राजस्थानमधील अनोखी शाळा! येथे दिले जातेय आमदार बनण्याचे प्रशिक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 07:44 PM2017-10-13T19:44:13+5:302017-10-13T19:48:34+5:30

सत्ता आणि पैसा हाती एकवटत असल्याने आमदार खासदार बनण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात. तुम्हीही राजकारणात उतरून राजकीय पद मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Unique school in Rajasthan! Training to be given to be given as MLA | राजस्थानमधील अनोखी शाळा! येथे दिले जातेय आमदार बनण्याचे प्रशिक्षण 

राजस्थानमधील अनोखी शाळा! येथे दिले जातेय आमदार बनण्याचे प्रशिक्षण 

पुष्कर - सत्ता आणि पैसा हाती एकवटत असल्याने आमदार खासदार बनण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात. तुम्हीही राजकारणात उतरून राजकीय पद मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राजस्थानमध्ये अशी एक शाळा आहे जिथे राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या व्यक्तींना आमदार बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. 
येथील शाळेत याच आठवड्यात एक विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे. ज्यात तरुणांना आमदार बनण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एका बिगर शासकीय संघटनेकडून या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणास असून, राज्यात पर्यायी राजकारणासाठी वातावरण निर्मिती करणे हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे. 
 अभिनव राजस्थान या एनजीओने ही राजकीय प्रशिक्षण देणाऱ्या शाळेची संकल्पना समोर आणली आहे. या एनजीओचे संस्थापक डॉ. अशोक चौधरी म्हणाले,  हे प्रशिक्षण शिबीर एका अभियानाची सुरुवात आहे. त्याचा प्रारंभ 14-15 ऑक्टोबरला पुष्कर येथे होणाऱ्या आमदार प्रशिक्षण शिबीराने होणार आहे. या प्रशिक्षणासाठी 250 हून अधिक लोकांनी नावनोंदणी केली आहे. 
 या शिबीराचे उद्दीष्ट लोकप्रतिनिधींची निवड आणि निवडणूक प्रक्रियेबाबत प्राथमिक माहिती देणे  आणि लोकांच्या मनातील शंका दूर करणे हे आहे. या प्रशिक्षण शिबीरानंतर जमिनीस्तरावरून काम सुरू होईल. तसेच या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेणाऱ्यांना आपआपल्या भागात काम करण्यास सांगितले जाईल. तसेच त्यांच्या कामाची माहिती दर दोन महिन्यांनी घेतली जाईल. 
 आयएएसची नोकरी सोडून सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते बनलेले डॉ. अशोक चौधरी यांच्यामते "सुदृढ आणि खऱ्या लोकशाहीसाठी चांगली माणसे विधानसभेत पोहोचणे गरजेचे आहे. या शिबिरात कोणताही पक्ष आणि विचारसरणीशी निगडीत व्यक्ती सहभागी होऊ शकतील. राजस्थानमध्ये पुढच्या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत आणि आपण सुरू केलेल्या या प्रयत्नांमुळे काही चांगली आणि नवी माणसे निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात येतील." 
 

Web Title: Unique school in Rajasthan! Training to be given to be given as MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.