अमेरिका आगीशी का खेळतंय?, शास्त्रज्ञ हैराण; जगासमोर सर्वात घातक व्हेरिएंटचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 09:29 AM2022-10-20T09:29:42+5:302022-10-20T09:33:04+5:30

कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं पुन्हा एकदा जगाला सतर्क राहण्याची गरज भासत आहे. एकीकडे ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरत आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेत कोविड १९ चा एक व्हेरिएंट विकसित झाला आहे जो आतापर्यंत समोर आलेल्या कोरोनाच्या व्हेरिएंटपैकी सर्वात धोकादायक आहे.

अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी दावा केला आहे की, त्यांनी कोविड 19 चा एक व्हेरिएंट विकसित केला आहे ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतो आणि त्याचा मृत्यू दर ८० टक्के आहे. मात्र, जगात पसरत असलेला ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट मानवांसाठी फारसा घातक नसल्याचं या संशोधन पथकाचे म्हणणे आहे. हे संशोधन समोर आल्यानंतर जगभरातील शास्त्रज्ञांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. हे आगीशी खेळण्यासारखं आहे असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

या अहवालात संशोधकांनी म्हटलं आहे की, या संशोधनासाठी त्यांनी सर्वप्रथम कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून स्पाइक प्रोटीन काढले आणि ते चीनच्या वुहानमध्ये प्रथमच आढळलेल्या कोविड-19 च्या स्ट्रेनमध्ये (कोरोनाचे स्वरूप) मिसळले. हे संशोधन उंदरांवर करण्यात आले.

उंदरांमध्ये ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे आढळून आली आणि ती फारशी प्राणघातक नाहीत, परंतु प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेला ओमायक्रॉनचा S विषाणू ८० टक्के मृत्यूसह गंभीर आजार निर्माण करण्यास सक्षम आहे असं संशोधकांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितले.

रिसर्चवेळी, प्रयोगात सहभागी उंदरांपैकी ८० टक्के उंदरांचा नवीन मानवनिर्मित कोविड स्ट्रेनने मृत्यू झाला. तर सौम्य ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे उंदरांच्या दुसऱ्या समुहालसा गंभीर समस्या निर्माण झाल्या नाहीत. बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की नवीन स्ट्रेनमध्ये ओमायक्रॉनपेक्षा पाचपट जास्त संसर्गजन्य विषाणू कण आहेत.

या रिसर्चनंतर जगात पहिल्यांदाच आलेला कोविड-19 हा विषाणू प्रयोगशाळेतील काही चुकीमुळे झाला असावा, अशी शंका अनेकांच्या मनात बळावली आहे. या वादावर बोस्टन विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आमचे संशोधन जगभरातील इतर समान संशोधनाच्या निष्कर्षांची पुष्टी करते. हे आम्हाला भविष्यातील साथीच्या रोगांशी लढण्यास मदत करेल असं म्हटलं.

परंतु रिसर्च टीमने या संशोधनासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजेस (NIAID) कडून परवानगी घेतली नाही. एजन्सीने स्टेट न्यूजला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांना मीडिया रिपोर्ट्सवरून याची माहिती मिळाली आहे आणि या संदर्भात टीमकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली जातील.

NIAID च्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या संचालक एमिली एरबाल्डिंग यांनी सांगितले की, ते असे काहीतरी करणार आहेत हे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले नाही. टीमने हे देखील सांगितले नाही की ते अशा धोकादायक विषाणूवर प्रयोग करत आहेत ज्यामुळे साथीचे रोग होऊ शकतात. येत्या काही दिवसांत याबाबत चर्चा करणार आहोत.

डेली मेल'ने इस्रायली सरकारमधील प्रख्यात शास्त्रज्ञ प्रोफेसर सॅम्युअल शापिरा यांचा हवाला देत म्हटलं की, "जेव्हा कोरोनाव्हायरस साथीचा रोग सुरू झाला तेव्हा अनेक लोकांचा असा विश्वास होता की हा विषाणू वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तयार झाला आहे. आता हे काय आहे? अशा प्रकारच्या संशोधनावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. हे आगीशी खेळण्यासारखे आहे

त्याचबरोबर अनेक पत्रकारही या संशोधनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एझरा लेव्हंट नावाच्या पत्रकाराने सांगितले, सरकार म्हणते की कायद्याचे पालन करणारे लोक रायफल ठेवू शकत नाहीत. ते खूप धोकादायक आहे. तर दुसरीकडे अनेक धोकादायक व्हायरसची निर्मिती होत आहे.