जा, जिले जिंदगी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 07:51 PM2018-04-27T19:51:20+5:302018-04-27T19:51:20+5:30

कोल्हापूरचा मेधप्रवण. इंजिनिअर. मात्र सिनेमाक्षेत्रात काम करायचं ही ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्या ओढीतून त्यानं एफटीआय गाठलं आणि तिथून सुरू झाला एक नवीन प्रवास..

Go, district life | जा, जिले जिंदगी

जा, जिले जिंदगी

Next

- मेधप्रवण सरस्वती बाबासाहेब
अलीकडेच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांत पुण्याच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार लाभले. विद्यार्थी म्हणून केलेल्या फिल्म्सना थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही विशेष अभिमानाची गोष्ट. नॉन फीचर फिल्म विभागात हे पुरस्कार लाभले. मेधप्रवण पवारच्या हॅपी बर्थडे या लघुपटालाबेस्ट फिल्म- फॅमिली व्हॅल्यूज या अंतर्गत तर स्वप्निल कापुरेच्या भरदुपारी या फिल्मला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.
येत्या ३ मेला पुरस्कार वितरण होणार आहे. त्यानिमित्त मेधप्रवण आणि स्वप्निल सांगताहेत एफटीआयपर्यंतच्या आणि तिथल्या शिकण्याच्या
प्रवासाची त्यांची गोष्ट. हातात सेट करिअर असताना केवळ सिनेमानिर्मितीच्या ओढीपायी या तरुणांनी स्वत:ला पुन्हा कसोटीला लावलं. भाबड्या भारावलेपणानं नव्हे तर अभ्यासाच्या कठोर शिस्तीत तंत्र आणि मंत्राचे धडे गिरवले त्या नव्यानं शिकण्याच्या प्रोसेसविषयीचे अनुभव त्यांनी शेअर केले आहेत.. मी मूळचा कोल्हापूरचा. बाबा हिंदी विषयाचे प्राध्यापक, तर माई गृहिणी. बाबांना अभिनयाची आवड होती आणि नोकरी सांभाळून संधी मिळेल तेव्हा ते नाटकांत काम करायचे. लहानपणी मी त्यांच्या नाटकांच्या तालमी पहायला जायचो. त्यांना काही मराठी चित्रपटांत काम करण्याची संधीदेखील मिळाली. बाबा मला त्यांच्याबरोबर तालमींना, शूटिंगला न्यायचे. रंगमंचावरचा तो प्रकाश, लोकेशनवरचे रिफ्लेक्टर्स, लाइट्स, कॅमेरा, अभिनेत्यांच्या रिहर्सल्स या सगळ्या वातावरणात मी रमून जायचो आणि इथूनच या सगळ्याविषयीचं आकर्षण निर्माण झालं.
शालेय आणि महाविद्यालयीन काळात विविध गुणदर्शन कार्यक्र मांमध्ये माझा सक्रि य सहभाग होता. पुढे कौटुंबिक जबाबदाऱ्या पाहता आणि आयुष्यात सेटल होण्याच्या घरातल्यांच्या विचारसरणीमुळे, नाट्य आणि सिनेक्षेत्रात पूर्ण वेळ कारकीर्द करण्याची इच्छा असूनही तसं करणं शक्य नव्हतं.
मी नववीत होतो, तेव्हा इतकं समजत नव्हतं; पण आता सांगतानासुद्धा अंगावर काटा उभा राहतोय. बाबांना ब्रेन ट्युमर झाला होता. मुंबईमध्ये मोठी शस्त्रक्रिया करून तो यशस्वीरीत्या काढण्यात आला; पण त्यानंतर बाबांना तब्येतीला खूप जपावं लागत होतं. त्यांचं आवडतं नाट्य अभिनयाच काम त्यांना जवळ जवळ बंद करावं लागलं.
इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर नोकरीच्या निमित्ताने मी पुण्यात आलो. काम व्यवस्थित चालू होतं. पुण्यात आल्यावर अ‍ॅनिमेशनच्या जगाशी ओळख झाली आणि जशी जशी त्याबद्दलची माहिती मिळवत गेलो तशी एक खात्री पटली की जर मी हे शिकलो तर यामध्येच नोकरीपण करता येईल. चित्रपट क्षेत्रातपण काम करता येईल. त्यामुळे डिझाइन इंजिनिअरसारखी चांगल्या हुद्द्यावरची नोकरी सोडून, मधला मार्ग निवडत, घरातल्यांची कशी-बशी(विशेषत: माईची) समजूत काढत अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग शिकलो. विशेष म्हणजे माझा कोर्स पूर्ण होण्याआधीच एका मोठ्या गेमिंग कंपनीत मला नोकरी मिळाली. घरचे खूश आणि मीही.
मनासारखं काम, चांगली नोकरी, असं असूनही नाटक आणि चित्रपटांचं आकर्षण तसूभरही कमी झालं नाही. उलट आता मी त्यामध्ये आणखीनच उत्सुकतेने काय काय करता येऊ शकेल याचा शोध घेऊ लागलो, नाटक-चित्रपट पाहू लागलो.
या सर्वात टर्निंग पॉइण्ट होता तो म्हणजे पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काइव्हमध्ये दर वर्षी होणारा ‘युरोपियन फिल्म फेस्टिव्हल’. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने संपूर्ण युरोपमधील सर्वोत्तम निवडक चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. त्यानं चित्रपटांबद्दलची माझी संकल्पनाच बदलून गेली. काय विचार करतात हे लोक? किती वेग-वेगळे विषय? अगदी सरळ सोप्या मांडणीपासून ते अगदी सहा फूट डोक्यावरून जाणारे चित्रपट पाहिले; पण एकूण एक चित्रपटाने माझ्या मनात काही छबी कायमच्या कोरल्या.
दरम्यानच्या काळात, दोनाचे चार झाले. नवीन घर घेतलं; त्याच्याबरोबर इएमआय फ्री आला होता आणि आता तो बरीच वर्षे आमच्या सोबत राहणार होता. प्रियाच्या नोकरीमुळे आर्थिक हातभार मिळात होता.
नाट्य चित्रपट क्षेत्रात काम करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. मी इंटरनेटवर चित्रपट निर्मितीवर, अभिनयावर माहिती मिळवायचो. विविध कार्यशाळांमध्ये भाग घ्यायचो. उमेश कुलकर्णींच्या चार दिवसीय ‘शॉर्ट फिल्म मेकिंग’च्या कार्यशाळेतून, एकूणच चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाबद्दल बरच काही शिकायला मिळालं. त्यांच्या दर्शन, गारुड, विलय, थ्री आॅफ अस आणि गिरणी या सगळ्या प्रोजेक्टचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे. ‘वळू’ची तर मी पारायणं केलीयेत. मी आणि माझे कंपनीतले मित्र दिवसभर नुसते ‘वळू’मधील संवादफेक करायचो.
अभिनय, नृत्य आणि संगीत या तिन्हीमध्ये आपली कुठंवर मजल जाते, हे प्रशांत दामलेंच्या टी स्कूलमध्ये जाणून घेता आलं. तिथे मला उत्कृष्ट विद्यार्थ्याचं पहिलं पारितोषक मिळालं. यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला. आपण योग्य दिशेने जात आहोत याची जाणीव होत होती.
पण नोकरी करत या सर्व गोष्टींमध्ये सातत्य ठेवणं अवघड जात होतं. मी जे काही करत होतो ते एक आवड म्हणूनच मर्यादित राहत होतं. त्यात आता चारचे सहा झाले होते. प्रिया आता पूर्णवेळ आईच्या ड्यूटीमध्ये, कौस्तवचा सांभाळ करण्यात गुंतली होती.
