क्रीडा विभाग आॅनलाईन होणार
By Admin | Updated: August 9, 2016 03:41 IST2016-08-09T03:41:33+5:302016-08-09T03:41:33+5:30
खेळाडूंच्या सोयीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय मुंबई विभाग (मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर) लवकरच सर्व प्रक्रीया आॅनलाईन पध्दतीने करणार आहे
क्रीडा विभाग आॅनलाईन होणार
मुंबई : खेळाडूंच्या सोयीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय मुंबई विभाग (मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर) लवकरच सर्व प्रक्रीया आॅनलाईन पध्दतीने करणार आहे. विशेष म्हणजे सर्व स्तरावरील खेळाडूंपर्यंत पोहचण्यासाठी क्रीडा विभाग सोशल मीडीयाचा प्रभावी वापर करणार आहे.
स्वतंत्र क्रीडा धोरण असलेले देशातील पहिले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे क्रीडा धोरणांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आॅनलाईनचा आधार घेणार असल्याची माहिती मिळाली. यामुळे मुंबई विभागातील पाच जिल्हा विभागांच्या सर्व स्पर्धांची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार असून लवकरच क्रीडा व युवक संचालनालयाचे अद्यायावत संकेतस्थळ तयार होणार आहे.
यावर स्पर्धेविषयी सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल. त्याचबरोबर खेळाडूंच्या प्रवेशिका आॅनलाईन पध्दतीने स्वीकारणार आहे. प्रवेशिका स्वीकारल्यानंतर खेळाडूंना ओळखपत्र देण्यात येणार असून काही अनिवार्य कारणांमुळे स्पर्धा पुढे ढकलण्याची वेळ आल्यास त्याची माहिती व्हॉट्स अॅपच्या माध्यमाने देणार आहे.
युवा खेळाडूंपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्याच भाषेचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना ‘टेक्नोसॅव्ही’ होण्याचे फर्मान धाडण्यात आले. शिवाय मुंबई विभाग फेसबूक, टिष्ट्वटर व व्हॉटस अॅपच्या माध्यमाने सर्व स्पर्धा आयोजक, शिक्षक आणि खेळाडंूशी संपर्कात राहणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)