BlockChane: A new technology | ऊर्जा क्षेत्रातील 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञान

- ओंकार करंबेळकर

वीज वितरणाच्या साखळीत नवी जान ओतणारं एक नवीन तंत्रज्ञान.

वीज. मोठा प्रश्न. आपल्याच भागात लोडशेडिंगचा व्याप असतो असं नाही, तर जगभर वाढत्या विजेची मागणी आणि पुरवठा यांचं गणित जुळवता जुळवता तज्ज्ञ मेटाकुटीला आलेत. पण या दोन दोस्तांना भेटा.
त्यांनी एक अशी आयडिया सुचवली, असा एक प्रोजेक्ट केलाय की त्यांची ती आयडिया डायरेक्ट जागतिक बॅँकेनं उचलून धरली. आणि या दोघांना थेट अमेरिकेत येण्याचंच आवतण धाडलं. तिथं होणाºया परिषदेला हे पठ्ठे रवानाही झाले. तिथं जाण्यापूर्वी ‘आॅक्सिजन’ने त्यांना गाठलं आणि विचारलं की, नक्की आहे काय तुमची भन्नाट आयडिया?
ईश्वर अग्रवाल आणि क्रिशित अरोरा.
हे ते दोन दोस्त.
क्रिशित आणि ईश्वर दोघे इंजिनिअर.
‘अनंत उज्ज्वला’ नावानं त्यांनी आपली कल्पना वर्ल्ड बँकेला पाठवली होती. आता त्यांच्या या कल्पनेला जागतिक बँकेची मान्यता मिळाली असून, त्यावरचे सादरीकरण करण्यासाठी त्यांना वॉशिंग्टनला बोलावण्यात आलं आहे.
पण हे घडलं कसं?
हे दोघे समर स्कूलसाठी गेले होते चीनला. तेथे वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने आयोजित केली होती. तिकडेच या दोघांची भेट झाली. या व्याख्यानांमध्ये एकेदिवशी अमेरिकेतील एमआयटीच्या एका प्राध्यापकाने त्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची माहिती दिली. या दोघांच्याही डोक्यात या तंत्रज्ञानाची कल्पना चांगलीच बसली. हे तंत्रज्ञान भारतात कोणत्या क्षेत्रात बरं वापरता येऊ शकेल, या एकाच विषयावर दोघांचा विचार सुरू झाला. त्यांच्या डोक्यात एकाच वेळी विचार आला तो म्हणजे ऊर्जा क्षेत्राचा. गेल्या काही दशकांत भारतामध्ये ऊर्जा क्षेत्रात फारसा नव्या पद्धतीचा, नव्या नियमावलीचा समावेश झालेला नाही. तसेच या क्षेत्रात सरकारची एकाधिकारशाही असल्याचंही त्यांच्या लक्षात आलं.
भारतात बहुतांश म्हणजे जवळजवळ ७०% ऊर्जा ही पारंपरिक म्हणजे कोळशासारख्या स्त्रोतांवर आधारित आहे. उर्वरित ३० टक्क्यांमध्ये अपारंपरिक स्रोतांचा समावेश होतो. आता यामध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा अशा नव्या मार्गांचा मोठा वाटा आहे; परंतु ऊर्जा निर्माण करणाºया जागा घरांपासून आणि कारखान्यांपासून दूर असल्यामुळे त्यामध्ये देशाच्या संपत्तीचे मोठे नुकसान होत असल्याचे या दोघांना समजलं. बहुतांशवेळा तांत्रिक बिघाड, विजेची चोरी अशा प्रकारांमुळे ऊर्जा क्षेत्राला मोठा तोटा सहन करावा लागतो. मग या वीज वितरणामध्येच ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून पाहू असा विचार क्रिशित आणि ईश्वरने केला.
क्रिशित म्हणतो, ‘एकेकाळी सोलर पॅनल्स घरासाठी लावणं फारच महागडं होतं. सौर ऊर्जा या विषयाकडे छंद असल्यासारखे पाहिलं जायचं; पण आता परिस्थिती बदलली आहे. भारतासारख्या खंडप्राय आणि प्रचंड लोकसंख्या असणाºया देशामध्ये सौर ऊर्जानिर्मिती हा छंद नाही तर गरज झाली आहे. आता सोलर पॅनलच्या जागी सोलर टाइल्स आल्या आहेत. म्हणजेच कमीतकमी जागेत जास्त ऊर्जा निर्माण करण्याची संधी व सोय भारतीयांना मिळाली आहे. भविष्यात यामध्ये