Corona Virus : चीनमध्ये संयमाचा बांध फुटला! कोरोना रुग्णांची संख्या 30 हजारांवर पण लोकांना नकोय लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:57 PM2022-11-28T12:57:32+5:302022-11-28T13:09:25+5:30

China Zero Covid Policy : चीनचं सर्वात मोठं शहर शांघाईमध्ये रस्त्यावर शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पार्टीविरोधात घोषणाबाजी केली.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमध्ये सरकारच्या कठोर कोविड निर्बंधांविरोधातील निदर्शने आता तीव्र झाली आहेत. कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांविरोधात मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत आहेत.

शांघाईच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने लोक उतरलेले पाहायला मिळत आहे. बीजिंग आणि नानजिंग येथील विद्यापीठांमध्येही विद्यार्थी निदर्शने करत आहेत. उरुमकी या शहरात सुरू झालेले निदर्शने आता अनेक शहरांमध्ये पसरले आहेत. उरुमकी येथे इमारतीला लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

चिनी अधिकार्‍यांनी 'कोविड निर्बंधांमुळे मृत्यू' हा आरोप फेटाळला आहे. उरुमकी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी उशिरा माफी मागितली. चीनचं सर्वात मोठं शहर शांघाईमध्ये रस्त्यावर शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पार्टीविरोधात घोषणाबाजी केली. काहींनी व्हाईट बॅनरसह निदर्शनात भाग घेतला.

काहींनी मेणबत्त्या पेटवून उरुमकी आगीत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी फुले वाहिली. चीनमध्ये अशी निदर्शने अजिबात होत नाहीत, जिथे सरकार किंवा राष्ट्रपतींवर टीका केल्यास कठोर शिक्षा होऊ शकते. परंतु विश्लेषकांचे म्हणणे आहे की सरकारने शून्य-कोविड धोरणाबद्दल वाढत्या असंतोष समजण्यात आता चूक केली आहे.

शी जिनपिंग यांच्या अत्यंत कठोर झिरो कोविड धोरणाला सुरुवातीपासूनच टीकेचा सामना करावा लागत आहे. शांघाईमधील एका आंदोलकाने बीबीसीला सांगितले की, लोकांना रस्त्यावर पाहून 'आश्चर्य आणि उत्साही' वाटले. कारण चीनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशांतता पहिल्यांदाच पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊनमुळे तो दु:खी आणि निराश झाला आहे कारण तो कर्करोगावर उपचार घेत असलेल्या आपल्या आजारी आईला पाहू शकला नसल्याचंही म्हटलं आहे. शनिवारी चीनमध्ये 34,398 कोरोना रुग्ण आढळले. शुक्रवारी, हा आकडा 31,928 होता. रुग्णसंख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या सरकारविरोधात लोकांचा रोष वाढत आहे. एकीकडे कोरोनाची वाढती प्रकरणे आणि दुसरीकडे झिरो कोविड धोरणामुळे बळजबरीने घरात डांबून ठेवल्याने लोक नाराज झाले आहेत. चीनची राजधानी बीजिंगनंतर अनेक शहरांमध्ये निदर्शने तीव्र झाली आहेत. शांघाईमध्ये परिस्थिती गंभीर आहे.

चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि त्यामुळेच चीनच्या अनेक प्रांतांमध्ये आता लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनने अलीकडेच स्थानिक लॉकडाउन, टेस्टिंग, प्रवास प्रतिबंध आणि इतर अनेक निर्बंध लागू केले आहेत. लॉकडाऊन आणि अनेक निर्बंधांमुळे लोकांचे हाल होत आहे.

चीन सरकारच्या म्हणण्यानुसार, झिरो-कोविड धोरण जीव वाचवण्यात खूप यशस्वी ठरत आहे. चिनी सरकारने कबूल केले आहे की हा व्हायरस बराच काळ अनियंत्रित राहिल्यास मोठा धोका निर्माण होईल. विशेष म्हणजे, 80 आणि त्याहून अधिक वयाच्या केवळ 66% लोकांना लसीकरण करण्यात आले आहे आणि त्यापैकी फक्त 40% लोकांना बूस्टर डोस मिळाला आहे.