‘वो कर सकता है, तो मै क्यूं नही?’
By admin | Published: December 28, 2016 04:26 PM2016-12-28T16:26:36+5:302016-12-28T17:47:56+5:30
सिनेमाच्या पडद्यावर जे फारसं कुणी बोललं नाही, ते २०१६ च्या सिनेमांतल्या माणसांनी बोललं, जगून पाहिलं ! सिनेमानं कातबित टाकली नाही, पण वास्तवात जगतात तसं जगून पाहू म्हणत एक रिअॅलिटी टर्न मात्र अचूक मारला..
- अनादी नाशिककर
सिनेमाच्या पडद्यावर जे फारसं कुणी बोललं नाही,
ते २०१६ च्या सिनेमांतल्या माणसांनी बोललं,
जगून पाहिलं !
सिनेमानं कातबित टाकली नाही,
पण वास्तवात जगतात तसं जगून पाहू म्हणत
एक रिअॅलिटी टर्न मात्र अचूक मारला..
यावर्षीही दरवर्षीप्रमाणं खोऱ्यानं सिनेमे आले.
काही टुकार, काही सुमार. काही मनोरंजनापुरते आणि काही मात्र आपल्याला जरा विचारात पाडणारे. नवी मूल्यं, विचारधारा, जगण्याची रीत यांची चर्चा करत तीन तास खिळवून ठेवणारे..
‘वेगळे’ म्हणता येतील असे बरेच सिनेमे आले यंदा हे खरं पण याचा अर्थ २०१६ या वर्षात बॉलिवूडनं एकदम कातबीतच टाकली असं नाही. सुल्तान यंदाचा ब्लॉकबस्टर, सुपरडूपर हिट सिनेमा सालाबादप्रमाणे यंदाही बिनडोकच होता. वयाच्या तिसाव्या वर्षी कुस्तीत उतरून आॅलिम्पिक गोल्ड मेडल मिळवणारा नायक आणि आॅलिम्पिक स्पर्धेच्या आधी गरोदर असल्याची बातमी कळल्यावर ‘मेरा गोल्ड मेडल तो मुझे मिल गया’ असले टाळीबाज वाक्य फेकणारी नायिका यांनी प्रेक्षकाला त्याच्या कम्फर्ट झोनमध्येच ठेवलं. प्रेक्षकांनीही ३०० कोटींपेक्षा जास्त धंदा देऊन त्याचा मोबदला चुकवला. पण चलता है, सिनेमावाल्यांनी तरी कुठं धर्मादाय संस्था उघडली आहे, त्यांनाही धंदा करायचा आहे.
मात्र तरीही या वर्षाची कमाई हीच की, वेगळ्या वाटेवरचे सिनेमे काढूनही ते चालतील आणि आपले खिसेही भरतील हा विश्वास फिल्ममेकर्सला मिळाला.
बदल नसला तरी याला बदलाची सुरु वात म्हणता येईल.. कदाचित !
काय दिसलं
सिनेमाच्या पडद्यावर?
* नीरजा, एम. एस. धोनी : अॅन अनटोल्ड स्टोरी, सरबजिीा, अलिगड, अण्णा हजारेंच्या आंदोलनावर बेतलेला अण्णा, वीरप्पनच्या आयुष्यावरचा वीरप्पन आणि भारतीय क्रि केट संघाचा माजी कॅप्टन अझहरु द्दीन याच्या आयुष्यावरचा अझहर हे बायोपिक आणि नुकताच रिलीज झालेला दंगल हे सारे सिनेमे काय सांगतात?
* या चित्रपटांच्या लाटेने एक कुठली महत्त्वाची गोष्ट केली असेल तर ती म्हणजे खऱ्याखुऱ्या, अवतीभोवती जगणाऱ्या, हाडामासाच्या माणसांना ‘लार्जर दॅन लाइफ हिरो’ बनवलं. सिनेमात पडद्यावर दिसणारी ही माणसं कुणा लेखकाच्या कल्पनाशक्तीचा आविष्कार नव्हती; ती आपल्याच देशात, शहरात, गल्लीत राहणारी, आपल्याचसारखी चांगल्या-वाईटाची धनी असणारी जिवंत माणसं होती. त्यामुळे त्यांचं यश, अपयश, साहस, शौर्य सगळं आपल्याला जवळचं वाटलं. पारंपरिक मसाला चित्रपटांच्या पठडीत बसूनही या बायोपिक्सनी प्रेक्षकाला चित्रपट संपल्यावरही उरणारी ‘वो कर सकता है, तो मै क्यूं नही’ अशी उमेद दिली.
* रुढार्थानं बायोपिक नसणारा पण वास्तवतेचे झणझणीत अंजन डोळ्यात घालणारा ‘उडता पंजाब’ आला तोही असाच अस्वस्थ करत. तरुणांचा देश असं बिरु द मिरवणाऱ्या देशात तरुणाईचीच कशी विधळवाटी केली जाते ते दाखवलं या चित्रपटाने.
* गेल्या वर्षीचा एक ट्रेण्ड याही वर्षी कायम राहिला. तरुणांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांचा उत्तरं शोधायचा प्रवास ही बऱ्याच सिनेमांची सेंट्रल थिम राहिली. ‘डिअर जिंदगी’ वर्ष सरता सरता खूप गाजला तो याच पठडीतला. ‘वी डोण्ट नो हाऊ टू एक्स्प्रेस आवरसेल्व्हज, नॉट हॅपिनेस, नायदर सॅडनेस अॅण्ड नेव्हर लव्ह’. शाहरु ख खानचा हा डायलॉग कित्येक तरुण मनांना स्पर्शून गेला. आपल्या भावनिक, मानसिक त्रासाच्या काळात एखाद्या प्रोफेशनल थेरपिस्टची मदत घेण्यात काहीच गैर नाही असं जाहीरपणे दाखवलं ते या सिनेमाने.