२०१४ मध्ये फिल्म इन्स्टिट्यूटमधील एका विद्यार्थ्याच्या शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस, इन्स्टिट्यूट आणि तिथलं वातावरण खूप जवळून अनुभवता आलं. प्रभात स्टुडिओमध्ये लागणारे विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट्सचे सेट्स, शांताराम तलाव, मारुती मंदिर, विज्डम ट्री हे सगळं प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळाली. प्रसन्न वातावरण आणि तिथली भारावून टाकणारी ऊर्जा साद घालत होती. इतकी वर्ष वाट धुंडाळणाºया मनाला त्याचं ठिकाण सापडल होतं.
चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीमधील तंत्रशुद्ध शिक्षण घ्यायचं असेल तर या वास्तूशिवाय दुसरा पर्यायच नाही. त्या दिवशी त्या विद्यार्थ्याचं शूटिंग संपवून घरी जातानाच ठरवलं की एक न एक दिवस मीसुद्धा इथे विद्यार्थी म्हणून माझा प्रोजेक्ट करणार.
ठरवलं तितकं ते सोपंपण नव्हतं. पूर्वतयारी करताना जितकी माहिती मिळवली त्यात हे समजलं की, एफटीआयआय प्रवेश परीक्षा खूप कठीण असते आणि त्याहून कठीण अंतिम फेरीपर्यंत पोहचून निवड होणं. कारण प्रत्येक शाखेसाठी बºयाच जागा असतात.
झिरो अ‍ॅडमिशन इअर आणि संपामुळे दोन वर्षे परीक्षाच झाली नाही. माझं स्वप्न, स्वप्नच राहत होतं.
अखेरीस २०१६-१७ साठी घरातल्यांना न सांगता परीक्षा दिली. उत्तीर्ण झालो. इंटरव्ह्यू राउण्डपण उत्तीर्ण झालो आणि टीव्ही डायरेक्शनच्या अंतिम बाराच्या यादीत नाव आलं. एका बाजूला प्रवेश मिळत असल्याचा आनंद, तर दुसरीकडे हे माईला, प्रियाला कसं सांगायचं हा पडलेला प्रश्न.
परीक्षेस बसलेल्या ३५०० विद्यार्थ्यांमधून, चार शाखांसाठी फक्त ४८ विद्यार्थी अ‍ॅडमिशनसाठी पात्र होतात आणि त्यात आपला मुलगा आहे हे समजल्यावर आईच मला म्हणाली, ‘जा, जी ले अपनी जिंदगी!’
बाबा तर जाम खूश होते. त्याचं अपुरं राहिलेलं स्वप्न ते माझ्यात पूर्ण होताना बघत होते. म्हणाले, ‘एक वर्ष तुझा इएमआय मी सांभाळतो. तू मन लावून शिक.’ बाबांचं हे पाठबळ निश्चिंत करणारं होतं. पुढील दीड वर्षे घर चालू शकेल इतके पैसे शिल्लक ठेवून, माझं बाकी सगळं सेव्हिंग्ज देऊन घरकर्जाचा हफ्ता कमी करून घेतला. प्राजक्तानं, माझ्या धाकट्या बहिणीने मला कामासाठी लॅपटॉप दिला.
प्रियासाठी हे सगळं पचवणं जरा कठीण होतं. काही वर्षांनी कौस्तवला शाळेत घालायची वेळ आली असताना त्याचा बापच अजून शिकायचं म्हणतोय म्हटल्यावर, तिचं काळजी करणं रास्तच होतं. पैशाचं सोंग घेता येत नाही. त्यात ती अजून एखाद वर्ष नोकरीपण करू शकणार नव्हती. पण तिला माझ्यावर विश्वास होता. मी जे काही करेन ते विचारपूर्वकच करेन आणि ती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली.
जोखीम पत्करत होतो. इतक्या वर्षांपासूनच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी नोकरी सोडली आणि चित्रपटनिर्मिती आणि दिग्दर्शनासाठीचा प्रवास चालू झाला.
चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून त्याची भूमिका किती महत्त्वाची असते. एका अर्थाने चित्रपटातल्या प्रत्येक फ्रेमसाठी तो जबाबदार असतो. या माध्यमाचा प्रभावी वापर करून तो समाजमनावर ठसा उमटवू शकतो.
एक वर्ष मन लावून शिकलो. प्रत्येक प्रोजेक्ट अगदी जीव झोकून केला.
शेवटच्या प्रोजेक्टच्या कथेसाठी मी आणि माझा सहपाठी मित्र चर्चा करत होतो. असंच बोलण्यातून तो एका लग्नाला गेलेला असतानाचा प्रसंग सांगत होता. खूप मोठं लग्न होतं आणि तिथे कार्टून मास्क घालून ४-५ जण सर्वांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यातला एक मॅस्कॉट थोडा बाजूला उभा होता, तो असा शांत, पोक काढलेला उदास दिसत होता.
हेच माझ्या कथेचं बीज ठेवून मग तिला आकार दिला. कोण असेल त्या मुखवट्याच्या आतला माणूस? कॉलेजमधला मुलगा? मोठा वयस्क? का करत असेल हे काम? नाइलाज म्हणून की आवडीने? त्यानं घरी सांगितलं असेल का या कामाबद्दल? की लपवून ठेवलंय? त्यांना समजलं तर काय होईल?
यासाºयातून हॅपी बर्थडे हा चित्रपट साकारला.
पहिल्याच चित्रपटाला सर्वोच्च शाब्बासकी मिळाल्यावर ऐकल्यावर खरंच डोळ्यातून पाणी आलं होतं. ही शाब्बासकीची थाप माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, त्यांच्या पाठबळाशिवाय मी इथवर पोहचूच शकलो नसतो. इतक्या वर्षांची, याच क्षेत्रात काम करण्याची तळमळ आणि मेहनत फळाला आली असं वाटतंय. पुढे अजून चांगला काम करण्यासाठी प्रोत्साहनपण मिळालंय...
हॅपी बर्थडेची गोष्ट 
‘हॅपी बर्थडे’ची कथा अनेक प्रश्नातून आकारास आली.. मूल फक्त पालकच वाढवत नसतात तर संपूर्ण समाज त्याला घडवत असतो, शिकवत असतो. या देवाण-घेवाणीतूनच मुलं स्वत:ची मतं, वृत्ती आणि ओळख विकसित करतात. काहीवेळा ही शिकवणूक सोपी असते आणि कधी कधी आपल्याला योग्य तो धडा शिकण्यासाठी कठीण परिस्थितीतून जावं लागतं. एखादी व्यक्ती कोणते कपडे घालते यापेक्षा त्या कपड्यांच्या आतला माणूस कसा आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. हा एक महत्त्वाचा धडा प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी न कधी घेत असते.
हॅपी बर्थडे हा लघु चित्रपट, याच प्रश्नाचं उत्तर वडील-मुलाच्या नात्यातून शोधण्याचा प्रयत्न करतो. एक वडील जे दिवसभराच्या नोकरीव्यतिरिक्त, संधी मिळेल तेव्हा मॅस्कॉट एण्टरटेनर म्हणून काम करतात.
त्यांच्या मुलाला मात्र वास्तव पचवणं कठीण होतं, त्यांची ही कथा आहे. जेव्हा मुलगा परिस्थिती समजून घेतो आणि त्यानुसार त्याच्या विचारसरणीत बदल करतो तोच खरा वाढदिवस ठरतो..
या लघुपटाला कौटुंबिक मूल्यं जपणारा उत्कृष्ट चित्रपट म्हणून यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात रजत कमल देऊन गौरवण्यात आलं. ही समाधानाचीच गोष्ट आहे.

(ऑक्सिजन टीम)

Web Title: Go, district life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.