सगेसोयरे कायदा होईपर्यंत उपोषण सुरूच; मनोज जरांगे यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 12:33 PM2024-02-08T12:33:51+5:302024-02-08T12:34:13+5:30

समाजासाठी बलिदान द्यावे लागले तरी मागे हटणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे - पाटील यांनी बुधवारी केला. 

The hunger strike will continue until the law is enacted tomorrow | सगेसोयरे कायदा होईपर्यंत उपोषण सुरूच; मनोज जरांगे यांचा निर्धार

सगेसोयरे कायदा होईपर्यंत उपोषण सुरूच; मनोज जरांगे यांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राज्यातील कुणबी नोंदी ५७ लाखांवरून ६२ लाखांवर पोहोचल्या आहेत. सगेसोयऱ्यांना कुणबी नोंदी देण्याची अधिसूचना सरकारने काढली आहे. येणाऱ्या अधिवेशनात त्याचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी पाठिंबा देण्यासाठीचे निवेदन प्रत्येक आमदाराला द्या. सर्वांच्या सहमतीने सगेसोयऱ्यांचा कायदा मंजूर झाला पाहिजे. १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसत असून, कायदा मंजूर होईपर्यंत माघार घेणार नाही. समाजासाठी बलिदान द्यावे लागले तरी मागे हटणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे - पाटील यांनी बुधवारी केला. 

आरक्षणाच्या लढ्यामुळे मराठ्यांनी अभूतपूर्व एकजूट दाखविली आहे. राज्यातील सकल मराठा समाजाने आपल्या मतदार संघातील आमदारांना फोन करा, निवेदन देऊन सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन करावे. सर्वमताने हा निर्णय झाला पाहिजे. मी स्वत: १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसत आहे. कायद्यात रुपांतर होईपर्यंत माघार घेणार नाही. जीव गेला तरी मागे हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईकरांचे कौतुक
नवी मुंबईमधील आगरी, कोळी भवनमध्ये आंदोलनासाठी सहकार्य करणाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे बुधवारी आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. 

सोशल मीडियावर फूट पाडण्याचा प्रयत्न 
कळंबोली : अनेक वर्षांपासून आरक्षण मिळाले नव्हते, आपल्या आंदोलनामुळे ७३ लाख जणांच्या नोंदी आढळल्या आहेत. आता सोशल मीडियावर काही जण पोस्ट करून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन त्यांनी दिले. कामोठे येथे आयोजित मराठा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

दोन दिवसात 
पाच जिल्हे फिरणार
पुढील दोन दिवसांमध्ये मी ५ जिल्हे फिरणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे माझी जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी तीन वाजतील तरीसुद्धा मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहतील. मी माझे घरदार सोडून समाजाच्या हितासाठी लढतोय आणि आपण सर्वांनी मला जी साथ दिली त्या बळावर मी मागे हटणार नाही, असा शब्द जरांगे पाटील यांनी देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.

Web Title: The hunger strike will continue until the law is enacted tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.