Hamas War: हॉस्पिटलवर हल्ला करणं ठरतो युद्ध गुन्हा?; जाणून घ्या युद्धाचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 07:42 PM2023-11-16T19:42:24+5:302023-11-16T19:57:16+5:30

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी ते थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. इस्त्रायली लष्कराने आता जमिनीवरही हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायली सैन्याने गाझातील सर्वात मोठं रुग्णालय अल-शिफामध्ये शिरकाव केला. या हॉस्पिटलमध्ये हजारो लोक उपचारासाठी दाखल होते. इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की, त्या हॉस्पिटलच्या खाली हमासचे कमांड सेंटर आहे आणि त्यात हमासचे लोक लपले आहेत, त्यामुळे ते नष्ट करणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितले.

इस्रायल गाझा पट्टीतील रुग्णालयांवर हल्ले करत आहे. इस्रायली सैन्य आमच्यावर रुग्णालये रिकामे करण्यासाठी सतत दबाव आणत आहे. रुग्णालयात अनेक गंभीर रुग्ण उपचार घेत असल्याने आम्हाला हे करणे अवघड आहे असं गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणं आहे. हमासचे लोक रुग्णालयांचा ढाल म्हणून वापर करीत आहेत, म्हणून ते रुग्णालये रिकामे करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा इस्रायलचा दावा आहे.

युद्धादरम्यान सामान्य नागरिकांना लक्ष्य करता येणार नाही, असे युद्धाच्या नियमांमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे. रुग्णालये, निवासी क्षेत्रे, इमारती, शाळा, महाविद्यालये आणि घरे यांना लक्ष्य करता येणार नाही. सामान्य नागरिकांशिवाय वैद्यकीय कर्मचारी आणि पत्रकारांनाही लक्ष्य करता येणार नाही.

कोणताही शत्रू रुग्णालयासारख्या जागेवर हल्ला करू शकत नाही किंवा त्यांना जबरदस्ती किंवा जागा खाली करण्यास सांगू शकत नाही. जिनिव्हा अधिवेशनात असे नमूद केले आहे की जर एखाद्या शत्रू गटाने रुग्णालयाचा गैरवापर केला तर ते संरक्षण गमावू शकतात.

जर युद्धाच्या नियमांचे उल्लंघन केले गेले तर त्याला युद्ध गुन्हा म्हटले जाते. असे काही नियम दुसऱ्या महायुद्धानंतर ठरवले गेले. दुसरे महायुद्ध १९३९ ते १९४५ या काळात झाले हे सर्वज्ञात आहे. यानंतर जगातील देशांनी अशी आपत्ती पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न केले.

जगभरातील नेते १९४९ साली स्वित्झर्लंडची राजधानी जिनिव्हा येथे जमले होते. या अधिवेशनाला जिनिव्हा अधिवेशन असे म्हटले जाते. जिनिव्हा अधिवेशनात आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा केला गेला, ज्यात १६१ नियम आहेत, ज्यांना १९६ देशांनी मान्यता दिली आहे.

या कायद्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की जेव्हा एखाद्या देशात गृहयुद्ध चालू असते तेव्हा हा कायदा लागू होत नाही. पण जेव्हा दोन देश एकमेकांशी युद्ध करत असतात आणि शस्त्रांचा वापर होत असतो, तेव्हा हा कायदा लागू होतो.

जर हे नियम मोडले गेले आणि देशांतर्गत कायद्याच्या आधारे युद्ध गुन्ह्यांसाठी आरोप निश्चित केले जाऊ शकत नाहीत, तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय (ICC) या प्रकरणात आरोप निश्चित करते. ICC ची स्थापना २००२ साली झाली. १२३ देश त्याचे सदस्य आहेत. आयसीसी या सदस्य देशांमध्ये झालेल्या युद्धगुन्ह्यांची चौकशी करते.

काय आहे युद्ध गुन्हा? जाणूनबुजून नागरिकांची हत्या करणे, त्यांना ओलीस ठेवणे, त्यांच्या मालमत्तेवर कब्जा करणे आणि युद्धादरम्यान अमानुष वागणूक देणे हे युद्ध गुन्ह्यांच्या श्रेणीत येतात. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, लष्करी लक्ष्यांवर हल्ला करतानाही, नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

हमास सातत्याने या कायद्यांचे उल्लंघन करत आहे. आयसीसीमधील इस्रायलचे वकील निक कॉफमन यांनी गाझा सीमेजवळील एका संगीत महोत्सवावर हमासच्या हल्ल्याचे उदाहरण दिले आहे. पण इस्रायली सैन्याने गाझाच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटल अल-शिफावर केलेला हल्लाही याच कक्षेत येतो.