का झाली धोनीची कर्णधारपदावरून हकालपट्टी?
By Admin | Updated: April 10, 2017 18:04 IST2017-04-10T15:28:40+5:302017-04-10T18:04:37+5:30
त्यामुळे कारकिर्दीत पहिल्यांदाच कर्णधारपदावरून हकालपट्टीची नामुष्की धोनीवर

का झाली धोनीची कर्णधारपदावरून हकालपट्टी?
>सागर सिरसाट / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - इंडियन प्रिमियर लिगच्या 10 व्या सत्राला सुरूवात होण्यापूर्वी पुणे सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदावरून महेंद्र सिंग धोनीची हकालपट्टी करण्यात आली . त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथकडे संघाची धूरा देण्याचा निर्णय पुणे संघाचे मालक हर्ष गोयंका यांनी जाहीर केला. त्यामुळे कारकिर्दीत पहिल्यांदाच कर्णधारपदावरून हकालपट्टीची नामुष्की धोनीवर आली. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या. धोनीच्या खराब फॉर्मशिवाय हर्ष गोयंकासोबत त्याचे संबंध चांगले नसल्याचीही जोरदार चर्चा होती.
आता आयपीएलला सुरूवात झाल्यानंतर पुण्याचे मालक हर्ष गोयंका या चर्चेत आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. पुणे संघाच्या झालेल्या दोन्ही सामन्यानंतर त्यांनी धोनीवर अप्रत्यक्षपणे टीका केली. पंजाबविरूद्ध झालेल्या पराभवानंतर त्यांनी आपल्या संघातील खेळाडूंच्या स्ट्राइक रेटचा फोटो ट्विट केला. यामध्ये अप्रत्यक्षपणे संघात धोनीचा सर्वात खराब स्ट्राइक रेट असल्याचं त्यांनी म्हटलं. ट्विटमध्ये जरी त्यांनी धोनीचं नाव घेतलं नसलं तरी हे ट्विट धोनीसाठीच होतं हे धोनीच्या चाहत्यांनी हेरलं आणि गोयंका यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला.
आतापर्यंत मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे आणि डॅनियल ख्रिस्टियन यांचा सर्वात जास्त स्ट्राइक रेट असल्याचं त्यांनी ट्वीट केलं. त्यासोबत त्यांनी आकडेवारीचा एक फोटो अपलोड केला आहे. त्यामध्ये धोनी पाचव्या नंबरवर असून केवळ 73 इतका त्याचा स्ट्राइक रेट दिसत आहे.
या सर्व घटनाक्रमामुळे गोयंका आणि धोनीचे संबंध चांगले नसल्याची पुन्हा चर्चा सुरू आहे. गोयंका आणि धोनीमध्ये सर्वकाही आलबेल नसून , धोनीसोबत असलेल्या कटू संबंधांमुळेच धोनीची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
हा सर्व वाद पाहता, धोनीची कर्णधारपदावरून हकालपट्टी का केली या प्रश्नाचं थेट उत्तर गोयंका यांनी कधी दिलं नाही पण आता ट्विटरद्वारे धोनीला का हटवलं याचं ते उत्तर देत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.