जर्मनी, फ्रान्समध्ये झपाट्याने वाढतायेत कोरोनाची प्रकरणे; जाणून घ्या इतर देशांची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 03:02 PM2022-04-27T15:02:09+5:302022-04-27T15:12:54+5:30

coronavirus : जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे.

नवी दिल्ली : जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. भारतात सलग सहाव्या दिवशी 2000 हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. चीनमधील शांघायमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 39 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 21058 कोरोना बाधितही आढळले आहेत. यासोबतच जर्मनी आणि फ्रान्समध्ये कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या एका आठवड्यात वाढली आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वाधिक 82 गरीब देशांमध्ये फक्त 70 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट काही देशांमध्ये पूर्ण झाले आहे. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, अनेक देश 20 टक्क्यांच्या खाली आहेत. याउलट, जगातील दोन तृतीयांश श्रीमंत देशांमध्ये 70 टक्के लस (अमेरिकेत 66 टक्के) लसीकरण झाले आहे.

1. गेल्या 24 तासांत भारतात कोरोना व्हायरसचे 2,541 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारतात कोरोनाचे एकूण रुग्ण 4,30,60,086 वर पोहोचले आहेत. अॅक्टिव्ह प्रकरणे 16,522 पर्यंत वाढली आहेत.

2. चीन पुन्हा कोरोनाशी झुंज देत आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटने (New Omicron subtype detected in China) पुन्हा एकदा स्थिती बिघडली आहे. कोरोना संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन आहे. शांघाय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार, मार्चपासून शांघायमध्ये 87 मृत्यू झाले आहेत. कोरोनाबाबत चीनमध्ये झिरो कोविड धोरण लागू आहे.

3. वर्ल्डोमीटरच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत फ्रान्समध्ये 58,000 आणि अमेरिकेत 12,000 प्रकरणे आढळून आली आहेत. दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक 64,725 नवीन रुग्ण आढळले आहेत. मृतांच्या संख्येबद्दल बोलायचे झाले तर फ्रान्समध्ये 40 आणि अमेरिकेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

4. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मलेशियामध्ये गेल्या 24 तासांत 4,006 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण 4,431,073 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, गेल्या रविवारी 8 लोकांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 35,499 वर पोहोचली आहे.

5. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कमला हॅरिस यांचाचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन गेल्या काही दिवसांपासून कमला हॅरिसच्या संपर्कात आलेले नाहीत, असे व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी केले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात अमेरिकेत 12,000 प्रकरणे आढळून आली आहेत.