रफू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 05:13 PM2018-01-31T17:13:49+5:302018-02-01T16:16:30+5:30

इथं आजीच्या नऊवारीची मायेची गोधडी होते, तिथं यूज अ‍ॅण्ड थ्रो कसं चालेल?

Darn | रफू

रफू

googlenewsNext

- अदिती मोघे
वेस्टर्न जगात यूज अ‍ॅण्ड थ्रोची संस्कृती उदयाला यायची त्यांची कारणं असतील. मधल्या काळात ती संस्कृती वेगाने फोफावली खरी; पण आपल्याकडे हा विचार मुरायला सोपा नव्हे.
पुरवून वापरणं हे आपल्या हाडात आहे. आजीचे कपडे नातीला येईपर्यंत वापरायची पद्धत आपल्यासाठी आश्चर्याची गोष्ट नव्हे. बापाच्या चपलेत पोराचा पाय पोहचेपर्यंत ती टिकवायची असते हे गृहीतक आहे.
फेव्हिकॉलची ती अ‍ॅड होती बघा मागे ज्याची टॅग लाइन आहे. मजबूत जोड हे, टुटेगा नही. ते इथे सगळ्याच गोष्टींना लागू आहे. आपल्या संस्कृतीत फॅशन ही इतिहासजमा होत नाही, ती रिसायकल होत राहते.
त्यामुळे शहरं सोडली तर आजही गावं याच विचारांना धरून आहेत. आणि भारत या खेड्यांचा देश आहे.
पु.लं.च्या लिखाणातलं मांजरपाट कापड, मळखाऊ रंगाचं कापड हे आपल्याकडे चालतं. कारण ते मळलं तरी कळत नाही. पण असा विचार करतो म्हणजे म्हणून सौंदर्यदृष्टी नाही, असं अजिबातच नाही.
राजस्थानच्या रेतीच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे रंगीबेरंगी फेटे आणि मोजड्या, पगड्या. पांढºया आणि सोनेरी रंगाच्या केरळ मधल्या साड्या, कर्नाटक मधलं इरकल, महाराष्ट्रातली कोल्हापुरी चप्पल या सगळ्यातली कॉमन गोष्ट म्हणजे त्यांचा वेगळेपणा.
आजीच्या जुन्या नऊवारची नंतर मायेची मऊ गोधडी होते. माणसांच्या आयुष्याइतकीच किंबहुना त्यांच्या साड्या, धोतर, फेटे, चपलांची आयुष्य असतात असं मुळात मानणारी ही संस्कृती आहे. इथला राष्ट्रपिता पंचे नेसून जगात वावरतो आणि इथे अंतरंगाचा सौंदर्याशी थेट संबंध आहे असं मानलं जातं.
माणसांचं सौंदर्य त्याच्या कपड्यांवरून नव्हे तर त्याच्या कार्यावरून मोजलं जात असल्यामुळे आपल्या मुळापर्यंत फॅशनचं वारं शिरलं नाही.
त्या त्या पिढीचे बेलबॉटम्स आणि साधना कट वगैरे ट्रेण्ड्स होते, नाही असं नाही. पण घरांमध्ये कपाटात अजूनही आजीच्या, आईच्या पैठण्या नीट जपून ठवलेल्या सापडतात आपल्याला.
खूप जुने झाले कपडे की बोहारणीला देऊन भांडी घ्यायची पद्धत अजूनही सुरू आहे. मी जिथे गोरेगावला राहते तिथे दर गुरुवारी जुन्या कपड्यांचा बाजार लागतो आणि दणदणीत चालतोसुद्धा.
मध्यंतरी मी हिमाचलला भटकायला गेले होते, सोझा नावाच्या कुलू जवळच्या एका छोट्या गावात. तिथे मला नॅशनल स्कूल आॅफ डिझाईनमध्ये शिकणारे काही क्रिएटिव्ह विद्यार्थी भेटले, जे सगळे अशा जुन्या बाजारांमधून बिनधास्त कपडे उचलून वापरतात. तिथेच मला पॉल नावाचा पासष्टीचा ताठ आॅस्ट्रेलियन म्हातारा भेटला. आपली अनेक वर्षांची बुलेट पुरवून चवीने नीट वापरणारा. जन्म आॅस्ट्रेलियामध्ये झाला असला तर मनाने भारतीयच.
पदार्थांवर, वस्तूंवर विश्वास ठेवणारी संस्कृती आहे भारतीय. गोष्टी बिघडल्या म्हणून टाकून देणारी नाहीये. चपला शिवता येतात, कपडे रफू करता येतात. या विचारांबद्दल खूप आदर आणि माया असणारा पॉलसुद्धा तीन-चार जोडी कपडे वर्षभर वापरतो.
नैसर्गिक पद्धतीने बनणारे कपडे आणि धान्य यांचं मार्केटिंग सध्या जोरात सुरू आहे. पण या संस्कृतीत आॅरगॅनिकचा ट्रेण्ड फार माहीत नसतानासुद्धा सगळंच मातीकडून घेऊन मातीला परत द्यायचं असतं यावरच भर राहिलेला आहे.
त्यामुळे ब्रॅण्ड्स, अ‍ॅक्सेसरीज्, डिझायनर, गोष्टी यांचं बस्तान इथे सहज बसू शकत नाही. एकीकडे मॉल्सनी शहरांना एक सारखं, मोनोटोनस करून टाकायचा विडा उचलला आहे आणि दुसरीकडे अनेक डिझायनर्स आपल्या मुळांपर्यंत जाऊन जुन्या पद्धती रिव्हाइव्ह करण्यात खूप वेळ देत आहेत. सौंदर्य साधेपणात आहे असं मानणाºया आपल्या देशाला या सगळ्या जुन्या पद्धतीचं संवर्धन करण्यासाठी मात्र मोटिव्हेशनची गरज आहे एवढं नक्की.
शहरं जरी रोज बदलणाºया फॅशनच्या स्वाधीन होत असली तरी जुनं ते सोनं हा विचार आपल्या संस्कृतीतून तसाच पुढे जात राहील. पिढ्यान् पिढ्या जपल्या जाणाºया आजीच्या गोधडीसारखाच.
 aditimoghehere@gmail.com

 

Web Title: Darn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.