* मानसिक विकारांना नव्या पद्धतीने पेश करणारा राधिका आपटेचा ‘फोबिया’ही उल्लेखनीय होता. मानसिक विकार हे समाजाचं वास्तव आहे. प्रत्येक जण कमी जास्त प्रमाणात या आजारांचा सामना करत असतो. पण त्यावर उपचार होत नाहीत. यावर्षी सिनेमे मोकळेपणानं यासंदर्भात नुस्ते बोलके झाले नाही, तर त्यांनी मानसिक विकार म्हणजे ठाशीव वेड्यांचं हॉस्पिटल या वेडगळ समजातून स्वत:ची आणि प्रेक्षकांचीही सुटका केली. आपल्या अवतीभवती असणाऱ्या संवेदनशील विषयांना तितक्याच प्रामाणिक संयमाने हाताळण्याची नवी कला यावर्षी हिंदी सिनेमांनी साधली.
* हंसल मेहताचा ‘अलिगढ’ आणि शकुन बात्राचा ‘कपूर अँड सन्स’ त्यातलेच. आजवर होमो सेक्शुअलिटीचा विषय हिंदी सिनेमांनी एकतर कांताबेनच्या पाचकट विनोदांनी दर्शविला नाहीतर अतिलाऊड, बीभत्स वाटावा असा तृतीयपंथीयांसाठी अपमानास्पद रूपात. पण या दोन्ही चित्रपटांनी गे असण्याला मानवीय पातळीवर आणून ठेवलं.
* विशेष म्हणजे यंदा हिंदी चित्रपटांनी भर दिला मानवी नातेसंबंधांची वीण उलगडून दाखवण्यावर. डिअर जिंदगी, कपूर अँड सन्स, ए दिल है मुश्कील, बेफिक्रे हे त्यातली नेमकी चार उदाहरणं सांगता येतील. मॉडर्न जगातल्या नात्यांच्या जात्यात आणि सुपात सापडलेल्या तरु णांच्या कथा वेगवेगळ्या अँगलने दाखवल्या. प्रेम आहे की फ्रेंडशिप? एकाशी बांधून राहायचं की दुसरा शोधायचा? आईवडिलांच्या भांडणात आपण कोणाची बाजू घ्यायची? नातेवाइकांचं काय करायचं? पैसा कोणी कमवायचा? सेटलमेंट म्हणजे नक्की काय? - अशा एक ना अनेक प्रश्नांच्या जगात, त्यांच्या उत्तरांच्या शोधात तरुणांना या सिनेमांनी नेलं.
* या सगळ्यात वेगळा ठरला तो आर. बल्कीचा ‘की अॅण्ड का’. हाउस हसबंड या थिमभोवती हा सिनेमा विणलेला नव्हता, तर त्यात स्त्री-पुरु ष समानतेचा एक रिव्हर्स अँगलही होता. स्त्री असो वा पुरुष, संसारात जो पैसे कमावून आणतो तो आपसूकच स्वत:ला सुपीरिअर समजायला लागतो. तिथे समानता राहत नाहीच. आजही आपल्यापेक्षा कमी पैसे कमावणारा मुलगा मुलींना चालत नाही. करीना कपूर आणि अर्जुन कपूरच्या या चित्रपटाने समानता म्हणजे समोरचा जे करतो ते आपणही करणं नव्हे, तर आपल्याला जे हवंय ते करणं आणि त्या बरोबरीने दुसऱ्याचाही तितकाच आदर करणं हे म्हणजे समानता असा नवा अर्थ शिकवला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मूल नको असणारी, करिअरच्या मागे धावणारी, महत्त्वाकांक्षी स्त्री या सिनेमात हिरोईन म्हणून दिसली, व्हॅम्प म्हणून नाही हे काय कमी वेगळं आहे?
* वेगळ्या धाटणीचा म्हणून ‘पिंक’चंही बरंच कौतुक झालं. आपल्याला आधी माहीत नसणारं असं काहीएक नवीन या सिनेमात नव्हतंं. पण तरीही ‘नाही म्हणजे नाही’ हा ठाम संदेश चर्चात्मक पातळीवरून मुख्य प्रवाहातल्या सिनेमात यानिमित्तानं आला. अमिताभ बच्चनसारख्या महानायकाच्या तोंडून ‘नो मिन्स नो’ हा डायलॉग लाखोंनी ऐकला. दारू पिणारी, पबमध्ये जाणारी, स्वत:च्या आवडीनं कमी कपडे घालणारी आणि बॉयफ्रेंडही असणारी मुलगी आपल्याला अॅव्हेलेबल नसते, असं ठामपणे पिटातल्या प्रेक्षकाला, त्याच्या मताची पर्वा न करता, सांगण्याचं क्र ेडिट या सिनेमाला दिलंच पाहिजे.
सैराट झालं जी..
बॉलिवूडच्या साऱ्या धावत्या पसाऱ्यात मराठी सैराटचं नाव आवर्जून घ्यावंच लागेल. बॉलिवूड नाही तर साऊथमध्येही सैराटचे चर्चे झाले. सिनेमा लोकप्रिय झाला, हे सारं तर खरंच !
पण सैराटच्या निमित्तानं आर्ची नावाची हिरोईन ‘हिरो’ म्हणून प्रेक्षकांसमोर आली. आणि त्या आर्चीनं सिनेमातलं नायिकेचं पारंपरिक चित्र नुस्तं नाकारलं नाही तर बदलून टाकलं, ते जास्त महत्त्वाचं.
सैराटची नोंद घेतल्याशिवाय २०१६ चा सूर्य मावळूच शकत नाही.