पेन्शनधारकांचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: November 17, 2016 05:35 IST2016-11-17T05:35:15+5:302016-11-17T05:35:15+5:30
वाशी येथील भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर जिल्ह्यातील पेन्शनधारकांच्या न्याय्य मागण्यांसाठी बुधवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास धरणे आंदोलन करण्यात आले.

पेन्शनधारकांचे धरणे आंदोलन
मोहपाडा : रायगड औद्योगिक पेन्शनर व वेल्फेअर असोसिएशन रायगड जिल्हा यांचे वाशी येथील भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर जिल्ह्यातील पेन्शनधारकांच्या न्याय्य मागण्यांसाठी बुधवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी शासनाकडून पेन्शनधारकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात निषेध करण्यात आला. या वेळी भविष्यनिर्वाहासंबंधित अधिकाऱ्यांना रायगड पेन्शनर संघटनेकडून आपल्या मागण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.
पेन्शनधारकांना दरमहा किमान ६,५०० व महागाई भत्त्याची वाढीव रक्कम मिळावी, निवृत्त पेन्शन सभासदांना वेटेज बोनसचा लाभ मिळावा, निवृत्त पेन्शनधारकांना मोफत अन्नसुरक्षा व आरोग्य सुविधा मिळावी, तसेच ५८ वर्षांवरील सर्वांना सर्व प्रकारच्या प्रवासात ५० टक्के सवलत मिळावी, अशा मागण्यांच्या मान्यतेसंबंधी निवेदन देण्यात आले.
रायगड औद्योगिक वेल्फेअर असोसिएशनने काढलेल्या निषेध मोर्चात रसायनी, खालापूर परिसरातील पेन्शनधारकांची सर्वाधिक उपस्थिती असल्याचे जिल्हाअध्यक्ष शिवाजी बामणे यांनी सांगितले. निवृत्त पेन्शनधारकांना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे ते म्हणाले.