मुंबई मेडिकल आणि पुढे.....प्रवासाच्या काही आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 03:20 PM2017-09-06T15:20:04+5:302017-09-07T07:10:54+5:30

धरणगावात वडील शिक्षक. त्यांनीच दहावीत खूप सुंदर कविता शिकवली होती, कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला.. ती आठवतच मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये स्थिरावलो. इंग्रजी येत नव्हती, भाषेचा, राहणीमानाचा प्रश्न.पण टिकलो... त्या प्रवासाच्या काही आठवणी...

Mumbai Medical and Next .. Some of the Travel memories | मुंबई मेडिकल आणि पुढे.....प्रवासाच्या काही आठवणी

मुंबई मेडिकल आणि पुढे.....प्रवासाच्या काही आठवणी

Next

डॉ. निपुण संजीवकुमार सोनवणे

माझं गाव जळगाव जिल्ह्यातील धरणगाव. धड खेडंही नाही, शहरही नाही. बारावीपर्यंत शिक्षण गावातच घेतलं. वडील याच गावात माध्यमिक शिक्षक. डॉक्टर व्हायच्या इच्छेने सीईटी दिली. आणि पहिल्या प्रयत्नात बीडीएसला नंबर लागला. पहिल्या राउंडला परभणीला गेलो. तेथे कॉलेज गावाबाहेर पंधरा-वीस किलोमीटर होतं. काहीच सोय नव्हती. मुंबईत जायचं स्वप्न होतं, ते साकार झालं. नवी मुंबईचं एमजीएम डेण्टल कॉलेज मिळालं. आनंद वाटला; पण गावातून महानगरात जायचं तर थोडी धास्तीपण वाटली. घर सोडताना अक्षरश: गलबलून आलं. आईची सारखी रट, यानं कधी घर सोडलं नाही, हा राहील कसा, इतक्या लांब पोराला कशाला पाठवायचं? पण वडिलांनी समजूत काढली, मेडिकलला नंबर लागलाय. करिअर करायचंय त्याला. घर सोडावंच लागेल. ज्यानं घर-गाव सोडला तोच जीवनात यशस्वी होतो. हे वडिलांनी पटवून दिलेलं होतं.
गावचं गावपण आम्ही जगलो होतो. आता अचानक गाव सोडावं लागणार याची हुरहुर वाटत होती. मी मुंबईला कधी गेलो नव्हतो. मनाचा हिय्या केला. निघालो. मला जाताना पाहून आईने फोडलेला हंबरडा अजून आठवतो. मित्रांच्या डोळ्यांत पाणी होतं.
पहिल्या दिवशी वडिलांनी कॉलेजच्या होस्टेलला सोडलं. ते स्वत:चे अश्रू लपवत निघून गेले. मी त्या अनोळखी वातावरणात अक्षरश: बुजून गेलो होतो.
कॉलेजला शंभर विद्यार्थ्यांत नव्वद तर मुंबईचेच होते. ते अप-डाउन करणारे होते. विशेष म्हणजे बहुसंख्य मुलं इंग्रजी मीडिअममध्ये शिकलेले होते. घरचे श्रीमंत. बºयाच जणांचे आई-वडील डॉक्टर होते. उरलेले आम्ही दहा जण मराठवाडा आणि खान्देशमधून आलो होतो. आम्ही गावाकडे मराठी मीडिअममधून शिकलेलो होतो. त्यामुळे आमची इंग्रजी तशी प्राथमिक स्वरुपाची होती. काही दिवस हाच प्रॉब्लेम आला. त्यामुळे अधिकच बुजरेपणा वाटायचा.
महानगरातली ही मंडळी आमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायची. त्यांची शहरी राहणी, कपडे, बोलणं आणि आमची गावाकडची राहणी खूप फरक वाटायचा. ओशाळे व्हायचो.
पण माझ्याच वडिलांनी दहावीत शिकवलेली माधव ज्युलियन यांची ‘भ्रांत तुम्हा का पडे’ ही कविता आठवायची. ते ठासून शिकवायचे, ‘कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला. थांबला तो संपला...’
गावातून निघताना मनात ध्येय बाळगलं होतं. ते साध्य करायची ईर्षा होती. पण पहिल्याच दिवशी रॅगिंगचा अनुभव आला. सिनिअर्सनी नाचायला लावलं. नाचलो. गाणं म्हणायला लावलं ते पण म्हटलं. दुसºया दिवशी रॅगिंगच्या धाकानं होस्टेलच्या रूममध्ये लपून बसलो; पण ठरवलं, आलेल्या प्रसंगांना तोंड दिलंच पाहिजे. गावात अकरावी- बारावीला झुरळ आणि गांडुळावर डिसेक्शन करावं लागायचं. इथं पहिल्याच दिवशी अ‍ॅनाटॉमी लॅबमध्ये माणसाच्या बॉडीवर तो प्रयोग करावा लागला. गाव आणि शहर याच्यातील हा फरक होता.
गावात मी व्हॉलीबॉल आणि क्रि केटमध्ये चांगला खेळाडू होतो. शाळेत मी स्टेटपर्यंत मजल मारली होती. शाळेत गॅदरिंगला नाटकं केली होती. त्याचा मला येथे फायदा झाला. या खेळांमुळे आणि कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये माझी छाप पडल्यानं माझा मित्रपरिवार वाढला. मी इंग्रजी भाषाही आत्मसात केली. या वातावरणात रुळताना आधी त्रास झाला. मग हळूहळू अंगवळणी पडलं.
जे आधी वेगळ्या नजरेनं पाहायचे ते मस्त गप्पा करू लागले. मी प्रत्येक वर्षी यश मिळवत राहिलो. मेडिकलची हीच खासियत आहे, की तुम्ही लगेच एकमेकांच्या सहवासात, एकत्र काम करताना दोस्त होता. प्रत्येक वेळेस तुम्हाला एकमेकांची कुठे ना कुठे गरज लागतेच. मुंबई महानगरी आहेच इतकी भारी की ती सर्वांना आपल्यात सामावून घेतेच. या महानगराने माझ्यात आत्मविश्वास पेरला. जिद्दीने जीवनाचा प्रवास करायला शिकवलं. गावापेक्षा किती तरी जास्त व्यावहारिक ज्ञान दिलं. नवी आशा, नवी उमेद दिली.
त्याच बळावर मी डॉक्टर बनू शकलो.
या महानगरीने मला पाच वर्षे तर सामावून घेतलंच, आताही हे शहर मला आपलंसं वाटतं. कधी तरी गावाकडे चार-पाच दिवसासाठी जातो. गावचं गावपण हरवत चाललंय असंही वाटतं. पण तेवढ्यापुरतंच. दोन दिवस राहून मी मुंबईला परत येतो.

(बीडीएस, एमजीएम डेण्टल अ‍ॅण्ड मेडिकल कॉलेज, नवी मुंबई )
 

Web Title: Mumbai Medical and Next .. Some of the Travel memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.