Coronavirus in China : चीनमध्ये कोरोनाचा वेग वाढला, मृतदेहांसाठी जागाच मिळेना; अंत्यसंस्कारासाठी २४ तास वेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 10:14 AM2022-12-21T10:14:28+5:302022-12-21T10:23:10+5:30

चीनमध्ये मात्र कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तेथे संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे.

जगभरात कोरोना रुग्णांच्या घटत्या संख्येमुळे दिलासा मिळत असताना चीनमध्ये मात्र कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तेथे संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ज्ञ एरिक फीगेल-डिंग यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार तेथे रुग्णालयांत मृतदेह ठेवण्यासही जागा अपुरी पडत आहे.

डिंग यांच्या व्हिडिओत रुग्णालये, स्मशानभूमी आणि मेडिकल स्टोअर्सची चिंताजनक स्थिती दिसून येत आहे. चीनमधील कोरोना रुग्णसंख्या दिवसांत नाही तर तासांत दुप्पट होत असून बीजिंगमधील स्मशानभूमीत २४ तास अंत्यसंस्कार केले जात आहेत.

डिंग यांनी या हाहाकाराला चीन सरकारला जबाबदार धरले. ज्याला संसर्ग व्हायचा त्याला होऊ द्या, मरू द्या, लवकर संक्रमण, लवकर मृत्यू, लवकर कोरोनाचे शिखर... म्हणजे लवकरच सर्वकाही ठीक होईल, अशी सरकारची भूमिका आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

कडक निर्बंधांविरुद्ध चीनमध्ये नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे सरकारने निर्बंध उठवले आणि संक्रमणांमध्ये प्रचंड वेगाने वाढ झाली.

लसीकरण फक्त ३८ टक्के, ६५ पेक्षा जास्त वय असलेल्यांचे तर फक्त १० टक्के, मात्र ९० टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाल्याचा चीनचा दावा.

भारताचा शेजारी असलेल्या चीनमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती असताना भारताला कोणताही धोका नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. ३ लसींमुळे लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली आहे.