टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी २३ जुलैपासून; आयओसी व आयोजकांतर्फे घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:26 AM2020-03-31T00:26:09+5:302020-03-31T00:26:34+5:30

पॅरालिम्पिक सामने २४ ऑगस्टपासून

Tokyo Olympics from July 23 next year; Announcement by IOC and organizers | टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी २३ जुलैपासून; आयओसी व आयोजकांतर्फे घोषणा

टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी २३ जुलैपासून; आयओसी व आयोजकांतर्फे घोषणा

Next

टोकियो : कोरोनाच्या प्रकोपामुळे वर्षभर पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिक सामन्यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. हे सामने आता २०२१ मध्ये २३ जुलैपासून सुरु होतील अशी घोषणा टोकियो २०२० च्या आयोजन समितीचे प्रमुख योशिरो मोरी यांनी घाईघाईने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सोमवारी केली. नियोजीत कार्यक्रमानुसार टोकियो ऑलिम्पिक यंदा २४ जुलैपासून १६ दिवस होणार होते. ऑलिम्पिकच्या इतिहासात रद्द न होता पुढे ढकलावे लागलेले हे पहिलेच सामने आहेत.

कोरोना विषाणूमुळे जगभर हाहाकार माजल्यानंतर खेळाडू व क्रीडा महासंघांकडून हे सामने पुढे ढकलण्याची मागणी होती. त्यानुसार गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) व टोकियो २०२० आयोजकांनी हे सामने वर्षभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सोमवारी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार हे सामने आता २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ दरम्यान होतील मात्र त्यांना टोकियो २०२० असेच ओळखले जाणार आहे. त्यापाठोपाठ पॅरालिम्पिक सामनेसुध्दा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान होणार आहेत.

या तारखा जाहीर करण्याच्या तासभर आधीच मोरी यांनी आयओसीकडून आठवडाभरात तारखा अपेक्षित असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर सोमवारी संध्याकाळी आयओसीसोबत तातडीने झालेल्या टेलीकॉन्फरन्समध्ये या तारखा निश्चित झाल्याची माहिती त्यांनी दिली.
मोरी म्हणाले की, आधी ठरल्यानुसारच उन्हाळ्यातच हे सामने व्हावेत यावर आमची सहमती होती. कोरोनाचा प्रकोप, तयारीसाठी लागणार वेळ, खेळाडूंची निवड व पात्रता या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

आयओसीकडून जारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कोविड-१० ९ मुळे दररोज बदलत राहणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी पुरेसा अवधी आरोग्याधिकारी व आयोजकांना मिळावा म्हणून या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. इतर आंतरराष्टÑीय क्रीडा स्पर्धांचा २०२१ मधील कार्यक्रमसुद्धा कमीत कणी विस्कळीत व्हावा या दृष्टीने हे नियोजन केल्याचे आयओसीने म्हटले आहे.

हे सामने वर्षभर पुढे ढकलल्यानंतर आयोजक उन्हाळा टाळून हिवाळ्यात हे सामने आयोजित करण्याचा प्रयत्न करतील असा अंददाज होता कारण टोकियोमधील उन्हाळा हा यंदासुद्धा आयोजकांपुढे चिंतेचा विषय होता आणि त्यामुळे मॅरेथॉनसह काही खडतर स्पर्धा टोकियोबाहेर घेण्याचे ठरले होते.

ऑलिम्पिकच्या पुन्हा आयोजनाचा मोठा खर्च येणार असल्याचे टोकियो २०२० चे सीईओ तोशिरो मुटो यांनी म्हटले आहे. एका अंदाजानुसार या सामन्यांसाठी १२.६ अब्ज डॉलजरचा खर्च येणार आहे. सामने पुढे ढकलल्याने हॉटेल्स, तिकीटे, स्पर्धा स्थळे आणि वाहतूक व्यवस्था या सर्वच बाबींचा नव्याने विचार करावा लागणार आहे. (वृत्तसंस्था)

खेळाडूंची पात्रता 'जैसे थे'

टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलले असतानाच आतापर्यंत पारश पडलेली खेळाडूंची पात्रता कायम ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे.त्यामुळे आतापर्यंत ७४ भारतीय खेळाडू पात्र ठरले आहेत. त्यांचे स्थान आता सुरक्षित आहे. ऑलिम्पिकसाठीच्या सुमारे ११ हजार जागांपैकी ५७ टक्के जागांचे खेळाडू आतापर्यंत निश्चित झाले आहेत.

२०१३ ते २०२० : टोकियो ऑलिम्पिकचा प्रवास

टोकियो ऑलिम्पिकची सर्वोत्तम तयारी ते कोरोनाचे संकट आणि सामने वर्षभर पुढे ढकलण्यापर्यंतचा गेल्या सात वर्षांतील घटनाक्रम असा

२०१३- सप्टेंबर २०१३ मध्ये टोकियोला २०२० च्या ऑलिम्पिकचे यजमानपद आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिले.

२०१५- ऑलिम्पिक आयोजनासाठी सर्वात महागड्या मुख्य स्टेडियमच्या निर्मितीच्या मुद्यावरून जपानी पंतप्रधान शिंझो अबे यांना जोरदार टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी या स्टेडयिमची योजना रद्द केली.

२०१५- सप्टेंबर २०१५ मध्ये या खेळांच्या प्रतिक चिन्हाबाबत कल्पना चोरीचा आरोप लागल्यानंतर हे प्रतिक चिन्ह रद्द करण्यात आले.

२०१८- यानंतर जपानी शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेऊन या सामन्यांचे प्रतिकचिन्ह ‘मिराटोव्हा’ निश्चित करण्यात आले.

२०१८- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने विविध आरोपांमुळे सामन्यांतील बॉक्सिंग स्पर्धाच्या आयोजनाचे अधिकारी एआयबीएकडून काढून घेतले आणि स्वत: बॉक्सिंगच्या स्पर्धा नियोजीत करण्याचा निर्णय घेतला.

२०१९- डोपिंगच्या डेटा चोरी प्रकरणानंतर रशियन अ‍ॅथलीटस्वर चार वर्षांची बंदी आली. त्यानंतंर कोरोनामुळे रशियाच्या अपिलावर सुनावणी स्थगित आहे.

२०२०- मार्च मध्ये कोरोना विषाणूच्या फैलावाने जगभर हाहाकार माजला आणि जागतिक आरोग्य संघटना ‘हू’ ने ही महामारी घोषीत केली. त्यानंतर आॅलिम्पिक सामने रद्द करावे किंवा पुढे ढकलावे अशी मागणी जोर धरु लागली.

२४ मार्च २०२०- आॅलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच सामने एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

३० मार्च २०२०- आयओसी व टोकियो २०२० आयोजकांनी सामने २०२१ मध्ये २३ जुलैपासून होणार असल्याची घोषणा केली.

Web Title: Tokyo Olympics from July 23 next year; Announcement by IOC and organizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.