आणखी सुधारणा होईल. सोलर टाइल्ससारखे व त्याहीपेक्षा विकसित तंत्रज्ञान येईल. भिंतींमध्ये किंवा छतावर ही नवी पॅनल्स बसवता येतात. तुम्ही दिल्लीचा किंवा उत्तर भारताचा विचार केला तर वर्षभरात ८ ते ९ महिने सौर ऊर्जा भरपूर प्रमाणात तेही फुकटात मिळते. मग हीच ऊर्जा घरासाठी वापरायला सुरुवात करणं आम्हाला अपेक्षित आहे. नव्या टाइल्स आणि पॅनल्समुळे सौर ऊर्जा घराच्या गरजेपेक्षा जास्त तयार होईल. ही जास्त ऊर्जा एकतर लोकांना साठवावी लागेल किंवा विकावी लागेल. घरामध्ये ऊर्जा साठवण्यासाठी तुम्हाला बॅटरीची आवश्यकता आहे. बॅटरीचा खर्च, तिची दुरूस्ती किंवा इतर प्रश्न प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या कुवतीच्या बाहेरचे आहे. म्हणून आम्ही ही अतिरिक्त ऊर्जा विकली जावी अशा मताचे आहोत. त्यासाठी आम्ही ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरावं असंं आम्ही आमच्या प्लॅनमध्ये सुचवलं आहे. आता ब्लॉकचेनमध्ये ग्राहक स्वत:सुद्धा वीजनिर्माते होऊ शकतात. आजवर आपण केवळ एकजण विजेची निर्मिती करतो आणि दुसरा ती खरेदी करतो हे पाहिलं आहे. पण, आता मात्र ग्राहक स्वत:ही वीज तयार करू शकतात. केवळ एका बाजूने होणारा हा विजेचा व्यवहार दोन्ही मार्गांनीही करता येणार नाही. दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे ऊर्जेच्या देवाण-घेवाणीचं प्रत्येक रेकॉर्ड यात नोंदलं जातं. म्हणजे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा लबाडी यामध्ये करता येणार नाही. लोकांनी घरीच तयार केलेली ऊर्जा इतर घरांना किंवा लहान कारखान्यांना विकावी. ज्याप्रमाणे घरांसाठी विजेचा प्रति-युनिट दर कमी असतो आणि कारखान्यांसाठी वेगळा असतो तसा त्यांना याबाबतीतही आकारता येईल. आता घरांवरील पॅनल्समधून तयार झालेली वीज फार काही पैसे मिळवून देणार नाही हे आम्हाला समजतंय; पण थोडेतरी पैसे लोकांना मिळू लागतील. तुम्हाला काहीही न करता किंवा कमी भांडवलावर सतत फायदा होत असेल आणि घरातही मोफत ऊर्जा मिळत असेल तर त्यात काय वाईट आहे?’
अर्थातच त्यासाठीचं ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित वितरण व्यवस्थेचं एक प्रेझेण्टेशन त्यांनी तयार केलं आहे.
त्यातून पुढं काही विकसित झालं तर या दोन तरुण इंजिनिअर्सच्या सुपीक मेंदूचे कष्ट सुफळ झाले असं म्हणता येईल!

वर्ल्ड बँकेच्या या आठवड्यात होत असलेल्या यूथ समिटची तयारी जुलै महिन्यापासूनच सुरू होती. जगभरातील साधारण १५० देशांकडून तरुणांकडून नव्या कल्पनांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. वर्ल्ड बँकेच्या या आवाहनाला हजारो तरुणांनी प्रस्ताव पाठवले होते. जुलै-आॅगस्ट महिन्यामध्ये क्रिशित आणि ईश्वर यांनीही आपला प्रस्ताव पाठवला होता. त्यांच्या प्रस्तावाची टॉप १० मध्ये निवड झाल्याचे वर्ल्ड बँकेने या दोघांना नुकतेच कळवले. या आठवड्यात होत असलेल्या परिषदेत या दोघांचा संघ इतर सहा संघांबरोबर तेथे सहभागी होत आहे. या सहाही संघांच्या कल्पनांमधून एका अंतिम विजेत्याचे नाव घोषित होईल. परंतु सर्व संघांच्या कल्पनांवर संशोधन होण्यासाठी आणि त्या अमलात येण्यासाठी मदतही केली जाणार आहे.

( ओंकार लोकमत आॅनलाइनमध्ये उपसंपादक आहे.onkark2@gmail.com)