हातात AK-47 अन् मिनिटात चोख प्रत्युत्तर देण्याचं ट्रेनिंग; थेट दहशतवाद्यांशी भिडणार रणरागिणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 02:59 PM2023-10-21T14:59:41+5:302023-10-21T15:05:59+5:30
यूपी हे देशातील पहिले राज्य असेल जिथे दहशतवादी घटनांचा सामना करण्यासाठी कमांडो टीममध्ये महिलांची विशेष तुकडी तयार करण्यात आली आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादी घटनांना तोंड देण्यासाठी देशातील पहिली महिला कमांडो बटालियन उत्तर प्रदेशमध्ये तयार करण्यात येत आहे. यूपी एटीएसची देशातील पहिली महिला कमांडो युनिट तयार केली जात आहे. यूपी हे देशातील पहिले राज्य असेल जिथे दहशतवादी घटनांचा सामना करण्यासाठी कमांडो टीममध्ये महिलांची विशेष तुकडी तयार करण्यात आली आहे. या महिला कमांडोज कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहेत.
एटीएसच्या या महिला कमांडोना एके-47 सारखी आधुनिक शस्त्रे देण्यात आली आहेत. ग्लॉक पिस्तुलांनी सज्ज असलेल्या या महिला कमांडो केवळ शत्रूवर नजर ठेवणार नाहीत तर गरज पडल्यास थेट त्यांच्याशी लढतील. ही देशातील पहिली महिला कमांडो टीम आहे जी दहशतवादी घटनांपासून गुन्ह्यांना आळा घालण्याचं महत्त्वाचं काम करेल.
एखाद्या खोलीत असलेल्या दहशतवाद्यांना अटक करण्याचे आव्हान असो किंवा कोणत्याही बहुमजली इमारतीत घुसून देशाच्या शत्रूंवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान असो, त्यांना प्रत्येक परिस्थितीसाठी NSG आणि SPG सारखे प्रशिक्षण दिले जात आहे. यूपी एटीएसच्या स्पेशल पोलीस ऑपरेशन टीम सेंटरमध्ये SPOT ट्रेनिंग सेंटरमध्ये 30 महिला कमांडोजची टीम तयार केली जात आहे. पुरुष कमांडोसोबतच प्रत्येक बॅचमध्ये 6 महिला कमांडोज तयार करण्यात येत आहेत.
Glock पिस्तूल, MP5 आणि AK-47 सारखी धोकादायक आणि स्वयंचलित शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. खडतर परीक्षेनंतरच या महिला कमांडोची निवड करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी शारीरिक, मानसिक सामर्थ्य आणि प्रतिभा तपासून राज्यभरात सिव्हिल पोलीस आणि पीएसीमध्ये नियुक्त केलेल्या महिला कॉन्स्टेबलची निवड केली आहे. प्रशिक्षणासाठी 30 महिला कमांडो तयार करण्यात येत आहेत.
पहिले 4 महिने प्रशिक्षण स्पॉट सेंटरमधून सुरू झाले. यामध्ये त्यांना शारीरिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. यानंतर, त्यांना पूर्णपणे स्वयंचलित शस्त्रांचे प्रशिक्षण, कम्युनिकेशन आणि ऑपरेशनल टेक्टिक्सचं तंत्र शिकवले जाते. यूपी एटीएस आणि यूपी पोलीस प्रशिक्षकांसह बीएसएफ, सीआरपीएफ, एनएसजीच्या प्रशिक्षकांनाही पाचारण करण्यात येत आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.