थरारक हॉकी सामन्यासारखंच गतिमान आणि अवघड आयुष्य जगणारा सरदारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 03:32 PM2017-09-06T15:32:25+5:302017-09-07T07:11:22+5:30

हॉकी संघातल्या खेळाडूचं नावं आपल्याकडं कुणाला सांगता येत नाही, त्या संघातला हा खेळाडू. वयानं सर्वात लहान कप्तान. सेण्टर हाफ म्हणून जबरदस्त खेळणारा. त्याचं आयुष्यही थरारक हॉकी सामन्यासारखंच गतिमान आणि अवघडही..

A daring and difficult life-style jamboree like a thrilling hockey match | थरारक हॉकी सामन्यासारखंच गतिमान आणि अवघड आयुष्य जगणारा सरदारा

थरारक हॉकी सामन्यासारखंच गतिमान आणि अवघड आयुष्य जगणारा सरदारा

Next

-चिन्मय लेले

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे..
हे वाक्य आपण पुस्तकात घोकलेलं असतं, तसं माहितीच असतं आपल्याला ते.
पण सध्याच्या भारतीय हॉकी संघात खेळणाºया खेळाडूंची नावं सांगा म्हटलं तर दोन नावं कुणी चटकन सांगणार नाही. हॉकीला ना ग्लॅमर आहे, ना हॉकीत पैसा. पण हॉकीत वेग आणि थरार मात्र आहे. आणि त्याच्यावर फिदा होऊन आजही अनेक खेळाडू हॉकीवर जीव ओवाळून टाकतात.
त्यातलाच एक सरदार सिंग.
प्रेमानं घरचे त्याला सरदारा म्हणतात.
याची संघातलीच काय पण हॉकी करिअरमधलीही वाटचाल सोपी नव्हती. या सरदाराभोवती अनेक वादळं घोंघावली. नामोहरम करणारी वळणं आली, पण तो मात्र हरला नाही. आणि त्या न हरण्याच्या, चिवट वृत्तीनंच यंदा त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारापर्यंत पोहचवलं. आणि त्याच्या आजवरच्या प्रवासाची नोंद घेणं क्रीडाजगाला भागच पडलं.
२००३-४च्या हॉकी ज्युनिअर टीममध्ये त्याचं सिलेक्शन ही त्याच्या प्रवासाची सुरुवात. वय वर्षे १७. सगळ्यात ज्युनिअर मोस्ट असा हा मुलगा. २००६ मध्ये त्याचं सिलेक्शन थेट भारतीय हॉकी संघातच झालं. पदार्पण केलं तेही पाकिस्तान संघाच्या विरोधात. आणि त्याच सामन्यापासून त्याचा टेरिफिक फिटनेस ही त्याची ताकद हॉकीच्या चाहत्यांना दिसली. या मुलाची चपळता हे त्याचं सगळ्यात मोठं कौशल्य.
बघता बघता त्याच्या हाती भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व आलं. सरदार हा भारतीय संघाचा सगळ्यात तरुण कप्तान असं रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.
सरदार सिंग सांगतो, ‘मी जे काही आहे ते हॉकीमुळे आहे. हॉकीशिवाय जगणंच नाही. ज्या ज्या वेळी मी, माझा संघ हॉकीचा सामना जिंकतो तो प्रत्येक क्षण आमच्यासाठी इमोशनल असतो. वाटतं, अजून आपण चांगलं खेळायला हवं.’
त्याला तसं वाटणंही स्वाभाविकच आहे. हरयाणातल्या अगदी छोट्या गावातला हा मुलगा. हॉकीचं वेड होतं. पण घरची परिस्थिती अगदीच बेताची. हॉकी खेळण्यासाठीचे बूट घ्यायला सुद्धा एकेकाळी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याच्या आईनं कितीदा सांगितलं की, हा खेळ सोड. आपल्याकडे पैसे नाहीत बूट घ्यायला, तर बाकी खुराक कुठून आणू? पण परिस्थितीशी झगडत, मदत मागत तो टिकून राहिला. वयाच्या १९ व्या वर्षीच भारतीय संघात सामील झाला. पुढे हरयाणा पोलीसमध्ये डेप्युटी सुपरिटेडण्ट म्हणून त्याला नोकरीही लागली. काळ बदलला, भारतातला सगळ्यात जास्त पैसे कमावणारा हॉकीपटू म्हणून तो विविध क्लबकडूनही खेळू लागला. सेण्टर हाफ अशा मोक्याच्या जागी तर तो खेळायचाच, पण त्याचं रिव्हर्स पासचं टेक्निक असं अफलातून की, हॉकीचे जाणकार आजही थक्क होतात.
तोच कॅप्टन असताना २०१४ मध्ये आशियाई स्पर्धेत भारतीय संघानं सुवर्णपदक जिंकलं. हॉकीला जीवदान देण्याचा एक मोठा टप्पाच म्हणायला हवा. पण सरदारा सांगतो, ‘१० वर्षे मी हॉकी खेळतोय, किती अडचणी आल्या. माझा फॉर्म बरावाईट होता. फॉर्म फार वाईट होता असं नाही; पण तरीही आपण आपल्या क्षमतेनुरुप खेळलो नाही असं वाटत राहणं फार वाईट! त्यावेळी मी स्वत:हून बाजूला होतो, प्रॅक्टिस करतो, गेम सुधारतो, परत स्वत:ला सिद्ध करतो. मला वारंवार स्वत:ला का सिद्ध करावं लागतं हे विचारण्याचा काळ आता गेला. आपलं लक्ष्य गाठायचंय तर पुन्हा पुन्हा हे करावंच लागेल!’
यंदा राष्टÑकुल स्पर्धा आहेत, आशियाई गेम्स आहेत त्यासाठी उत्तम कामगिरी करायची हे मनाशी ठरवून तो निघाला आहे. आजही त्याच्या संघातल्या जागेवरून वाद आहेत. मात्र त्यासंदर्भात न भांडता, खेळायचं ही जिद्द घेऊन हा खेळाडू संघात आपली जागा टिकवून आहे.
हॉकीइतकाच थरारक आहे त्याचा प्रवास, हे नक्की!

( चिन्मय मुक्त पत्रकार आहे.)

Web Title: A daring and difficult life-style jamboree like a thrilling hockey match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.